उत्तर कोरियासाठी अमेरिका सज्ज - डोनाल्ड ट्रम्प
 महा त भा  11-Aug-2017

 वॉशिंग्टन डी.सी.(अमेरिका) : उत्तर कोरियाने दिलेल्या धमकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उत्तर कोरियाला त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे. उत्तर कोरियाबरोबर दोन हात करण्यासाठी अमेरिकन सैन्य पूर्णपणे सज्ज असून उत्तर कोरियाने कसलीही आगळीक करू नये, असा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी स्वतः ट्वीट करून याविषयी माहिती दिली आहे. उत्तर कोरियाच्या समस्येवर सैनिकी कारवाई हा एकच उपाय असून आपल्या देशाच्या रक्षणासाठी अमेरिकन सैन्य पूर्णपणे सज्ज असून अमेरिकेचे सैनिक शस्त्रास्त्रासह जागोजागी तैनात आहेत. त्यामुळे आम्ही आशा करतो कि, किम जोंग उन अमेरिकेच्या वाटेला न जाता दुसरा काही तरी उपाय शोधेल असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Embeded Object


उत्तर कोरियाची दंडेलशाही थांबवण्यासाठी अमेरिकेने केलेले सर्व राजकीय आणि सैनिकी प्रयत्न फोल ठरले आहेत. उलट अमेरिकेच्या कसल्याही दडपणाला भीक न घालता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने सातत्याने क्षेपणास्त्रांची चाचणी करून ते यशस्वी केले व प्रशांत सागरातील अमेरिकेच्या गुआम या बेटावर हल्ला करण्याची धमकी दिले आहे. त्यामुळे अमेरिका आता चांगलीच अस्वस्थ झाली आहे. दोन्ही देशांमध्ये पेटलेल्या या संघर्षामुळे जागतिक राजकारणात देखील तणाव वाढू लागला आहे.