कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीट मार्शलची गरज - पालकमंत्री प्रा. शिंदे
 महा त भा  03-Jul-2017


 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला अनुषंगिक सर्व मदत पोलीस विभागाला उपलब्ध करुन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच जिल्हा पोलीस दलाने तयार केलेली पोलीस मीडिया व्हॅन आणि बीट मार्शलसाठी उपलब्ध झालेल्या दुचाकी  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे या पोलीस मीडिया व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.  त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपमहापौर श्रीकांत छिंदम, प्रा. भानुदास बेरड, नगरसेवक सुवेंद्र गांधी, अपर पोलीस अधिक्षक श्री. पाटीलआदींची यावेळी उपस्थिती होती.

शहरात  होणारे चेन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच रस्त्याने जाताना होणारी छेडछाड, चोरीच्या घटना रोखण्यासाठी हे बीट मार्शल आता शहरातून गस्त घालणार आहेत. यातील काही दुचाकी तालुकास्तरावरही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी कौतुक करुन जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पोलीस दलाला केले.