पर्यावरणासाठी एकत्र या, शिंजो आबे यांचे जी-२० देशांना आवाहन
 महा त भा  05-Jul-2017पर्यावरण हा विषय आज जागतिक पातळीवर अत्यंत महत्वाचा विषय आहे. यासाठी जी-२० देशांनी एकत्र येवून कार्य करणे आवश्यक आहे. आज जर आपण स्वच्छ पर्यावरणाची जबाबदारी घेतली तरच आपल्या पुढच्या पिढीचे आरोग्य आणि आयुष्य सुखात असेल. असे प्रतिपादन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले. जी-२० शिखर परिषदेपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिंजो आबे यांनी अलिकडे झालेल्या हवामान बदलासाठी जी-२० देशांनी काही धोरणांवर एकत्र कार्य करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. पर्यावरण हा विषय आता संपूर्ण जगासाठी एक आव्हान आहे. त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

२०१५ मध्ये करण्यात आलेला पॅरिस करार हवामान बदलाच्या प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नांपैकी एक होता, मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका या करारातून बाहेर पडला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इतर देशांमधील असेलेले मतभेद यामधून दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आबे म्हणाले की, "हवामान बदल हा विषय खूप महत्वपूर्ण आहे, आणि आपल्या पुढील पिढीसाठी आपणच आता ती जबाबदारी घ्यायला हवी, त्यामुळे आपसातील मतभेद विसरून या विषयावर सर्व जी-२० देशांनी एकत्र यावे."