परीक्षेची भीती दूर करणारी ’रोशनी’
 महा त भा  10-Aug-2017


 

महात्मा गांधींच्या ’करू किंवा मरू’ या संकल्पनेचा आता ’करणार आणि करत राहणार’ असे ब्रीद ठेऊन त्यात गरिबी निर्मूलन, युवकांना रोजगार, साक्षरता, महिला विकास, कुपोषणमुक्त भारत या पाच संकल्पनांवर बुधवारी मोदींनी ’चले जाव’आंदोलनाच्या ७५व्या वर्षानिमित्त लोकसभेत भाषण केले. साक्षरतेचा हा वसा अशाच एका युवतीने हाती घेतला. बंगाली कुटुंबातील रोशनी मुखर्जी या युवतीने बारावीत ९६ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न न बघता शालेय परीक्षांना घाबरणार्‍या नववी ते बारावीतील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे काम हाती घेतले आहे. अवघ्या पाच वर्षांत रोशनीने जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन साक्षर केले आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे तिचे स्वप्न आहे.

 

रोशनीला कॉलेजपासूनच शिकविण्याची आवड होती. कॉलेजमध्ये असतानाही ती परीक्षेच्या वेळी मित्र-मैत्रिणींना कोणताही विषय समजावून सांगायची, तेव्हा ते सगळ्यांना आवडायचेही आणि नीट समजायचेही. त्यामुळे रोशनीमधील शिकवण्याची आवड अजूनच वाढत गेली. हे सगळं चालू असताना तिला कॉलेज कॅम्पसमध्येच झालेल्या एका मुलाखतीतून आयटी कंपनीत नोकरी मिळाली. नोकरी सांभाळूनच रोशनीने २०११ मध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वतःचे एक यूट्यूब चॅनेल सुरू केले.विद्यार्थ्यांना ज्या विषयाची सर्वात जास्त भीती वाटते, ते म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशाशस्त्र, जीवशास्त्र आणि गणित.रोशनी हे विषय शिकवतानाचे स्वतःचे व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड करते. तिची शिकवण्याची पद्धत आणि मोफत शिक्षणाच्या सोयीमुळे तिच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि रोज दोन व्हिडिओ याप्रमाणे तिने पाच वर्षांत तब्बल चार हजार व्हिडिओवरून कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षित केले. रोशनीला मिळालेला प्रतिसादही खूप चांगला होता. कालांतराने तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला याच कामात पूर्णपणे झोकून द्यायचे ठरवले.

 

तिच्या examfear.com या यूट्यूब चॅनेलवरून ती अजून बर्‍याच मुलांची परीक्षेची भीती नाहीशी करेल यात शंका नाही. या तिच्या कामात तिला तिच्या पालकांकडून, पतीकडून चांगलीच साथ मिळाली. तिच्या या कार्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून राष्ट्रपती भवनात तिचा गौरवदेखील करण्यात आला होता.

 

रोशनीला ती करत असलेल्या या महान कार्यात असेच यश लाभो, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

 

- पूजा सराफ