नरेचि केला हीन किती नर....
 महा त भा  31-Jul-2017
 
 

 
स्त्रीचे माणूसपण थेट कुस्करून तिच्यावर शब्दातीत, भयानक मानसिक आणि शारीरिक अत्याचार करणारा मानवी तस्करीचा काळा व्यवसाय. ‘भोगदासी’ शब्दात तरी ‘दासी’ माणूस आहे, असा थोडाफार संदर्भ लागतो, पण इथे ‘भोगदासी’ नाही, तर ‘भोगवस्तू’ समजून एका जिवंत माणसाला, मानसिक आणि शारीरिक संवेदना असलेल्या स्त्रीला ‘वस्तू’ समजून विकले जाते. कुणीही... कसाही... कितीही वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो... तिचा उपभोग घेतं... तिच्या अन्न, वस्त्राच्या मूलभूत गरजा पूर्ण करुन जमेल तर औषधोपचारही दिले जातात. माणुसकी म्हणून नव्हे तर ती जगली पाहिजे म्हणून.... कारण, जर का ती मेली, तर तिची किंमत शून्य होईल आणि पैसे पुरवणारी ही आयती जिवंत बँक हातची निघून जाईल.... शारीरिक अत्याचारांनी मन भरलं की, मग तिला पुन्हा ‘वस्तू’ समजून वेठबिगार म्हणून हस्तांतरीत केले जाते... त्या स्त्रीचे माणूसपण आजन्म पशुपेक्षाही बत्तर नरकवास भोगतं... अत्याचार सहन करणं आणि त्यातच किड्यामुंग्यांसारखे मरणं, हेच त्या निष्पाप स्त्रीचे प्राक्तन. तिच्या जगण्याला, तिच्या वेदनांना आणि तिच्या मरण्यालाही फुटक्या कवडीची किंमत नाही... छे! २१ व्या शतकात मानवी तस्करी पीडित स्त्रीचे हे जगणे अस्वस्थ करून जाते. जगभरात जवळजवळ ८० टक्के महिलांची तस्करी ही केवळ लैंगिक व्यापारासाठी केली जाते, तर २० टक्के महिलांची तस्करी वेठबिगारीसाठी केली जाते. यात बालकांची तस्करीही मागे नाही. दर आठव्या मिनिटाला एक बालक हरवते. ४० हजार मुलांचे अपहरण होते. त्यातल्या ११ हजार मुलांचा काही पत्ता लागत नाही. गरिबी, बेकारी, अज्ञान, असंवेदनशीलता, सामाजिक अन्याय, लैंगिक भेदभाव यामुळे महिला आणि बालकांच्या तस्करीचा व्यवसाय आज जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. मानव तस्करी त्यातही महिला आणि बालकांची तस्करी प्रकरणे, त्याची वाढती धोकादायक संख्या पाहिली की वाटते नरेचि केला हीन किती नर|
 
 
...तरंच समाज सुरक्षित राहील!
  
यंदाचे अर्धे वर्ष सरताना मानवी तस्करीमध्ये जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, हा आकडा फसवा आहे. ’नॅशनल ह्यूमन राईट्‌स कमिशन ऑफ इंडिया’च्या मते आपल्या देशात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे प्रमाण १० टक्के आहे, उर्वरित ९० टक्के तस्करी देशातल्या राज्यांतर्गत होते. मानवी तस्करी संदर्भात पश्चिमबंगाल आघाडीवर आहे, तर राजस्थान व महाराष्ट्राचाही बराच वरचा क्रमांक लागतो
महिला व बाल तस्करी संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘इंटरनॅशनल जस्टिस मिशन इंडिया’सोबत दि. २७, २८ जुलै रोजी दोन दिवसांचा आंतरराष्ट्रीय स्तराचा परिसंवाद मुंबईत आयोजित केला होता. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी या परिसंवादाला हजेरी लावली होती. महाराष्ट्राचा विचार करता या परिषदेला वेगळे परिमाण आहे. कारण, महिला तस्करीमध्ये मायानगरी मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो. ‘स्मार्टसिटी’चे स्वप्न पाहता तस्करीचे केंद्रबिंदू होणे, हे मुंबईला भूषणावह नक्कीच नाही.
 
असो, परिषदेत मानवी तस्करीबाबतचा आढावा घेताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ’’विशेष कारवाईमुळे महाराष्ट्रात मानवी तस्करी रोखण्यात बरेच यश मिळाले आहे. बालकांची तस्करी हा समाजासाठी मोठा धोका आहे आणि त्याविरुद्ध राज्य सरकार आणखी कठोर निर्णय घेणार आहे.’’ महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला तस्करीबाबत भूमिका मांडली की, ’’वुई आर कम्युनिटी नॉट कमोडिटी,’’ तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या परिषदेनिमित्त घेतल्या जाणार्‍या विचारांचा कृतिशिल पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र सतीश माथुर यांनी मत मांडले की, ’’मानवी तस्करी हा गुन्हा मोका कायद्यांतर्गत करायलाच हवा.’’ सेकंड लेडी ऑफ घाना हाजिया सामिरा बौमियांनी महिला तस्करीला रोखण्यासाठी ’एस’ची पंचसूत्रे सांगितली. ते म्हणजे सामाजिकता, संवेदनशीलता, साहय्य, सुनिरीक्षण, सुरक्षितता. त्यामुळे महिला आणि बालक सुरक्षित असतील, तरच समाज सुरक्षित राहील.
 
- योगिता साळवी