जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटला 'सातबारा'
 महा त भा  01-Aug-2017


अकोला : महसूल दिनाचे औचित्यसाधून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांड्ये यांनी तब्बल १२ किमीचा सायकल प्रवास करत, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्याच्या सातबाराच्या प्रतींचे वाटप केले. तसेच सुदृढ आरोग्याचा संदेश देत. यापुढे प्रत्येक महिन्याच्या १ तारीखेला जिल्हात 'सायकल डे' साजरा केला जावा, असे आदेश दिले आहेत.


आज सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी पांड्ये हे सायकलवरून शेतकऱ्याच्या वेशात चांदूर गावात पोहचले. पांड्ये यांच्यासह यावेळी प्रशासनातील इतर अधिकारी आणि पोलीस कर्मचारी देखील सायकलवरून गावात पोहचले. यानंतर पांड्ये यांनी गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सातबाऱ्याच्या संगणकीकरण करण्यात आलेल्या प्रतींचे वाटप केले. व त्यांच्याशी संवाद साधला. तसेच बैलगाडी चालवण्याचा आनंद देखील त्यांनी यावेळी घेतला.


सायकल चालवण्यामुळे मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरणाला देखील याचा फायदा होतो. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी सर्वांनी सायकल चालवणे गरजेचे आहे. यामुळे पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींचे जतन होईल, असे मत पांड्ये यांनी यावेळी व्यक्त केले. व जिल्ह्यातील नागरिकांनी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सायकल डे साजरा करावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


सातबारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे संगणकीकृत सातबारा उतारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. व महसूल दिनाचे औचित्यसाधत या खास उपक्रमातून या उताऱ्यांचे वाटप केले.