रविवारी वसईत रेल्वे प्रवासी परिषदेचे आयोजन
 महा त भा  12-Aug-2017
 

 
वसई :  मुंबईत आणि उपनगरात रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात म्हणून रेल्वेला ’जीवनवाहिनी’ असे म्हटले जाते. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यात प्रवाशांच्या अनेकविध समस्यांना रेल्वे प्रवासी वेल्फेअर सोसायटीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वसईत रेल्वेे प्रवासी परिषदेचे आयोजन रविवारी दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत समाज उन्नती मंडळ सभागृह, माणिकपूर पेट्रोलपंपासमोर, वसई पश्चिमयेथे केले आहे. 

दिव्यांग व्यक्ती, महिला, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच रेल्वे परिसरात शौचालय, स्वच्छता, गाड्या वाढवूनही गाड्यांची अपुरी पडणारी संख्या अशा एक ना अनेक समस्यांनी प्रवासी विटलेला आहे. त्यातच तृतीयपंथीयांचा हैदोस आहेच. रेल्वे प्रवासी वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर धुरी यांच्या विशेष पुढाकाराने या रेल्वे परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या परिषदेचे अध्यक्ष पालघरचे खासदार ऍड. चिंतामण वनगा असून रेल्वे बोर्डच्या ZRUCC चे सदस्य मधु कोटियन, सदानंद पाऊगी तथा डॉमनिका डाबरे, कवी सायमन मार्टिन, राजन नाईक व विन्सेंट परेरा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समस्या लेखी स्वरूपात सकाळी ९ ते १० या वेळेत आयोजकांकडे द्याव्यात, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे.