'शिकू आनंदे' घराघरात पोहचल्यास शिक्षण विवेकी होईल - शिक्षण सचिव नंदकुमार
 महा त भा  12-Aug-2017

 

पुणे : शिक्षण विवेक या विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यासाठीच्या मासिकाचा ५वा वर्धापनदिन सोहळा आणि शिकू आनंदे लघुपट लोकार्पण कार्यक्रम आज पुणे शहरातील बालशिक्षण मंदिर सभागृहात झाला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याचे सचिव नंदकुमार यांच्यासह विवेक माध्यम समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षण विवेक मासिक आणि टी.बी.लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टचे अॅडव्होकेट किशोर लुल्ला यांच्या सहाय्याने चार वर्षांपूर्वी शिकू आनंदे हा प्रयोगशील शाळांसाठीचा प्रयोग सातारा परीसरातील शाळांमध्ये सुरू झाला होता. आज किशोर लुल्ला यांच्या विशेष उपस्थितीत मुलांना त्यांंना आवडेल असे शिक्षण मिळावे यासाठी उद्देश स्पष्ट करणाऱ्या लघुपटाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. शिकू आनंदे हा लघूपट पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये दाखवण्यात यावा, असे निवेदन यावेळी किशोर लुल्ला यांनी शिक्षण सचिवांना केले.

 

                         

 
 
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षणासाठी आवश्यक विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग करीत आहे असे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, मुलांवर सक्ती न करता त्यांच्या विकासासाठी आवश्यक शिक्षण देणे अपेक्षित आहे. पालकांनी मुला-मुलींवर दडपण न टाकता त्यांच्याशी संवाद साधला तर पोषक वातावरण निर्माण होऊन चिकित्सक विद्यार्थी घडतील. शिक्षकांना मार्गदर्शक अभ्यासक्रमावर आधारित सहाय्यकारी पाठ्यपुस्तके सध्या पाठ्यपुस्तक निर्मिती विभागाकडून पुरवली जात आहेत. इ-लर्निंगकडे सावकाश सुरू असलेली प्रगती हे पाठीवरील शैक्षणिक साहित्याचे वजन कमी करण्यासाठीचे पुरक ध्येय आहे. सध्या शिक्षक फक्त पाठ्यपुस्तकातील शब्द शिकवून ठराविक अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत. जेव्हा महाराष्ट्रातला शिक्षक स्वतः मार्गदर्शक अभ्यासक्रमाच्या आधारे आपल्या प्रदेशातील वर्गातील विद्यार्थ्यांना समजणाऱ्या भाषेतील अभ्यासक्रम तयार करून मग तो शिकवण्या इतका परिपक्व होईल, तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय शाळेतील विद्यार्थी समृद्ध होईल. शिक्षकांच्या क्रियाशीलतेत दाखवलेल्या प्रयोगशीलतेमुळे पालकही शासकीय शाळांमध्ये मुलांना दाखल करण्यासाठी तयार होतील. विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारायचे सोडून प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाठपुरावा करतील तेव्हा शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सकारात्मक विचार करत आहोत असे वाटेल. 

 
पुढे ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतल्यास अजून अनेक आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डाप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थेचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये कोणताही फरक नाही. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत काही प्रमाणात वेगळी आहे. त्यावर सध्या चर्चा व संशोधन सुरू असून सविस्तर याविषयी सांगितले जाईल. कारण सीबीएसई अभ्यासक्रमाआधारे विचारले जाणारे प्रश्न अधिक सखोल असतात. त्याच धर्तीवर शासकीय शाळांसाठीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप अधिक सखोल व विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीला खाद्य देणारे असावेत अशा पद्धतीने योजना करण्यावर काम सुरू आहे.

 
एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव तांबे म्हणाले, लिखाणाची प्रेरणा ही कोणा एका व्यक्ती किंवा प्रसंगातून नाही तर चिकित्सक वृत्तीतून येते. गणित शिकवताना व्यावसायिक मूल्ये शिकवताना सकारात्मक विचार रुजण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. गणित विषयही दैनंदिन घटनांमधून विद्यार्थ्यांशी बोलावा अशी सहज पद्धतीने गणिताची मांडणी केल्यास गुण मिळवण्याचा विषय म्हणून त्याकडे पाहिले जाणार नाही. भाषा ही आपल्या घरातील, समाजातील असेल तर शिकवण्याचा उद्देश साध्य होतो. त्यामुळे सहज गोष्ट सांगताना जे शिकतो ते कायम स्मरणात राहते. तशीच शैक्षणिक पाठ्यपुस्तकांची व अभ्यासक्रम शिकवण्याची पद्धत असली पाहिजे. गंमत, गप्पा, गोष्टी आणि गाणी या मार्गाने हसत खेळत शिक्षण देण्याची पद्धत आपल्या इथे रुजण्यासाठी पालकांची व शिक्षकांची समान जबाबदारी आहे.

 
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षण सचिवांशी साधलेल्या संवादातून त्यांचे बदलते भावविश्व समोर आले. एका विद्यार्थिनीने शिक्षण सचिवांना प्रश्न विचारला की, खेळाचे तास कमी करून अभ्यासक्रम का पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष दिले जाते? त्यापेक्षा योगासने व खेळ याकडे अधिक लक्ष का दिले जात नाही? दुसऱ्या एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न अधिक विचार करणारा होता. त्याने विचारले, सर जर अभ्यास इतका महत्त्वाचा आहे तर त्यामध्ये मुलांशी संबंधित कला, वाणिज्य, विज्ञान यामधील संशोधने का पोहचवली जात नाहीत?

 
शिक्षण सचिवांनी याला समर्पक उत्तरे देत सांगितले, आतापर्यंत कला हा विषय माझ्या दृष्टीने नवनिर्मितीचा आहे. त्यामध्ये कोणते व कसे संशोधन होते हे जाणकारांनी नक्की पोहोचावे. कारण व्यक्तीपरत्वे कला ही सर्जनशील आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात कोणता विषय समाविष्ट व्हावा हा विस्तारित प्रश्न ठरेल. पण विज्ञानातील संशोधने विविध प्रयोग करून शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात. वाणिज्य विषयातील संशोधनांवर मात्र अजून काम झालेले नाही. आज झालेल्या विवेक संवाद या कार्यक्रमामुळे वाणिज्य विषयातील संशोधने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

 
विवेक संवाद या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षण अधिकारी व बालसाहित्यिक यांच्यामध्ये झालेला संवाद हा अनेकदृष्ट्या महत्त्वाचा होता. यामध्ये साप्ताहिक विवेकचे महेश पोहनेरकर व शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ.अर्चना कुडतरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मानसी कुलकर्णी यांनी केले.