अमेरिकन युद्ध नौकेची चीनच्या सागरी प्रदेशात घुसखोरी
 महा त भा  04-Jul-2017गेल्या काही दिवसापासून चीन-अमेरिका यांच्यात सुरु असेलेला तणाव आता चांगलाच वाढला आहे. अमेरीकेच्या युद्धनौकेने चीनच्या सागरी भागात अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे चीनने आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने अमेरिकेने घुसखोरी केलेल्या भागात पाठवली आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहेत.


चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार काल अमेरिकेची युद्धनौका यूएसएस स्टेटहेम या युद्धनौकेने चीनच्या जिशा या बेटाजवळ सागरी सीमेत अनधिकृतपणे प्रवेश केला आहे. असे करून अमेरिका चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत, अमेरिकेच्या या कृतीमुळे सागरी क्षेत्रातील शांततेला धोका निर्माण झाला आहे, तसेच यामुळे दोन्ही देशातील संबंध देखील बिघडतील, असे चीन मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


याच बरोबर अमेरिकेच्या या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी चीनने आपल्या युद्ध नौका आणि लढाऊ विमाने या भागाकडे रवाना केली असल्याची माहिती चीन मंत्रालयाचे प्रवक्ते वू क्वियन यांनी दिली आहे. अमेरिकेच्या या अनपेक्षित कृतीमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाला तडा गेला असल्याचे देखील वू यांनी म्हटले आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारा दरम्यान 'वन चायना' पॉलिसीला असलेला अमेरिकेचा पाठींबा काढून घेण्याचे वक्तव्य केले होते. तेव्हापासून अमेरिका आणि चीनच्या या संबंधात मिठाचा खडा पडला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. नुकतेच अमेरिकेने तैवान बरोबर शस्त्र विक्री करार केला आहे व उत्तर कोरियाला मदत करत असल्याच्या आरोपावरून एका चीनी बँकेवर देखील बंदी घातली आहे. या दोन मुद्द्यांवर देखील चीन अमेरिकेवर आग पाखाड केली होती.