गॉडफादर नाही प्रामाणिक कष्ट गरजेचे - ऋचा इनामदार
 महा त भा  26-Jul-2017


मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी असली पाहिजे, तरच तुम्ही मोठी खूप चांगले काम करता किंवा तरच मोठे काम मिळते असा समज नव्या कलाकारांना वाटत असतो. पण हा समज खोटा ठरवत ऋचा इनामदार मनोरंजन क्षेत्रात प्रयत्नपूर्वक आली आहे. फार वेगळ्या पद्धतीने यामध्ये संधी मिळत जातात. पण कोणत्या पद्धतीचे काम करायचे हे स्वतःशी पक्क ठरवून मनोरंजन क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री ऋचा इनामदार पहिल्या कमर्शिअल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आली असताना महाएमटीबीने तिच्याशी साधलेला संवाद..

मनोरंजन क्षेत्र हे अनेक आव्हानांचे क्षेत्र आहे. अभिनय, मॉडेलिंग क्षेत्रात विविध भूमिकांमध्ये तुझा चेहरा झळकेल असे वाटले होते का?

कला क्षेत्रात काम करणे हे केवळ माझे स्वप्न नाही तर अगदी सहज जुळून आलेली गोष्ट आहे. मी वयाच्या अडीच वर्षांपासून लहान-मोठ्या नाटुकल्यांसाठी काम केले आहे. ही सुरुवात शाळेपासून झाली. नंतर आई-बाबांनी माझी आवड पाहून या कामांमध्ये मी जास्त रमते हे ओळखले. त्यांनी जर प्रोत्साहन दिले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. पण मी मुळातच शिक्षणाला, करिअरला प्राधान्य देणाऱ्या घरातून आहे. माझे बाबा डॉक्टर आहेत, आईने पीएचडी केली आहे. मोठा भाऊ एमबीए होऊन आंतरराष्ट्रीय कंपनीत सल्लागार म्हणून काम करायचा. आता तो पेंटिंग करतो. त्याने आधी करत असलेले काम तितकेच आवडीने केले आणि आता प्रोफेशनली पेंटिंग करतो. आई खूप चांगली गाते. पेशाने डॉक्टर असलेले बाबा कविता करतात. असे सगळेजण कला क्षेत्रातल्या विविध प्रांतात काम करत आहेत. त्यामुळे मी बीडीएस केल्यावर डेंटिस्ट म्हणून पुढे मास्टर डिग्री घेण्यापेक्षा मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आणि आईने यासाठी बालपणापासूनच खूप पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी सुरुवातील सहाय्यक दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक बाबींचे शिक्षण घेण्यासाठी सतिश राजवाडे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. यामुळे पुढे सतिश राजवाडे यांच्या असंभव ही मालिका आणि गैर हा मराठी चित्रपट यासाठी मी सतिश राजवाडे यांची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा सगळा प्रवास पुढे जाऊन मला फार महत्त्वाचा ठरला. कारण आपण कॅमेऱ्याच्या मागे कसे दिसतो हे पाहणे मजेदार असते. ते एकदा शिकून घेता आले की कॅमेऱ्याच्या पुढे उभे राहून अभिनय करणे सरावाने जमते. तसेच काहीसे माझ्यासोबत झाले. पण हा प्रवास तितकाच वेगळा असल्याने अजून खूप काम करण्याचा उत्साह कायम आहे.

खरंतर या क्षेत्रात खूप स्ट्रगल करावं लागतं असे खूप जणांकडून ऐकले होते. मला मात्र चौथ्या ऑडिशन नंतर एका जाहिरातीसाठी ब्रेक मिळाला. सुजित सरकार यांच्यासोबत मी पहिली जाहिरात केली आणि प्रोफेशनल करिअर सुरू झाले.


मोठ्या बॅनरसाठी काम करायला मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. तू मनोरंजन क्षेत्रात काम करताना अशाच धाटणीचे काम मिळावे असे ठरवले होतेस का?

बालकलाकार म्हणून काम केल्याने आणि पुढे रंगभूमीसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन काम करता यायला हवे हे फार आधीपासून मनात रुजले होते, पुढे ते जपलेही तसेच. त्यामुळे सुरुवातील मोठे बॅनर मिळावे अशी अपेक्षा घेऊन मी गेले नव्हते. पण ऑडिशन देताना आजूबाजूच्यांच्या प्रतिक्रिया, त्यांना करावा स्ट्रगल मला खूप काही शिकवत होता. सुरुवातीला कॉलेजमध्ये स्टेज करताना काही अनुभव असला तरी जाहिरात आणि मॉडेलिंग ही क्षेत्र माझ्यासाठी पूर्णपणे नवखी होती. पण सतिश राजवाडे यांच्यासोबत असलेले घरोब्याचे नाते मला खूप काही शिकवून गेले होते. या कामादरम्यान आनंद अभ्यंकर यांची ओळख झाली. त्यांच्यामुळेच मी गौतम राजाध्यक्ष यांना भेटले. त्यांच्याशी झालेली भेट माझ्या मनातले सगळे किंतु दूर करणारे होते. ते म्हणाले होते, ‘तुझा चेहरा हा वेगळा आहे. वयाच्या मानाने तू लहान दिसतेस. त्यामुळे जास्त वेळ तुझ्या हातात आहे, असे मला वाटते. तु ते खरे करून दाखवशीलच!’ हे शब्द ऑडिशनला जाताना मनात रेंगाळत होते. तेच ऑडिशनमधून समोरच्यांपर्यंत पोहोचले. पण असंच काम पाहिजे असा हट्ट नाही. तरीही मिळेल ते काम करणार नाही हे नक्की. मला फक्त बाहुलीच्या पठडीतले काम नको होते. त्यामुळे भूमिका पटली तरच कामाल होकार देत गेले.

