हमीदभाईंची कोठडी!
 महा त भा  11-Aug-2017
 
भारताचे १२ वे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी निवृत्तीच्या पूर्वसंध्येला, भारतातील अल्पसंख्यकांच्या, त्यातही मुसलमानांच्या मनात, सध्याच्या मोदी सरकारमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या आणि असुरक्षिततेच्या भावनेचा उल्लेख केला. यामुळे एका वादाला तोंड फुटले आहे. संवैधानिक पदावरून निवृत्त होताना व नंतर, ती व्यक्ती मोकळेपणाने आपल्या मनातील विचार व्यक्त करते, असा आजवरचा अनुभव आहे. अन्सारी यांनीही तेच केले. हमीदभाईंनी म्हटल्याप्रमाणे मुसलमानांमध्ये भीतीची, असुरक्षिततेची भावना आहे, हे खरेच आहे. पण, कुठल्या मुसलमानांमध्ये? एखादे सरकार कायद्याची कडक अंमलबजावणी करते, तेव्हा गुन्हेगार, बदमाश, देशद्रोही लोकांना धडकी भरते. याचा अर्थ सर्व नागरिकांमध्ये भीतीची भावना आहे, असे समजायचे काय? तीच गोष्ट मुसलमानांनाही लागू असली पाहिजे. जे गुन्हेगार, बदमाश, देशद्रोही आहेत, त्यांना धडकी भरत असेल, तर हमीदभाईंसारख्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही.
 
हमीदभाईंनी आपल्या भाषणात, भारताचे माजी विद्वान राष्ट्रपती राधाकृष्णन् यांचे एक वाक्य उद्धृत केले- “लोकशाही अल्पसंख्यकांना किती संरक्षण देते यावरून ती नावलौकिकास येते.” हमीदभाईंना असे म्हणायचे आहे की, सध्याचे लोकप्रिय केंद्र सरकार अल्पसंख्यकांना संरक्षण देण्यास अपयशी ठरले आहे आणि त्यामुळे केवळ अल्पसंख्यकांच्या मनात भीतीने घर केले नाही, तर आपल्या लोकशाहीवरही प्रश्नचिन्ह लावले आहे. हमीदभाईंचे काहीच चुकले नाही. पण, याच राधाकृष्णन् यांनी हिंदुत्वाबाबत वारंवार सांगितले की, हिंदुत्व हा रिलिजन नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. (हिंदुइझम इज ए वे ऑफ लाईफ.) हमीदभाई, हे वाक्य तुम्ही कधी उच्चारले नाही! की फक्त सोयीचे एखादे वाक्य उचलायचे आणि समोरच्याच्या तोंडावर फेकून मारायचे! हमीदभाईंना आम्ही आणखी एक वास्तव नजरेत आणून देऊ इच्छितो. भारतातल्या बहुसंख्य लोकांमध्ये (म्हणजे हिंदूंमध्ये) मुसलमानांविषयी एक चीड, संताप आहे. त्यांच्या देशाचे तुकडे मुसलमानांमुळे झाले, ही वेदना अजूनही हृदयात ठसठसत आहे. कारण भारताचे तुकडे करून पाकिस्तान देश तयार करण्यासाठी दुसरे कुठलेच कारण नव्हते. केवळ मुसलमानांसाठी स्वतंत्र देश हवा, हाच हव्यास होता. त्याची जी वेदना आहे, खंत आहे, हतबलता आहे, ती अजूनही जिवंत आहे. ती वेदना कमी करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतात राहिलेल्या मुसलमानांनी काय केले, याचे उत्तर हमीदभाईंनी दिले पाहिजे. एक तरी उदाहरण दाखवून द्यावे. उलट, इतिहास असा सांगतो की, मुसलमानांनी या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी, तिच्यावर मीठच चोळले. तरीही हिंदू समाज शांत राहिला. फाळणीच्या यातनामयी आठवणी शांत झाल्यावर, एवढ्यातच अशी एक संधी मुसलमानांकडे चालून आली होती. अयोध्येत बाबरी ढांचा असलेल्या ठिकाणी, राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला असता, तर हिंदूंचे मुसलमानांकडे संशयाने बघणे बरेच कमी झाले असते. पण तीही संधी गमविली. तेव्हातरी हमीदभाईंनी आपला आवाज उठवायला हवा होता. उलट आतापर्यंतचे सत्ताधारी, हिंदूंनाच उपदेश देत गेले आणि हिंदूदेखील नाइलाजाने शांत राहिला. जे जे हिंदूंना पवित्र, श्रद्धेचे त्यावर आघातच केले गेले. या जखमा केव्हा आणि कशा भरून येणार, हमीदभाई?
 
