महापौर मॅरेथानसाठी ठाणे सज्ज
 महा त भा  12-Aug-2017


२० हजार धावपट्टू धावणार राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

ठाणे : २८ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी १३ ऑगस्ट रोजी पार पडणार असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास 20 हजार धावपट्टू या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. ही मॅरेथॉन या शहराचा क्रीडा उत्सव ठरावा यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे.रविवारी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक समारंभ संपन्न होणार आहे.  गेली अनेक वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असंख्य धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. या मॅरेथॉनसाठी २०१९ साली होणार्‍या कॉमनवेल्थमध्ये कराटेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी उपस्थित राहणार आहे, तर या मॅरेथॉनमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापट्टू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा दहा गटांमध्ये होणार असून यासाठी एकूण ५.८५ लाखाची बक्षिसेदेखील ठेवण्यात आली आहेत.

ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष वेगळा गट :

ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या ६० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी गेल्या वर्षीपासून वेगळा गट ठेवण्यात आला असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीची स्पर्धा ही महापालिका भवन ते बाटा शोरुम (नितीन कंपनी) अर्धा कि.मी. अशी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण २०० पंच, ९२ पायलट, ३३० सुरक्षा रक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सज्ज झाले आहेत.