प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी !
 महा त भा  12-Aug-2017

 
 
मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात घोषणा, सुभाष देसाईंचीही स्वतंत्र चौकशी 
 
तत्वांशी तडजोड झाल्यास सत्तेला लाथ मारून बाहेर पडेन: मुख्यमंत्री 
 
मुंबई : भ्रष्टाचाराचे विविध आरोप झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांच्या मार्फत चौकशी करण्याची तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. 
 
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभेचे कामकाज लांबल्यामुळे व विधानपरिषदेचे कामकाज संपल्यामुळे सभापतींनी मुख्यमंत्र्यांना आधी विधानपरिषदेत उत्तरासाठी बोलावून घेतले. त्यानंतर विधानपरिषदेनंतर सभेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमएसआरडीसीचे तात्पुरते पदावरून हटवण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी राधेशाम मोपलवार यांची चौकशी करण्यासाठी संयुक्त एसआयटी अर्थात विशेष तपास पथक नेमण्यात येईल. यामध्ये काही महसूल अधिकारी, काही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे व काही आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी असतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 
 
मेहता यांची लोकायुक्तांकडून चौकशी 
 
प्रकाश मेहता यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हाणाले की, मी हे प्रकरण बरेच खोलात तपासले. मेहता यांनी ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ हा शेरा चूक की बरोबर हे चौकशीत समोर येईलच. मात्र, ती फाईलच अजून पुढे गेलेली नाही त्यामुळे घटनाच घडलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सदर जमीन १९४६ मध्ये संरक्षण विभागाने घेतली असून देखभालीसाठी राज्य सरकारकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. या जमिनीसाठी सर्व परवानग्या या १९९९ ते २०१४ या काळात देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्वच गोष्टींची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत कोणाच्याही मनात शंका राहू नये यासाठी प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांच्या मार्फत, जे निवृत्त न्यायाधीशच असतात, चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 
 
देसाईंचीही स्वतंत्र चौकशी 
 
हजारो एकर जमीन गैरअधिसूचित केल्याचा आरोप असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र चौकशी करण्यात येईल, ज्यामध्ये राज्य सरकारचा संबंध नसेल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तथापि, ही जमीन गेल्या सरकारनेच गैरअधिसूचित केली असून आम्ही त्याचे आदेश काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच गेल्या सरकारने २२८७ हेक्टर जमीन गैरअधिसूचित केली तर या सरकारने केवळ ३१.५ हेक्टर केली त्यातही ३० हेक्टर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मात्र, तरीही या प्रकरणाच्या संपूर्ण व निष्पक्षपाती चौकशीसाठी राज्य सरकार तयार असून विरोधकांशी चर्चा करून देसाई यांचीही स्वतंत्र चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 
 
उद्या रोज आरोप लावून घरी जायला सांगाल !
 
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या दोन्ही मंत्र्यांचे नैतिक भूमिकेतून राजीनामे घेण्यात यावेत व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखीच वागणूक या दोघांनाही मिळावी अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही उद्या रोज उठून नवनवे आरोप कराल आणि घरी जायला सांगाल. असे आरोप करून लगेच सिद्ध व्हायच्या आट राजीनामे घेतल्यास माझ्यासकट सर्व मंत्रिमंडळच घरी बसेल. एकनाथ खडसे यांनी नैतिक भूमिकेतून स्वतःहून राजीनामा दिला असल्याचे सांगत ते या अग्नीदिव्यातून नक्कीच बाहेर पडतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
तत्वांशी तडजोड झाल्यास सत्तेला लाथ मारून बाहेर पडेन !
 
विधानपरिषदेत सुभाष देसाई यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. शिवसेनेच्या पाठींब्यावरच सरकार सत्तेत असल्याने मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याचे सूचित करायचा विरोधकांनी प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार पूर्णपणे मजबूत असून कोणताच धोका नाही, हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मिळालेल्या २०७ मतांवरून सिद्ध झालेच आहे. ज्यादिवशी तत्वांशी तडजोड करण्याची वेळ येईल तेव्हा सत्तेला लाथ मारून बाहेर जाईन. त्यामुळे माझ्या नैतिकतेवर संशय घेऊ नका असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.