जपान, कोरिया देखील युद्धासाठी सज्ज
 महा त भा  12-Aug-2017टोकियो (जपान) : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्यस्थितीमुळे आत जपान आणि दक्षिण कोरियाने देखील आपल्या सर्व संरक्षण दलांना येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जपानने आपली रडार यंत्रणा देखील अधिक सक्रीय केली आहे. तसेच नागरिक, पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी काही खास उपाय देखील करण्याचे आदेश जपान सरकारने दिले आहेत.


जपानबरोबरच दक्षिण कोरियाने देखील आपल्या सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाच्या सीमेजवळ असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या देशातील नागरिक आणि विदेशी पर्यटकांना सुरक्षेसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.


उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र ७ ते ८ मिनिटांमध्ये जपानपर्यंत पोहचू शकते, त्यामुळे इतक्या वेळेत उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा बंदोस्त करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जात असल्याचे जपान संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. जपानच्या नौदलाला देखील युद्धसराव आणि संरक्षणात्मक उपाय योजना करण्याचे आदेश जपानने दिले आहेत.


उत्तर कोरियाने अमेरिकेच्या गुआम या बेटावर जरी हल्ल्याची धमकी दिली असली तरी कोरियन सागरात जपान, दक्षिण कोरिया हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र असल्यामुळे उत्तर कोरिया या दोन देशांवर देखील हल्ला करण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्याच बरोबर जपान आणि दक्षिण कोरिया हे उत्तर कोरियाच्या अगदी जवळ आणि मारक टप्प्यात असल्यामुळे युद्धस्थितीमुळे या देशांना उत्तर कोरीयापासून मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.