वनवासींसाठी बांधलेले गाळे पाच वर्षानंतरही नुसते पडूनच
 महा त भा  12-Aug-2017

 
 
 
वनवासी तरुणांचे बेमुदत उपोषण सुरू

जव्हार :  जव्हार नगरपरिषदेने वनवासी बेरोजगार तरुणांसाठी बांधलेल्या गाळ्यांचे वाटप अद्याप वनवासी तरुणांना करण्यात आलेले नाही. जव्हार नगरपरिषदेला वनवासी तरुणांनी यापूर्वी अनेक निवेदने, अर्ज, विनंत्या केल्या आहेत. मात्र जव्हार नगरपरिषद प्रशासन या बांधलेल्या गाळे वाटपाबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने जव्हार शहरातील सुशिक्षित बेरोजगार वनवासी तरुण व शिवसेनेने गुरुवारी दि. १० ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

जव्हार नगरपरिषदेने २०११-१२ मध्ये नगरपरिषद हद्दीतील सुशिक्षित तरुणांसाठी हनुमान पॉईंट मंगेलवाडा शेजारी ११ गाळ्यांचे बांधकामपाच वर्षांपूर्वीच केले. मात्र जव्हार नगरपरिषदने या गाळे वाटपाची दखलच घेतली नसल्याने वनवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गुरुवारपासून जव्हार नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

मंगेलवाडा परिसरात वनवासी लाभार्थ्यांसाठी बांधलेले गाळे बेरोजगार वनवासी तरुणांना तत्काळ वाटप करण्यात यावे, जव्हार नगपरिषदेच्या जयसागर धरणाच्या परिसरात मालकीच्या जागेची मोजणी करून धरणाच्या जागेची हद्द निश्चित करावी, रात्रीच्या वेळी अंधार असल्याने नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटते. त्यामुळे नवीन लाईटचे पोल बसवण्याची मागण्या जव्हार नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या बेरोजगार वनवासी तरुणांनी केल्या आहेत. या उपोषणामध्ये विनायक थाळकर, दिनेश भोये, साईनाथ नवले, चित्रांगण घोलप हे आहेत.