आहारातील षड्रसांची ओळख
 महा त भा  04-Jul-2017

 

आयुर्वेदिक चिकित्साशास्त्रामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे. स्वास्थ्याची कामना करणाऱ्या व्यक्तीला आहाराविषयी थोडे तरी ज्ञान असणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञानाची आहाराचे घटक व त्यांची विभागणी करायची पद्धत खूप वेगळी आहे. प्रत्येक पदार्थामध्ये साधारणतः proteins, vitamins, carbohydrates, fats आणि minerals हे घटक असतात व शरीरात त्या-त्या घटकाचा क्षय झाल्यास तो आहारातून भरून काढता येतो, असे आधुनिक विज्ञान मानते.

आयुर्वेद शास्त्र मात्र आहाराची विभागणी ही षड्रसांमध्ये करते. षड्रसांचे महत्व हे केवळ चवीपुरते मर्यादित नसून प्रत्येक रसाचे दोषावर एक विशिष्ट कार्य आहे.


सौजन्य : Tripadvisor

रस्यते आस्वाद्यते इति रस: ।।

जो आस्वादाचा विषय आहे त्याला रस म्हणतात.

रसाची निर्मिती 'आप' महाभूतापासून होते. कोणत्याही पदार्थाचा रसनेंद्रिय म्हणजे जिव्हेशी संपर्क आला की जी संवेदना सर्वप्रथम व सर्वात शेवटी होते, तो झाला त्या पदार्थाचा 'रस'.

आयुर्वेदात रस ६ प्रकारचे सांगितले आहेत.

मधुर (गोड़), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटु (तिखट), तिक्त (कडू), कषाय (तुरट)

आयुर्वेदिक आहार शास्त्रानुसार षड्रसात्मक आहार हा स्वास्थ्यास कारणीभूत ठरतो तर जास्त प्रमाणात एक अथवा व्दिरसात्मक आहार हा व्याधीचे.

 

षड्रस त्यांचा दोषांवर प्रभाव

गोड़, आंबट, खारट रसाचे सेवन केल्याने कफ दोष वाढतो व वात दोष कमी होतो.

तिखट, कडू व तुरट रसाचे सेवन केल्याने वात दोष वाढतो व कफ दोष कमी होतो.

आंबट, खारट व तिखट रसाचे सेवन केल्याने पित्त दोष वाढतो.

गोड़, कडू व तुरट रसाच्या सेवनाने पित्त दोष कमी होतो.

प्रत्येकाने आपली प्रकृती आणि दोष स्थिती जाणून घेऊन ६ रसांपैकी ज्या रसाची आपल्या शरीराला गरज आहे त्या रसांचे थोड्या जास्त प्रमाणात सेवन करावे मात्र अतिसेवन होऊ नये ह्याची काळजी घ्यावी. अतिसेवनाची लक्षणे थोडक्यात जाणून घेणे अनिवार्य आहे.

१) मधुर (गोड़) पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात जडपणा, आळस, झोप येणे, भूक न लागणे व अपचन अशी लक्षणे दिसून येतात.

२) अम्ल (आंबट) पदार्थांचे अतिसेवन केल्याने तहान लागणे, दात शिवशिवणे, पोट, छाती व संपूर्ण शरीरात आग होणे ही लक्षणे दिसून येतात.

 ३) लवण (खारट) पदार्थांचे अतिसेवन केल्याने तहान लागणे, चक्कर आल्यासारखे होणे, सर्वांगात आग होणे व सर्वात महत्वाचे म्हणजे रक्तामध्ये दोष निर्माण होऊन अम्लपित्त व दाह सारखे पित्तज व्याधी होण्याची शक्यता वाढते.

४) कटु (तिखट) रसाचे जास्त सेवन केल्याने बेशुद्धी, चक्कर येणे, घशात आग होणे, अशक्तपणा येणे व शरीरातली उष्णता वाढून तहान लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

५) तिक्त (कडू) पदार्थांचे अतिसेवन केल्याने तोंड शुष्क होणे, ताकत कमी होणे, चक्कर येणे व छातीत जड वाटणे ही लक्षणे दिसून येतात.

६) कषाय (तुरट) रस जास्त खाल्ल्यास तोंड शुष्क होणे, पोट फुगणे, छातीत ओढल्यासारखे वाटणे, लघवी, वात व मलांना बाहेर पडायला अडथळा होणे ही लक्षणे दिसून येतात.

वाग्भटाचार्यांनुसार स्वस्थ आयुष्यासाठी नित्य आहारामध्ये सहाही रसांचे सेवन करणेच हितकारक ठरते. म्हणून रसांचे कार्य व त्यांच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम ह्यांचे ज्ञान असणे श्रेष्ठच. त्याबरोबर आहारतील कोणते घटक कोणत्या रसाचे आहेत हे ही माहित असल्यास उत्तम.

 

मधुर रस  - खोबरे, खजूर, पिकलेला आंबा व केळे, बेदाणे, रताळे, बीट, गाजर, भात, गहू


 

अम्ल रस - आवळा, लिंबू, कैरी, अननस, डाळिंब, द्राक्षे, आंबवलेले पदार्थ


 

 

लवण रस - मीठ, काळे मीठ, Vinegar, Soy Sauce

कटु रस - मिरे, मिरची, लसूण, आले, मोहरी, मुळा

तिक्त रस - नीम, कारले, हळद, जिरे, काळे जिरे, ओवा, लवंग

कषाय रस – सुपारी, डाळिंब, अपक्व केळी, चवळी, डाळी, भेंडी, मोड आलेली कडधान्ये, सफरचंद

 

 

अशी ही षड्रसयुक्त "थाळी" नित्य सेवन करावी. भारतीय आहार परंपरेनुसार आपले पूर्वज हे एक गोड़ पदार्थ, भाकरी, पोळी, सुकी व ओली भाजी, आमटी/रस्सा, भात, पापड, लोणचे, कोशिंबीर, चटणी, दही/ताक व एखादे फळ असा संपूर्ण आहार घ्यायचे त्यामुळे त्यांना होणाऱ्या व्याधींचे प्रमाण कमी होते. त्याबरोबर भरपूर व्यायाम, योग व प्राणायाम साधना केल्यामुळे अधिक फायदा व्हायचा.

जेवताना कोणता पदार्थ आधी खावा व कोणता जेवणाच्या शेवटी ह्यावरून सुद्धा बऱ्याच शंका आहेत. जेवणाच्या सुरुवातीला जठराग्नी बलवान असल्यामुळे मधुर रसाचे सेवन करावे. जेवणाच्या मध्ये उष्ण व पचनक्रियेला सहाय्यक ठरणारे अम्ल व लवण रस असणारे पदार्थ खावेत जेणेकरून शरीरातील कफ दोष अति प्रमाणात वाढणार नाही. रसाप्रमाणे आहारातील घटक निवडावे व कोणता पदार्थ आधी, जेवणामध्ये व जेवणाच्या शेवटी खावा हे ठरवावे. जेवण झाले कि शतपावली (१०० पावले संथगतीने चालणे) करावी म्हणजे अन्न पचनास मदत होते.

अशा सर्व बाबींची काळजी घेऊन आहार सेवन केल्यास निदान अपथ्यामुळे होणारे व्याधी तरी होणार नाहीत. कोणता रस किती प्रमाणात घ्यायचा हे आपण स्वतः ठरविण्यापेक्षा वैद्यांकडून ही माहिती घेणे कधीही चांगले! आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यायला एवढे तर आपण नक्कीच करू शकतो.

 

- वैद्य विशाखा मोघे