‘तो’ ठरला पर्यटकांसाठी देवदूत
 महा त भा  01-Aug-2017
 

 
 
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले ३८ वर्षीय सलीम शेख यांंनी अमरनाथ यात्रेदरम्यान बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर आज देशाच्या कानाकोपर्‍यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
सलीम शेख हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी छोट्या-मोठ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये चालक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. खरंतर एक बसचा चालक म्हणून त्यांनी आयुष्यात आतापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास केला खरा. मात्र, त्या दिवशी त्यांनी केलेला तो जीवघेणा प्रवास त्यांच्या कायमस्मरणात राहील, असा काहीसा होता. या घटनेतून सलीम सावरले असले तरी त्या दिवशीचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोरून जात नाही. अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेली बस गुजरातमधील वलसाड येथील ओम ट्रॅव्हल्स कंपनीची होती. याच बसमधून चालक सलीम शेख अमरनाथ येथून भाविकांना घेऊन कटराकडे जात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून बसमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सर्व पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. मरण समोर दिसत असताना त्या परिस्थितीतही सलीमने धाडस दाखवत बस न थांबविण्याचा निर्णय घेतला आणि बस वेगाने नेण्यास सुरुवात केली. पर्यटकांनी सलीमला वारंवार बस थांबविण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार सुरू असताना दहशतवाद्यांची एक गोळी बसच्या टायरला लागली, तरीही सलीमने बस न थांबवता तशीच पळवत लष्कराच्या कॅम्पपर्यंत नेली.
 
या खासगी बसमध्ये एकूण ६१ प्रवासी होते, परंतु या गोळीबारामध्ये आठजणांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबत सलीम शेख म्हणतात की, ’’त्या क्षणाला मी जे काही धाडस केले, ते करण्यासाठी देवाने मला प्रोत्साहन दिले, पण बसमधल्या आठ भाविकांचे जीव मी वाचवू शकलो नाही, याची मला आयुष्यभर खंत राहील. आठ ते दहा दिवसांपासून या सर्व पर्यटकांसोबत एकत्र होतो. आमच्यामध्ये वेगळे नाते निर्माण झाले होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या. खूप मजा-मस्ती केली. पण आमच्यासोबत असे काही होईल, असे कधीच वाटले नाही. या घटनेमध्ये आठजणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांपैकी दोघेजण माझ्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायचे आणि मी ते हट्टाने मागायचो. मात्र, त्या दोन व्यक्ती आज माझ्यापासून कायमच्या लांब गेल्या आहेत. असे व्हायला नको होते. जे लोक हल्ल्यात किरकोळ जखमी झाले होते, ते नंतर माझ्याकडे येऊन मला धन्यवाद देत होते, पण त्यांना द्यायला माझ्याकडे काहीही उत्तर नव्हते. कारण तिथे फक्त सगळीकडे रक्त आणि मृत्यूचे तांडव होते. मला इतका मोठा धक्का बसला होता की, जवळपास दीड तासानेही मला आजूबाजूला काय घडते आहे ते समजत नव्हते.’’ ही घटना घडल्यानंतर सलीमयांचे आयुष्य काहीसे बदलून गेले. आतापर्यंत एक सामान्य चालक म्हणून ओळख असलेले सलीमशेख आता खरे ‘हिरो’ बनले आहेत. सलीमयांनी बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचे देशभरातून सत्कार करण्यात आले. तसेच जम्मू-काश्मीर सरकारने त्यांना तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांच्या शौर्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!!!
 
- सोनाली रासकर