Bhoomi: तुरुंगातून सुटल्यावर संजूबाबाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित
 महा त भा  10-Aug-2017

 

अभिनेता संजय दत्त याचा २०१६ साली तुरूंगातून सुटका झाल्यानंतरचा पहिलाच ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ‘भूमी’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. संजय दत्त याने स्वत: त्याच्या ट्वीटर अकाऊंट माध्यमातून हा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. या चित्रपटात संजय दत्त नेहमीप्रमाणे हटके भूमिका साकारतांना आपल्याला दिसणार आहे.

 Embeded Object

या ट्रेलरमध्ये त्याच्या मुलीच्या संरक्षणासाठी संजय दत्त जबरदस्त लढतांना दाखवला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्त याने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. एका बाप-लेकीची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपल्या मुलीच्या अब्रूसाठी हा बाप चक्क जगाशी लढतांना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून संजय दत्त याच्या मुलीची अब्रू लुटली जाते, व त्यानंतर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संजय दत्त सगळ्या जगाशी वैर पत्करतांना या ट्रेलरमध्ये दिसला आहे.

 

या चित्रपटात संजय दत्त याच्या मुलीची भूमिका अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार हे आहेत. २२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात दोषी  आढळून आलेला संजय दत्त तुरुंगातून बाहेर आल्यावर पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.