चांगला अभिनेताच डबिंग करू शकतो : उदय सबनीस
 महा त भा  31-Jul-2017
 

 
 
हॉलिवूडचे अनेक इंग्रजी चित्रपट हिंदी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होतात. विदेशी अभिनेत्यांची स्तुतीही बरीच होते, पण त्यांना आवाज देणारा भारतीय चेहरा मात्र कधी फारसा उजेडात येत नाही आणि असाच एक दमदार आवाज अभिनेते उदय सबनीस यांचा...’जंगल बुक’मधील बगीरा, ‘वॉल्ट डिस्ने’च्या ’टिमॉन ऍण्ड पुंबा’ मधील पुंबाचा गोड आवाज आणि हॉलिवूड अभिनेता फ्रीमन मॉर्गन, बेन किंगस्ले यांचे बाणेदार हिंदीही सबनीसांचेच... तेव्हा, दै. ‘मुंबई तरुण भारत’शी आवाजाचे बादशहा उदय सबनीस यांनी केलेली ही खास बातचित...
 
तुम्ही पहिलं डबिंग केव्हा आणि कोणत्या चित्रपटासाठी केलंत?
पहिला हॉलिवूड चित्रपट मी डब केला तो होता ’ब्रेव्ह हार्ट’. त्या आधी मी ’जंगल बुक’मधील बगीराचा आवाज डब केला होता. 
 
तुमचा बहुदा खलनायकांच्या भूमिकेसाठी कणखर आवाज ऐकला आहे. तेव्हा तुम्ही फक्त खलनायकांसाठी डबिंग करता का?
नाही, असं काही नाही. ‘हॅरी पॉटर’मध्ये चार आवाज आहेत. ‘बॅटमॅन’ मधील मॉर्गन फ्रीमॅनचा आवाज माझा आहे, ’ब्रेव्ह’ मधील राजकन्येच्या वडिलांचा आवाज माझा आहे. काही खलनायकांनाही मी आवाज दिलाआहे. म्हणजे, ‘थ्री हंड्रेड’ या हॉलिवूड चित्रपटासाठी, ’फाईंडिंग निमो’ मधील त्या शार्कचा आवाज माझा आहे, त्यामुळे डबिंग कोणत्या भूमिकेसाठी करायचं हे तुमच्या आवाजाच्या दर्जावर अवलंबून आहे. 
 
डबिंग करताना साधारण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?
विशेष काही अडचणी येत नाहीत. एकचं की, तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागतं. कारण, संवाद एका वेगळ्या भाषेत ऐकू येतात आणि ते तुम्हाला मात्र हिंदीत बोलावे लागतात आणि तेही भावनांसहित! 
 
डबिंग करताना कधी ऍक्सेंटची अडचण आली का?
नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर किंवा श्रीरामलागू यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांना ऍक्सेंटची अडचण येत नाही. कारण, ते अभिमानाने सांगू शकतात की, ‘‘मराठी ऍक्सेंट असला तर काय झालं, बंगाली, पंजाबी ऍक्सेंट नाही चालतं का?’’ पण डबिंग करताना अशी कारणे अजिबात देता येत नाही. ती भाषा शुद्धच यावी लागते. एखादी जाहिरात चुकीच्या पद्धतीने डब केली की, कशी लगेच टीका होते. बघायला गेलं तर ऍक्सेंट प्रत्येकामध्ये असतो; परंतु त्याच्यावर मात करता आली पाहिजे. ’जंगल बुक’ केल्याने माझं हिंदी इतकं सुधारलं की, मला कोणी बोलणार नाही की, मी मराठी माणूस आहे. 
 
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक तरुणांना काय सांगाल?
डबिंगचे क्षेत्र फारसं नावाजलेलं नसलं तरी हे क्षेत्र सर्जनशील आहे आणि ज्या भाषेत डबिंग करायचे आहे, त्या भाषेवर प्रभुत्व आणि जी भाषा ऐकतो, त्या भाषेचे जुजबी ज्ञान हवे. बर्‍याच वेळेला मी जर्मन भाषेतील चित्रपट डब करतो. मला जर्मन भाषा समजत नसली तरी मला चित्रभाषा मात्र कळते. त्यातल्या भावभावना कळल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्ही डबिंग करण्यासाठी अभिनेते असल्यास उत्तम! कारण, तोही एक प्रकारचा स्वराभिनयच आहे. त्यामुळे अभिनेता नसलेला व्यक्ती सहजासहजी डबिंग करू शकत नाही, असे मला वाटते. पण 
 
पूर्णवेळ करिअरसाठी हे क्षेत्र कितपत योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?
हो, अगदी. करिअर म्हणजे पैसा असेल, तर गोष्ट वेगळी आहे. कारण, त्यावेळचे बजेट आणि आताचे बजेट यामध्ये खूप फरक आहे. तुमच्यामध्ये व्हॉईस मॉड्युलेट करण्याची क्षमता असेल, आवाजातून भाव व्यक्त करण्याची क्षमता असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल, तर हे क्षेत्र तुमचे निश्चितच स्वागत करेल.
 
- तुषार ओव्हाळ