शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : "एल" 
 महा त भा  04-Jul-2017बरेचदा एखाद्या चित्रपटात किंवा लघुपटात काय बघायला मिळणार याचा अंदाज आपल्याला त्याच्या नावावरून येतो. मात्र या लघुपटात तसं नाहीये. 'एल' हे एक इंग्रजी बाराखडीतील अक्षर आहे. गाडी शिकत असताना "लर्निंग" ची खूण दाखवण्यासाठी इंग्रजीतील 'L' या अक्षराचा उपयोग केला जातो. त्याने कळतं की गाडी चालवणारी व्यक्ती अजून गाडी शिकते आहे. तसंच काहीसं सांगणारा हा लघुपट आहे. 

आपल्या इथे अजूनही अनेक घरांमधून, गावांमधून मुलींना सायकल, गाड्या चालवता येत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना तशी कधी गरज पडत नाही, कारण नेहमी त्यांच्या रक्षणासाठी त्यांना सोडायला, घ्यायला त्यांचे वडील, भाऊ हे असतातच. आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे, त्यांना एकटं पाठवायचं नसल्याने सायकल गाडी शिकवली जात नाही. ही कहाणी देखील अशाच एका बाईची आहे. नवरा नवीन गाडी घेतो. 'स्कूटर'. तिला ती स्कूटर चालवायची खूप इच्छा असते, मात्र तिला चालवता येत नाही. ती नवऱ्याला शिकवायला म्हणते तर तो म्हणतो आधी सायकल शिकून घे. ती म्हणते तुम्हीच शिकवा... तर जग त्याच्यावर हसेल या भितीने तो नकार देतो...

पण मग पुढे काय?.. ती सायकल शिकते? तिला जमतं? का ती तशीच केवळ गाडी चालवण्याची इच्छा मनात घेवूनच जगते? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा. 

एक सुंदर संदेश या ४.३० मिनिटांच्या लघुपटात देण्यात आला आहे. आपण एखादं काम स्वबळावर करणं कधी कधी किती महत्वाचं असतं, हे यातून लक्षात येतं. अमित मसूरकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि टेरिबली टायनी टेल्सने प्रदर्शित केलेला हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघावा..
 
- निहारिका पोळ