खरे म्हणजे, तुम्ही ज्या मुसलमानांचा कैवार घेत आहात, त्यांच्यामुळे हिंदूंमध्येच भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा मुसलमान हिंदूंच्या वस्तीत सुखनैव राहू शकतो. पण, मुसलमानांच्या वस्तीत गैरमुसलमान राहूच शकत नाही, हे वास्तव आहे. मुसलमानांना दत्तक घेतलेले सेक्युलर नेत्यांना आमचे आव्हान आहे की, त्यांनी मुसलमानांच्या वस्तीत आपले घर बांधून तिथे राहून दाखवावे. हमीदभाई, आपणदेखील निवृत्तीनंतर मुसलमानांच्या वस्तीत राहायला जाणार नाहीत. मुसलमानांची इतकी दहशत गैरमुसलमानांच्या मनात आजही आहे आणि तरीही तुम्ही म्हणता की, मुसलमान घाबरलेले आहेत! हिंदूंना सतत अपमानित करणे, त्यांच्यावर हल्ले करणे, सर्व प्रकारच्या गुन्ह्यात अग्रेसर राहणे इत्यादी कृत्ये, जी काँग्रेसच्या राजवटीत राजरोसपणे करता येत होती, ती आता भाजपाच्या राज्यात करता येत नाहीत, म्हणून खरेतर मुसलमान समाज अस्वस्थ आहे. रक्ताची चटक लागलेल्याला रक्त मिळाले नाही तर तो कसा तगमगतो, तसे या समाजाचे झाले आहे. त्यामुळे हमीदभाई, तुम्ही खरेतर हिंदूंच्या असुरक्षिततेबाबत बोलायला हवे होते. पण तुम्ही बोलणार नाही. कारण तुमच्या विचारांची बैठकच धर्मांधतेची आहे. संविधानाच्या शपथा तुम्ही अनेकदा घेतल्या असतील. पण, त्या संविधानाच्या प्राणस्वराला तुमच्या मेंदूत यत्किंचितही जागा नाही, हेच दिसून आले आहे.
 
हमीदभाईंच्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केले, ते तुमच्या डोक्यातील या असल्या विचारांच्या बैठकीला उघड करणारे होते. मोदी म्हणाले, “तुम्ही आपल्या कारकीर्दीची अनेक वर्षे मध्यपूर्वेतील (कट्टर इस्लामी) देशांमध्ये घालविली आहेत. तिथले वातावरण, तिथले विचार, तिथल्या चर्चा, तिथले लोक यांच्यात राहिलात. निवृत्तीनंतर तुमचा बहुतेक काळ अल्पसंख्यक आयोग, अलीगड मुस्लिम विद्यापीठ या वर्तुळातच गेला आहे. परंतु, गेली दहा वर्षे मात्र तुम्हाला एक वेगळी जबाबदारी मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक क्षणाला तुम्हाला संविधानाशी बांधील राहावे लागत होते आणि ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न केला. संविधानाच्या या बंधनामुळे तुमच्या मनाची, मूळ विचारांची कोंडी, घुसमट होत असण्याची शक्यता आहे. परंतु, आज तुम्ही या जबाबदारीतून मुक्त होत असल्यामुळे, यापुढे ही तगमग, ही घुसमट होणार नाही. आता तुम्ही तुमच्या मूळ वैचारिक बैठकीनुसार बोलू व लिहू शकाल.” बारकाईने बघितले तर, या भाषणातून नरेंद्र मोदी यांनी हमीदभाईंना जी जबरदस्त हाणली आहे, ते लक्षात येईल. कट्टर मुसलमानांच्याच सहवासात इतकी वर्षे राहिल्यामुळे हमीदभाईंची वैचारिक बैठकही तशीच झालेली दिसते, किंबहुना ती तशीच मुळात होती, असे मोदींनी अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. उपराष्ट्रपती झाल्यावर संविधानाच्या मर्यादेमुळे त्यांना आपल्या मूळ वैचारिक बैठकीमुळे स्पष्ट बोलता येत नव्हते. याचाच अर्थ, हमीदभाईंची मूळ वैचारिक बैठक व संविधानाचे सार यांच्यात विसंगती आहे. ती तशी नसती, तर हमीदभाईंना आपल्या मनातील विचार व्यक्त करताना संविधानाचा अडथळा आलाच नसता. आता हा अडथळा हटला आहे आणि हमीदभाई आपल्या संकुचित, मुसलमानी वैचारिक कोठडीत जाण्यास मोकळे आहेत. भारताच्या संवैधानिक सर्वोच्च पदावर आणखी एक मातीचे ढेकूळ बसवले गेले होते, अशीच नोंद इतिहास घेईल, याची हमीदभाईंनी खात्री बाळगावी.