विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५
 महा त भा  07-Jul-2017

 


 

अवंती : मेधाकाकू, आता अजून एक गंम्मत सांगायचीये तुला. आता मी घरी गेले ना की, आजी, मला आधी तिच्याजवळ बसवेल आणि आपल्या म्हणींच्या अभ्यासाविषयी चौकशी करेल. आणि मज्जा येते जेंव्हा मी कॉलर टाईट करून, तिला माहिती नसलेल्या म्हणी समजाऊन सांगते तेंव्हा...!!

 

मेधाकाकू : अरे वा, म्हणजे “आजी खुश हुई” असे आहे तर फारच छान..! अवंती, तुला लक्षात असेलच, कालच्या गप्पांमध्ये आपण काही वैयक्तिक गुणवत्ता जोपासणीचा सल्ला देणारे वाकप्रचार पहिले. तसेच व्यक्तीच्या विविध मनोवृत्तींवर टिप्पणी करणारे, माणसाने कसे असू नये, ते चार-सहा शब्दात सांगणारे वाकप्रचार आहेत आपल्या भाषेच्या खजिन्यात. मला एक गोष्ट सतत जाणवत असते ती अशी की आपल्या पारंपरिक मराठी समाजाची सामूहिक विनोदबुद्धी, संदर्भ किंवा धृष्टांत देताना शब्दाची चाणाक्ष निवड आणि वाक्याची चपखल मांडणी किती छान असते. आता हाच वाकप्रचार फक्त वाचलास तरी तुला नक्की हसू फुटेल पटकन...!!!   

 

जन्माउपर खाल्लें पान आणि थुंकतां थुंकतां गेला प्राण.  

अती उत्साहात एखादे काहीतरी करायला गेले की त्याचा परिणाम काय होतो ते त्याचे या वाकप्रचारात छान वर्णन केले आहे. इथे आयुष्यात प्रथम पान खाल्ले तर काय दुष्परिणाम होऊ शकतो याचे सुंदर रूपक वापरले आहे. शरीराला सवय नसताना; अनुभव नसताना, योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय असे काही करू नका, असा सल्ला इथे मिळतोय. पान खाऊन थुंकताना प्राण जाण्याची वेळही येईल असा अतिशयोक्ती अलंकाराने सजलेला धडा आहे हा.  

    

अवंती : मेधाकाकू, अरे एकदम सही आहे हा धडा. अगं उन्हाळी सुट्टीत मामाच्या घरी गेलो होतो ना तेंव्हा काजुगराची अशीच गम्मत झाली होती. आदित्यला काही अनुभव नसताना त्याने तो काजुगर खाल्ला आणि दोन दिवस तोंड आणि हात चुरचुरत होते त्याचे.

 

मेधाकाकू : अवंती, आता इथे, तू म्हणालीस अगदी तस्साच, वरचाच धडा एका वेगळ्या पद्धतीने सांगितलाय. फार सहज लक्षात येते आपल्या की घाईने घेतलेला निर्णय का चुकतो. कुठलाही निर्णय घेताना सावध रहाणे का आणि  कसे फायदेशीर असते...!!

 

केले नाही तंववर जड खाल्ले नाही तंववर गोड.

एखादी वस्तु खूप जड असेल किंवा एखादे काम कठीण असेल असे आपण नुसते त्याच्याकडे बघून ठरवून टाकतो. मात्र ते काम आपल्या हाताने केल्यावर आपला अंदाज चुकल्याचे लक्षात येते. अगदी अशीच गोष्ट बाजारात दिसणार्‍या रंगीत मिठाईची आणि चमचमीत खाऊची. त्या रंगाने आकर्षित होऊन आणि दरवळणार्‍या वासाने तोंडाला पाणी सुटते आणि मग न राहवून आपण असे पदार्थ विकत घेतो आणि मग पुन्हा आपला अंदाज चुकल्याचे लक्षात येते. उत्तम अर्थान्तरन्यास अर्थालंकार, पहिल्या विधानाच्या समर्थनार्थ लगेच उदाहरण देणे...!!

 

अवंती : गुरु मेधाकाकू, तुला नमस्कार.!! दोन दिवसांनी गुरु पोर्णिमा आहे, तेंव्हा गुरु म्हणून तुझ्याप्रती आदर भावना का आणि कशी व्यक्त करायची ते आजीने मला छान समजाऊन सांगितले आहे कालच...!!     

 

मेधाकाकू : अवंती तुला अनेक आशिर्वाद !! म्हणजे अभ्यासाने हे पारंपरिक धडे आधी नीट समजून घेतले तर त्याचा फायदाच होईल हे पटले तर तुला !! आता इथे एक वेगळी अंधश्रद्ध आणि स्वार्थी प्रवृत्ती कसे काम करते बघूया आपण. दानधर्म म्हणजे मोक्ष प्राप्तीचा सश्रद्ध मार्ग आहे अशी लोकश्रुति आहे. काही कौटुंबिक मंगलकार्य निमित्ताने स्वत:ची तूला करून, आपल्या वजना एवढे द्रव्य गरजूंना दान देणे हा श्रद्धेचा रिवाज आहे. मात्र पटकन मोक्ष प्राप्तीचा मार्ग, अंधश्रद्ध, लबाड आणि लोभी मंडळींना माहीत असतोच आणि त्या पायी स्वत:ला आणि भगवंतालाही फसवायला तयार असतात अशी मंडळी...!!

 

गाजरांची तुला आणि विमानाची वाट.

आता या वाकप्रचारात अशा लोभी वृत्तीचा शॉर्टकट वर्णन केलाय. स्वत:ची तूला नक्की करायची मात्र ती गाजराची. कारण शंभर किलो गाजर आणि १०० किलो सोने किंवा चांदी यात स्वस्त काय, ते त्यांनी ओळखलेले आहे आणि मग यातली अंधश्रद्धा अशी की चला, आपली गाजर तूला झाली, दान धर्म केला. मोक्षाप्रत म्हणजे तुकोबा सारखे वैकुंठला न्यायला आता आपले विमान येणारच. त्याची आता वाट पाहायची. फार प्रयत्न न करता मोठ्या प्राप्तिची अपेक्षा ठेवायची !! विरोधाभास अर्थालंकाराचे समर्पक उदाहरण...!!               

 

अवंती : सॉलिड एक्सायटिंग आहे सगळं मेधाकाकू...!! ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी नक्की येणारे मी. आता राम राम करते...!! 

 

- अरुण फडके