स्वराज यांनी घेतली भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
 महा त भा  11-Aug-2017काठमांडू (नेपाळ) : दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज भूतानचे परराष्ट्र मंत्री दामचो दोरजी यांची भेट घेऊन त्यांची काही वेळ चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये कशावर चर्चा झाली हे असून स्पष्ट झालेले नाही, परंतु दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या अशा मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे चीन-भारत-भूतान यांच्यात गाजत असलेल्या डोकलाम प्रश्नी दोन्ही देशांमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.


बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांची १५ व्या बैठकीला कालपासून नेपाळमध्ये सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी नेपाळ, भारत, म्यानमार, श्रीलंका, भूतान या देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित काठमांडूमध्ये उपस्थित आहेत. आजची बैठक समाप्त झाल्यानंतर स्वराज यांनी दोरजी यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यामध्ये डोकलाम विषयी देखील चर्चा झाली असणार यात कसलीही शंका नाही, मात्र अजून याविषयी कसलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Embeded Object


बिमस्टेक बैठकीच्या आदल्यादिवशी म्हणजेच बुधवारी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाम येथील घुसखोरीवरून चीनवर आगपाखड केली होती. डोकलामची भूमिका ही भूतानच्या अधिकृत मालकीची असून चीनने तेथे अनधिकृतपणे प्रवेश करून चीन-भूतान यांच्यातील १९९८ साली झालेल्या कराराचे थेट उल्लंघन असल्याचे भूतान परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. त्यामुळे डोकलाम प्रश्नी भारत आणि भूतान यांनी आपली भूमिका स्पष्ट असली तरी दोन्ही देशांचे पुढचे पाऊल काय असले ? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.