संध्याछाया 
 महा त भा  10-Aug-2017


 

गेल्या आठवड्यात परदेशातून आलेल्या मुलाला आपल्या मुंबईत एकट्या राहाणाऱ्या आईचा सांगाडा सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि म्हातारपणातल्या एकटेपणाचा प्रश्न मीडियामधून जोरकसपणे चघळला गेला. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातल्या एका इमारतीत, ६३ वर्षांच्या आशा सहानी त्यांच्या नवऱ्याचा २०१३ मध्ये मृत्यू झाल्यापासून एकट्याच रहात होत्या. त्यांचा मुलगा आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाला होता. ही कहाणी तशी प्रातिनिधिक आहे. मुलं परदेशात स्थायिक आणि आई-वडील भारतात ही परिस्थिती आज आपल्याला भारतातल्या अनेक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरांमधून सर्रास दिसते. त्यात नवीन असं काही नाही. पण ह्या प्रकरणात सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही होती की आशा सहानी ह्यांच्या मृतदेहाचा मांस कुजून सांगाडा होईपर्यंत कुणालाही खबर लागली नाही.

 

त्या इमारतीत राहाणारे इतर रहिवासी म्हणतात की, आशा साहनी एकट्याच राहायच्या, सगळ्यांशी फटकून वागायच्या. त्यामुळे त्यांच्या चौकशीला सहसा कुणी जात नसे. त्यात ज्या मजल्यावर त्या राहायच्या, त्या मजल्यावरचे दोन्ही फ्लॅट त्यांचेच होते. त्यामुळे मृतदेहाची दुर्गंधीही इतर रहिवाश्यांना आली नाही. त्यांच्या मुलाशी म्हणे त्यांचं अखेरचं फोनवरचं संभाषण एप्रिल २०१६ मध्ये झालं होतं आणि तेव्हा म्हणे त्यांनी 'आपल्याला खूप एकटेपणा जाणवतो म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात आपली राहण्याची व्यवस्था कर' असं आपल्या मुलाला सांगितलं होतं. पण मग मुलाने आईला त्यानंतर फोन का केला नाही, मुंबईत त्यांचे कुणी न कुणी नातेवाईक, शेजारी असतील त्यांना फोन करून आईची चौकशी करायला का सांगितलं नाही हे निव्वळ अनाकलनीय आहे. मुलामध्ये आणि आईमध्ये नियमित फोनपुरताही संवाद राहिलेला नव्हता हे मातृप्रेमाचे आणि पुत्रधर्माचे गोडवे गाणाऱ्या समाजासाठी न पचणारे आहे.   

 

भारतीय कुटुंबव्यवस्थेचे, आपल्या समाजाच्या एकमेकांना धरून राहण्याच्या प्रवृत्तीचे आपण खूप गोडवे गातो. त्याचा समाजात असे काही घडते हे खरोखरच धक्कादायक आहे. अगदी शेजाऱ्यांशी संबंध नसले तरीही साधारण कुठल्याही शहरी घरात दिवसातून बऱ्याच लोकांची वर्दळ असते, पेपरवाला, दूधवाला, कामवाली बाई, कुणी न कुणी येत जात असतं. तरीही असा एकाकी, चटका लावणारा अंत एखाद्या दुर्दैवी बाईच्या नशिबी येतो आणि तिचा मृत्यू होऊन दिवसचे दिवस उलटले तरी कुणाला त्याचा पत्ताही लागत नाही हे खरोखरच एक समाज म्हणून आपल्यासाठी मान खाली घालायला लावणारे आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ललिता पवार ह्यांचा असाच पुण्यात चटका लावणारा, एकाकी मृत्यू झाला होता. त्यांचे कुटुंबीय मुंबईत होते आणि त्या गेल्या हे चार-पाच दिवस कुणाला कळलेही नाही. असा मृत्यू कुणालाही येऊ नये.  

