१६ वर्षीय हर्षीत शर्माला गूगलकडून १.४४ कोटीची ऑफर
 महा त भा  01-Aug-2017


 

१६ वर्षीय हर्षीत शर्माला माहिती तंत्रज्ञान जगातील बलाढ्य कंपनी गूगलकडून १ कोटी ४४ लाख वार्षिक पगाराची नोकरी देण्यात आली आहे. हर्षीत हा चंदिगढ येथील रहिवासी असून, कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. लवकरच हर्षीत गूगलमध्ये रुजू होणार आहे.

लहानपणापासूनच हर्षीतला ग्राफिक्स डिझाईनची मोठ्या प्रमाणात आवड होती. त्याने गूगलच्या जॉब पोर्टलवर मे महिन्यात नोंदणी करून ठेवली होती. त्यानंतर त्याची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. त्यात त्याच्या विविध चाचण्या घेतल्या गेल्या. सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर हर्षीतची निवड करण्यात आली आहे.

हर्षीत चंदिगढ येथील शासकीय मॉडेल सिनियर सेकंडरी स्कूल, सेक्टर ३३ येथे इयत्ता १२ वी चे शिक्षण घेत आहे. त्याचे आई-वडील शालेय शिक्षक आहेत. मध्यामवर्गीय कुटुंबातून आलेला हर्षीतच्या कुटुंबात मोठे आनंदाचे वातावरण आहे.

त्याला गूगल तर्फे १ वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर तो कामावर रुजू होईल. प्रशिक्षण काळ दरम्यान त्याचा पगार महिन्याला ४ लाख एवढा असेल, त्यानंतर १२ लाख प्रती महिना पगार त्याला दिला जाईल.