वंचितांचा आवाज :अण्णा भाऊ साठे
 महा त भा  31-Jul-2017
 
 
 गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची 
 तीच गत झाली आहे, 
 या खंडित महाराष्ट्राची 
 माझी मैना गावावर राहिली, 
 माझ्या जिवाची होतिया काहिली 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अवघ्या महाराष्ट्राला जागवणार्‍या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रतिभा आणि प्रतिमा पाहून चकित व्हायला होते. आज त्यांची जयंती. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीच्या वाटेगावी भाऊराव आणि वालुबाईच्या पोटी जन्मलेला तुकाराम पुढे ‘अण्णा भाऊ’ म्हणून आपल्या साहित्यसेवेने समाजाचा, साहित्याचा दीपस्तंभ ठरला. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले तुकाराम उर्फ अण्णा भाऊ साठेंचे माणूस म्हणून असणे, हा त्यांच्या साहित्यातल्या प्रत्येक शब्दाचा अंतःप्रवाह होता. 
 

 
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.  त्यांच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडिया, बंगाली, तामिळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमध्ये भाषांतर झाले. हेे साहित्य अजरामर झाले, कारण अण्णा भाऊंची प्रत्येक साहित्यकृती अंत्योदयाच्या अंतात समाविष्ट असलेल्या त्या अंत्यज माणसाचा हुंकार होती. त्यांनी पहिले गाणे कुणावर लिहावे, तर माटुंगा लेबर कॅम्पच्या डासांवर, सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून ज्या ’फकिरा’ कादंबरीची गणना होते, त्या कांदबरीचा नायक कोण? तर, पूर्वी समाजाच्या जातीय उतरंडीत नेहमीच वंचित स्थान असलेल्या मातंग समाजाचा तरुण. वैजयंता कांदबरीची नायिका तमासगीर आहे. ’माकडीच्या माळे’ची पार्श्‍वभूमी भटक्या विमुक्तांचे एक कुणाच्याही खिजगणतीत नसलेले जग आहे. बंडवाला, बरबाद्या कंजारी, रामोशी, मरीआईचा गाडा या कथा वाचताना वाटत राहते की, माणसाचं माणूसपण आणि त्यांच्या मानवी मूल्यांना जपणारा संघर्ष हा जातीधर्मावर आधारित नसतो. त्यांनी आपल्या साहित्यात नगण्य, तुच्छ समजल्या गेलेल्या दुर्दैवी जिवांचा मनाला भिडणारा आकांत, संघर्ष आणि त्याचे भलेथोरले माणूसपण रेखाटले. जे माणूसपण सर्वच थरातील, सर्वच स्तरातील माणसाला भिडले. वंचित, शोषित जिवांचे जगणे टिपकागदापेक्षाही जास्त शोषून त्याचे प्रतिबिंब नव्हे त्याचे साक्षात जगणे, अण्णा भाऊ साहित्यात मांडू शकले. त्यांचे कारण त्यांची सर्जनशीलता, दैवी प्रतिभा आहेच, पण जगण्यासाठी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशा प्रकारच्या नोकर्‍या त्यांनी केल्या. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगण्याचं मढं ओढणार्‍या उपेक्षित कष्टकरी समाजाचा आतला आवाज अण्णा भाऊंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा  आवाज बनला.  समाजाच्या अंतरंगात समरस होताना त्यांचे मीपण केव्हाच गळून गेले होते. 
 
स्वतःच्या दुःखाला कवटाळीत न राहता, अण्णाभाऊंनी मानवी मूल्यांचा उद्घोष करत नेहमीच समाजाच्या वेदनेला आवाज दिला. ज्या समाजात जन्मले, त्या समाजाचेच नव्हे, तर जगभरातल्या अवघ्या वंचितांचा आवाज ठरणार्‍या अण्णा भाऊंचे माणूसपण शब्दातीत आहे.
 
 
- योगिता साळवी