मा. उद्धव ठाकरेंना मुंबईकराचे पत्र...
 महा त भा  10-Aug-2017


 

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांस... तसा आपला संबंध तो निवडणुकांपुरताच! पण आज तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, ‘बेस्ट’ने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी संप पुकारला आणि ‘शिवबंधना’च्या तुमच्या मध्यस्थीने ‘बेस्ट’ कर्मचा-यांनी 16 तासांत संप मागे घेतलाही. कर्मचा-यांचा पगार यापुढे वेळेवर होईल, अशी हमीही तुम्ही दिली. तसेच पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणालात की, “बेस्टचा आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र झाला तर हे प्रश्न उद्भवणार नाही. दोन्ही बजेट एकत्र होतील,” असे तुम्ही वचननाम्यात मुंबईकरांना वचन दिले होते. निवडणुकीत तुमच्या पक्षाचा निसटता विजय झालाही, पण मग या निर्णयाची अंमलबजावणी अजून का बरं झाली नाही? हा प्रश्न जर राज्य सरकारचा असेल, तर तुम्ही सरकारमध्ये सामील आहात याचा विसर तुम्हाला पडला का?

उद्धवसाहेब, तशी तुमची राजकीय कारकीर्द वाखाणण्याजोगी. तुम्ही राजकारणाचा वारसा आपले वडील हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतला. पक्षाबाहेर तसेच पक्षांतर्गतही तुमचे शत्रू होतेच. अगदी पक्षात नारायण राणे आणि चुलत बंधू राज ठाकरे यांचे आव्हानही तुम्ही समर्थपणे पेलले. त्यामुळे आतून-बाहेरुन तुमच्या नेतृत्वावर, अस्तित्वावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली गेली. पण कार्याध्यक्ष म्हणून महत जबाबदारी स्वीकारल्यानंतर अगदी नेमस्त पद्धतीने तुम्ही जी कार्यकर्त्यांची मोट बांधली, संघटनेत जे सर्वसमावेशक बदल केले, ते तुमच्या कामी आले. परिणामी मुंबई, ठाणे, औरंगाबाद पालिकांवर भगवा डौलाने फडकत राहिला. बाळासाहेब गेल्यानंतर तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी तुम्ही न डगमगता भाजपच्या खांद्याला खांदा लावून लोकसभा निवडणूक जिंकली. नंतर विधानसभेसाठी तुमच्या युवराजांनी १५० जागांचा बालहट्ट धरला, जो तुम्हाला मोडवला नाही आणि त्याची परिणती २५ वर्षांची युती तुटण्यात झाली. मोदी लाटेतसुद्धा तुम्ही ६३ आमदार निवडून आणले. नाही नाही म्हणता खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही सत्तेत सहभागीही झालात. २०१७ साली मुंबई-ठाण्यासह १२ महानगरपालिकांच्या निवडणुकीत तुम्ही आपले बालेकिल्ले राखलेत, पण मुंबईत मात्र भाजपच्या प्रभावामुळे विजयश्रीची माळ अवघ्या काही फरकाने तुमच्या गळ्यात पडली. मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला खरा, पण तुम्ही मुंबईकरांना काय दिले? मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न मोठा. त्यावर आरजे मलिष्काने आवाज उठवला. तिला आपल्या कामातून उत्तर देण्याऐवजी तुमच्या किशोरीताईंनी कसेबसे शब्दांचे खेळ करुन स्वत:चेच हसे करुन घेतले. तुमच्यावर जेव्हा स्पष्टीकरण देण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही चक्क “मुंबईत पाऊसच एवढा पडतो, त्याला पालिका काय करणार?” असे म्हणत खड्ड्यातील डबक्यांचे शिंतोडेच जणू मुंबईकरांवर मुद्दाम उडवलेत. आता पाऊस पडतो म्हणून काय मुंबईकरांनी घराबाहेर पडणे बंद करावे का? एवढी वर्षं तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे कारभारी म्हणून करोडोंचा ‘अर्थ’संकल्प असलेल्या पालिकेची जबाबदारी कशीबशी सांभाळलीत. पण तरीही या मायानगरीचे विकासाचे मॉडेल उभे करण्यात तुम्ही कमी पडलात साहेब... त्यामुळे असे भावनिक आवाहनाचे राजकारण करून तुम्ही किती काळ सत्ता उपभोगणार? जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा”मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे,” अशी आवई तुमच्या वांद्र्याच्या गडातून उठवली जाते. मराठी आणि अमराठी लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जातो. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत तुम्ही 286 उमेदवार उभे केले. भाजपच्या पंकजा मुंडे आणि भायखळ्याच्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळींसमोर तुम्ही उमेदवार उभे केले नाही. का तर पंकजाताईंना तुम्ही बहीण मानता, ही सबब तुम्ही पुढी केली. पण गीता गवळींचे काय? त्यांचे वडील अरुण गवळी तर तुमच्याच पक्षाच्या जामसांडेकर यांच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. तुमच्या या निर्णयामुळे जामसांडेकर कुटुंबीयांना काय वाटले असेल? काळबादेवी येथे अग्निकांडात अग्निशमन दलाच्या जवानांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार त्यांना शहीद दर्जासुद्धा दिला, पण अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी तुम्ही काय ठोस उपाययोजना केल्यात? अग्निशमन जवानांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय पावले उचललीत? बेस्टच्या संपाबाबतही तसेच. “जर बेस्टमध्ये सुधारणा झाल्या नाही, तर बेस्ट बंद पडेल,” असे तुम्ही म्हणालात? पण सुधारणा करण्यासाठी तुम्हाला कोणी अडवले होते? आता एवढ्या वर्षानंतर महापौरही तुमचाच आणि उपमहापौरही तुमचाच. मग घोडं अडतंय कुठे? अब्राहम लिंकन  म्हणाले होते की, “काही लोकांना सर्व काळ फसवता येते, सर्व लोकांना काही काळ फसवता येते, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसवता येत नाही.” तेव्हा, उद्धवजी हे वचनही जरा स्मरणात असू द्या आणि तुम्ही काही तरी ‘करुन दाखवाल’ ही अजूनही या आशावादी मुंबईकराची अपेक्षा...

 

- तुषार ओव्हाळ