दुर्ग भ्रमंती - अजिंक्यतारा
 महा त भा  11-Aug-2017


 

सातारा शहराच्या वैभवात मोलाची भर घालणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यास, मराठेशाहीच्या राजधानीचे ठिकाण असे बिरूद लाभलेले आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अजिंक्यतारा किल्ल्यासह सातारा शहरास विशेष महत्व प्राप्त झाले होते. पेशवाईमध्ये राज्यकारभाराची सर्व सुत्रे पुण्यामधून हलवली जातं होती, परंतु राज्यकारभार मात्र साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने चालवला जात होता.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ला हा सातारचा किल्ला किंवा सप्तर्षी म्हणून ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्यावरून सातारा शहर पाहता येते. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सातारा शहरात आल्यानंतर, जाता येते. सातारा येथील एस. टी. बस स्थानकामधून निघाल्यानंतर अदालत वाड्यामार्गे अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचता येते.

 

अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास :

प्रतापगडापासून विभक्त होणाऱ्या बामणोली डोंगररांगेवर अजिंक्यतारा किल्ला आहे. किल्ल्यावरून परिसरातील नांदगिरी, चंदन –वंदन आणि सज्जनगड हे किल्ले दिसतात. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ला तसा सातारा परिसरातील मोक्याचे ठिकाण आहे. सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) हा मराठेशाहीच्या राजधानीचे ठिकाण होते.

इतिहासातील नोंदीनुसार सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशीय राजा भोज (दुसरा) याने बांधला. कालांतराने सातारचा हा किल्ला बहामनी राजाकडे आणि त्यानंतर विजापूर येथील आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. आदिलशाही आणि मराठेशाहीच्या काळातच या किल्ल्यास विशेष महत्व प्राप्त झाले. पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी याठिकाणी नजरकैदेत होती, असे म्हटले जाते, तसेच बजाजी निंबाळकर यांना देखील या ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ रोजी हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इ. स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातारच्या या किल्ल्यास वेढा दिला, आणि अथक प्रयत्नानंतर सातारचा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात आला. त्यावेळी किल्ल्यावर मोघली निशाण फडकू लागले. त्यावेळी सातारच्या या किल्ल्याचे आझमतारा असे नामकरण करण्यात आले.

पुढे काही काळानंतर महाराणी ताराबाईंच्या मराठी सैन्याने हा किल्ला, मुघलांकडून जिंकून घेतला. त्यावेळी या किल्ल्याचे नाव “अजिंक्यतारा” असे ठेवण्यात आले. परंतु इ. स. १७०८ साली शाहु महाराजांच्या सुटकेनंतर, ते परत आले. त्यावेळी शाहू महाराजांनी अजिंक्यतारा किल्ला घेतला, आणि स्वत: चा राज्याभिषेक करून घेतला. दरम्यान शाहू महाराजांच्या वर्चस्वाखाली पेशवाईत हा किल्ला सामील झाला. त्यानंतर इ. स. १८१८ साली दुसर्‍या शाहु महाराजांच्या निधनानंतर अजिंक्यतारा किल्ला ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आला.

 

 

अजिंक्यतारा किल्ल्यावरील आणि परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :

सातारा शहर : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सातारा शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये वस्तू संग्रहालय, काही प्रसिद्ध ठिकाणे तसेच मंदिरे आहेत. या परिसराचा इतिहास प्रामुख्याने माराठेशाहीशी जोडलेला आहे.

 

अजिंक्यतारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा :  सातारा शहरामधून निघून किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर, त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत आपण वाहन घेवून जावू शकतो. या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. या दरवाज्याचे दोन्ही बुरूज सुस्थितीत आहेत. दरवाज्यावर काही देव देवतांच्या मुर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत. किल्ल्याचा दरवाजा सुर्यास्तानंतर बंद होतो, आणि सुर्योदयावेळी उघडण्यात येतो.

 

दुसरा दरवाजा :  पहिला मुख्य दरवाजा आणि दुसरा दरवाजा यांच्या दरम्यान एक दरवाजा आहे. मुख्य दरवाज्यापासून काही पायऱ्या चढून या दरवाज्यापर्यंत पोहचता येते. या दरवाज्यास दारे नाहीत, आणि या ठिकाणी थोडीशी पडझड देखील झालेली आहे. या ठिकाणी पुढे जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

 

हनुमान मंदिर, रत्नेश्वर मंदिर आणि महादेव मंदिर : दरवाज्यामधून आतमध्ये किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर समोरच हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था होवू शकते. मुख्य दरवाजापासून पुढे गेल्यानंतर महादेवाचे मंदिर आहे. याच परिसरामध्ये प्रसार भारती केंद्राचे कार्यालय आणि त्याच्या मागील बाजूस प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. किल्ल्याच्या परिसरात प्राचीन काळात बांधण्यात आलेले रत्नेश्वर मंदिर देखील आहे. किल्ल्याच्या परिसरात २०१४ साली सातारा नगरपालिकेकडून महाराणी ताराबाई यांच्या स्मृति प्रित्यर्थ स्मृति फलक लावण्यात आलेला आहे.

 

महाराणी ताराराणींचा राजवाडा : मंगळा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर महाराणी ताराबाई यांचा राजवाडा आहे. पडलेल्या अवस्थेत असलेल्या या राजवाड्याचे काही अवशेष देखील या ठिकाणी आहेत. याच परिसरामध्ये एक कोठार देखील आहे.

 

मंगळा देवी मंदिर : महादेव मंदिरापासून पुढे गेल्यानंतर मंगळा देवी मंदिराकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. या वाटेने पुढे गेल्यानंतर शेवटी देवीचे मंदिर आहे. मंगळा देवीच्या मंदिराच्या समोरील बाजूस मंगळाईचा बुरूज आहे. मंदिर परिसरात काही शिल्प देखील आहेत.

 

तुपाचा रांजण : अजिंक्यतारा किल्ल्यावर जमिनीमध्ये खोदण्यात आलेला एक खोल तुपाचा रांजण किल्ल्यावर आहे. या रांजणातील तूप जखमी सैनिकांच्या जखमेवर लावले जात असे.

 

या व्यतिरिक्त किल्ल्यावर चुन्याचा घाना, नवीन बांधण्यात आलेला तलाव आणि काही अवशेष आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावरून परिसरातील यवतेश्वराचे पठार, चंदन वंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड पर्यंतचा परिसर दिसतो.

इतिहासामध्ये माराठेशाहीची राजधानी म्हणून कामकाज चालवलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याची पडझड झालेली आहे. आजच्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावरील काही इमारती केवळ अवशेषरुपी अस्तित्वात आहे. परंतु इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या वारसा स्थळास भेट देवून, येथील इतिहास जाणून घेणे खूप आनंददायक आहे.

 

- नागेश कुलकर्णी