 

म्हातारपणी काहीसा एकटेपणा हा अपरिहार्य असतो. जीवनाच्या जोडीदारांपैकी कुणीतरी एक आधीच पुढे निघून गेलेला असतो किंवा असते आणि मागे उरणाऱ्या व्यक्तीच्या नशिबी येतात दिवसाचे रिकामे चोवीस तास आणि एक भयाण पोकळी. ज्यांची मुलं त्यांच्यासोबत किंवा जवळपास राहतात त्यांच्यासाठी हा एकटेपणा जरातरी सुसह्य असतो. ज्यांचं शरीर सुदृढ असतं आणि आर्थिक परिस्थिती साथ देते ते ज्येष्ठ नागरिक लोक त्या मानाने सुदैवी. त्यांना स्वतःचं मन कशात न कशात रमवणं शक्य असतं आणि तसं ते करतातही. एखाद्या कुटुंबाचा सांस्कृतिक पाया कसा आहे त्यावर त्या कुटुंबातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते. 

 

कुटुंबातल्या सर्वांना एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर असेल बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी दोन पिढ्यांचे सहजीवन तसे सोपे जाते. पण आजकालची सामाजिक परिस्थिती अशी आहे की एकाकी आई-वडील भारतात आणि मुलं परदेशांत असं चित्र आपल्याला देशभर दिसतं. अश्या वृद्धांना सहसा पैशाची वानवा नसते पण त्यांना अपेक्षित असतो तो वेळ आणि माणसांची साथसंगत. त्या गरजा भागवण्यासाठी मग बाजारपेठ पुढे सरसावते. सर्व सोयींनी युक्त असे सिनियर लिविंग कॉम्प्लेक्स उभे राहतात जिथे ह्या नागरिकांची खाण्या-जेवण्यापासून मनोरंजनापर्यंतची सर्व काळजी घेतली जाते. हे लोण आपल्याकडे आले ते परदेशातून. पण आता असे सिनियर लिविंग कॉम्प्लेक्स भारतातल्या जवळजवळ सर्वच मोठ्या शहरांमधून दिसतात आणि ते अपरिहार्य आहे. कारण मनात असलं तरी बऱ्याच मुलांना परदेशातलं यशस्वी करियर तडकाफडकी सोडून भारतात परत येता येत नाही आणि एका वयानंतर तो लांबचा प्रवास, परदेशातलं ते वेगळं वातावरण, प्रत्येक कामासाठी मुलांवर अवलंबून राहणं ह्या गोष्टी आई-वडिलांना झेपत नाहीत. त्यामुळे ते आयुष्याची संध्याकाळ भारतातच घालवणं पसंत करतात. 

 

एकटेपणा, परावलंबित्व, शरीराच्या कुरबुरी यामुळे म्हातारपण सोसणं सगळ्यांनाच कठीण होतं. त्यात नाही म्हटलं तरी पावलापावलाने जवळ येणाऱ्या मृत्यूचंही भय माणसाला भेडसावत असतंच. ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर स्वतःला कशात न कशात गुंतून ठेवणं, आजूबाजूला असलेल्या लोकांबरोबर प्रयत्नपूर्वक चांगले संबंध जोपासणं महत्वाचं आहे. जेरोन्टोलॉजिकल म्हणजे वृद्धत्वावरचं संशोधन असं सांगतं की दूरदर्शी आर्थिक नियोजन, आरोग्याची योग्य ती काळजी, कुटुंबातल्या, नात्यातल्या इतर लोकांशी प्रयत्नपूर्वक संवाद जोपासणं आणि मुख्य म्हणजे स्वतःला एखाद्या कामात किंवा छंदात गुंतवून ठेवणं जर जमलं तर वृद्धत्वाच्या 'स्लॉग ओव्हर्स' आनंदी होऊ शकतात. 

 

जे आज तारुण्यात आहेत, माध्यम वयात आहेत त्यांचीही कर्तृत्वाच्या रुळांवर सुसाट धावणारी गाडी कधीतरी म्हातारपणाच्या वळणावर रेंगाळणारच आहे. प्रत्येकानेच हा विचार करून आपल्या कुटुंबातल्या किंवा आसपास एकट्याने राहणाऱ्या वृद्धांची आवर्जून चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी बोलायला, संवाद साधायला थोडा वेळ मोकळा ठेवला पाहिजे. आयुष्याचा प्रवाह फार वेगात वाहत असतो हे खरंच आहे, पण त्या प्रवाहाबरोबर वाहत असताना काठावर आराम करत असलेल्या लोकांची चौकशी करणंही महत्वाचंच आहे. आजकाल आयुर्मान वाढलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्याच हातात वृद्धत्वाची चार पानं जास्तीच येणार आहेत. ती व्यवस्थित नियोजन करून खेळता आली तरच डावात मजा आहे. 

 

- शेफाली वैद्य