ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलांचा मृत्यू झाला नाही : सिद्धार्थ नाथ सिंह
 महा त भा  12-Aug-2017

 

गोरखपुर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (बीआरडी) रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नसून ‘इंसेफेलाइटीस’(मेंदूचा दाह)मुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिले आहे. आज गोरखपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज बीआरडी या महाविद्यालयाचा दौरा केला असता संपूर्ण अहवालाचा अभ्यास आम्ही केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रात्री ११.३० ते १.३० च्या दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. मात्र या वेळेच्या आधीच सात मुलांचा मृत्यू रुग्णालयात झाला होता अशी माहिती त्यांनी या अहवालानुसार दिली.

 

३० मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र यावर शोध घेणे सुरु आहे. मात्र मुलांचा मृत्यू ‘इंसेफेलाइटीस’मुळे झाला आहे. बाकीची तपासणी जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या सरकारने बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांना पदावरून काढून टाकले आहे.

 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण घटनेकडे लक्ष ठेवून आहेत तसेच ते सातत्याने याविषयातील माहिती घेत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूनंतर पंतप्रधान यावर काहीच बोलत नसल्याबद्दल माध्यमांमधून त्यांच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून नुकताच त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Embeded Object