उत्तर कोरिया प्रश्नी शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात फोन वरून संवाद
 महा त भा  12-Aug-2017


बीजिंग (चीन) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेल्या युद्धाच्या वक्तव्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी आज ट्रम्प यांच्याशी फोन वरून संवाद साधला आहे. तसेच अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करून यावर तोडगा काढावा असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी देखील जिनपिंग यांच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उत्तर कोरिया संबंधी नव्याने समंत केलेला ठराव हा कोरियन द्वीपकल्पात शांती आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. व या ठरावाला चीनचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे. परंतु याच बरोबर अमेरिकेने उत्तर कोरियावर तडकाफडकी कसलीही कारवाई करू नये. उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र असल्यामुळे त्याला लिबिया समजणे चुकीचे ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच दोन्ही देशांनी मिळून यावर विचार केल्यास यावर नक्कीच तोडगा निघेल असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.


उत्तर कोरियाने अमेरिकेच्या गुआम बेटावर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील उत्तर कोरियाला त्याच्या शब्दात उत्तर दिले. अमेरिकेने आपले सैन्य जागोजागी तैनात केले असून उत्तर कोरियाने कोणतीही आगळीक केल्यास त्याला उत्तर देण्यासाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज असल्याचे काल म्हटले होते. दोन्ही देशांमधील या युद्धजन्यस्थितीमुळे जागतिक राजकारणात देखील प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.