वाडा पंचायत समितीवर कमळ फुलले
 महा त भा  12-Aug-2017

 


वाडा  : वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने या दोन्ही  पदांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सभापतिपदी भाजपच्या अश्‍विनी शेळके यांची, तर उपसभापतिपदी जगन्नाथ  पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोषात स्वागत केले. 

वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या १२ होती. मात्र, वाडानगर पंचायत घोषित झाल्याने वाडा गणाचे सदस्य रद्द झाले. त्यामुळे एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी  काँग्रेसचा एक, तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी, असे ठरल्याप्रमाणे भाजपचे अरुण गौंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली नडगे यांनी सभापतिपद, तर नंदकुमार पाटील, माधुरी पाटील यांनी उपसभापतिपद यापूर्वी भूषविले आहे. 

शुक्रवारी सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यात भाजपकडून सभापतिपदीपदासाठी अश्‍विनी शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शामा गायकर यांनी निवडणूक लढवली. अश्‍विनी शेळके यांना सहा, तर शामा गायकर यांना पाच मते मिळाली. उपसभापतिपदासाठी भाजपचे जगन्नाथ पाटील व शिवसेनेचे अरुण अधिकारी यांच्यात लढत झाली. जगन्नाथ पाटील यांना सहा, तर अरुण अधिकारी यांना पाच मते मिळाली. विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून विश्‍वनाथ वेतकोली यांनी काम पाहिले.

अन्य तीन पंचायत समित्यांवरही भाजपचा झेंडा

विक्रमगड पंचायत समिती, जव्हार पंचायत समिती आणि डहाणू पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. विक्रमगड पंचायत समितीच्या सभापतिपदी मधुकर खुताडे यांची, तर विष्णू धिंडा यांची उपसभापती यांची निवड करण्यात आली, तर अर्चना मोरे यांची जव्हार पंचायत समितीच्या आणि राम ठाकरे यांची डहाणू पंचायत समितीच्या सभापतिपदी नियुक्ती झाली आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.