पाकिस्तानच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू
 महा त भा  12-Aug-2017मेंधार (जम्मू-काश्मीर) : येथील सेक्टरजवळ आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये एका भारतीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतीय सैन्य देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला त्याच्याच भाषेत उत्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


दरम्यान या सर्व धामधुमीत गावातील सर्व नागरिकांना गावापासून दूर सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे आदेश लष्कराने दिले आहेत. आज सकाळी पाकिस्तान सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, भारतीय चौक्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. यातील काही पाकिस्तानी सैनिकांनी गावाला देखील लक्ष करत तुफान गोळीबारी सुरु केली. यामध्ये अंगणामध्ये असलेली महिला घरात आश्रयासाठी जात असताना तिच्या पाठीत गोळी लागून ती जखमी झाली व थोड्याच वेळात तिची प्राणज्योत मालवली. यानंतर महिलेचा मृतदेह आणि तिच्या कुटुंबियांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


नेहमी प्रमाणे यंदाही पाकिस्तानने आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमेवर आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान प्रत्येक वेळी १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. यंदाही त्याने आपली हीच परंपरा सुरु ठेवत दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस अगोदरपासूनच भारतीय सीमेवर पुन्हा एकदा हल्ले करण्यास सुरवात केली आहे. तसेच येत्या दोन दिवसात पाकिस्तान आणखीन काही मोठी आगळीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी आणि सीमेवरील हल्ले यात वाढ होण्याची शक्यता आहे.म्हणून जम्मू-काश्मीर सरकारने लष्कराच्या मदतीने आपल्या राज्याचा सुरक्षेकडे अधिक लक्ष देणे गरजे आहे.