 

तू आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय व मोठ्या ब्रँडसाठी काम केले आहेस. या कामाचा अनुभव आणि सिनेमासाठी काम करण्याचा अनुभव यामध्ये काय फरक आहे?

सिनेमा हा अनेक भूमिकांमधला संवाद आहे. जाहिरात हा एका ब्रँडचा आणि त्या ब्रँडच्या एका उत्पादनाशी ग्राहक म्हणून जोडणे आहे. जाहिरातीत उत्पादन आणि ब्रँड यांवर सगळ्यात जास्त लक्ष द्यावे लागत असल्याने अभिनेत्री म्हणून स्वतःशी फार संघर्ष करावा लागतो. ती भूमिका छोटाशा वेळेत समजून करावी लागते. सिनेमामध्ये मात्र मोठी टीम असते. त्यांच्याशी चर्चा करत ही भूमिका खुलवावी लागते. पण दोन्ही क्षेत्रात काम करायला मनापासून आवडते.

 

जाहिरात क्षेत्रात मिळणारे पॅकेज आणि चित्रपट क्षेत्रात काम करण्याची संधी व त्यातून मिळणारे फेम यामध्ये कोणता फरक जाणवतो ?

दोन्हीकडे फेम मिळतेच. पण काही सेकंदात जो कॅनव्हास दाखवायचा आहे तो आणि दोन-अडीच तासाचा सिनेमा यामध्ये नक्कीच मोठा फरक आहे. जाहिरातीत काम करताना प्रेक्षकांना चेहरा ओळखीचा होतो. पण सिनेमाच्या माध्यमातून नाव आणि केलेल्या कामामुळे होणारी ओळख हे फार महत्त्वाचे आहे. फेम तर चांगले काम केल्यावर मिळतोच. पण प्रेक्षकांवर आपल्या कामातून एक छवी कायम ठेवायची सुप्त इच्छा सिनेमातील कामामुळे मला मिळाली आहे. पाहूया या कामातून मी माझ्या प्रेक्षकांपर्यंच कितपत पोहोचणार आहे. धाकधूक मात्र आहेच.

 

आतापर्यंत जाहिरातीमधून बॉलिवुडच्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहेस. तो अनुभव कसा होता. आणि त्यातूनही हिंदी सिनेमात काम करताना पुढे जाऊन मराठी सिनेमात काम करावे असे कुठेतरी वाटत होते का?

मला कथानक जास्त महत्त्वाचे वाटते. आतापर्यंत बांग्लादेशमधील सर्वांत मोठा सिनेमा चिल्ड्रेन ऑफ द वॉरमध्ये भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली आहे. तो माझा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा. त्यामध्ये मी एका बांग्लादेशी मुलीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा हिंदी असला तरी बांग्लादेशमध्ये फार महत्त्वाचा ठरला होता. कारण बांग्लादेश मुक्ती संग्रामावर आधारित खूप समीक्षण झालेला हा सिनेमा खरंतर बास्टर्ड चाइल्ड या नावाने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न होता. पण ते नाव न मिळाल्याने दुसऱ्या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये गावातील एका मुलीची भूमिका साकारणे चॅलेंजिंग होते. बांग्लादेशमध्ये हा सिनेमा तब्बल १६ आठवडे सुरू होता, हे आमच्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाचे होते. मी काम केलेला हा दुसरा सिनेमा पण या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आधी लागली आणि मी काम केलेला पहिला प्रदर्शित सिनेमा म्हणून चिल्ड्रेन ऑफ द वॉर जगभरात गाजला. यामधली कौसर ही भूमिका प्रेक्षकांना पसंतीस उतरली याबद्दल समीक्षकांच्या प्रतिक्रियाही उत्साहवर्धक होत्या.


मला सिनेमाची पहिली ऑफर देणारा अंडर द सेम सन हा सिनेमा माझ्या खूपच जवळचा आहे. यामध्ये एका अनाथ मुलाची दहशतवादी कारवायांकडे जाणारा प्रवास आणि मैत्रिणीमुळे त्यामधून दूर जातो असे दाखवले आहे. या त्याच्या मैत्रिणीच्या म्हणजेच यास्मिनच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. देशाच्या दोन विरुद्ध दिशांना असलेल्या देशांशी संबंधित घडामोडींवर मला लागोपाठ भूमिका करायला मिळाल्या. त्या दरम्यान झालेला प्रवास मला पुढे काम करण्याची शक्ती देत गेला. राजस्थानमधील जैसलमेर या गावाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रवास मला वैयक्तिकरित्या खूप वेगळे जग दाखवत गेला.

हे दोन हिंदी सिनेमा केल्यावर मला गणेश आचार्य, मराठीतला मोठा कलाकार स्वप्नील जोशी, महेश दादा यांच्यासोबत कामाची संधी मिळत असल्याने मिळालेली ऑफर नाकारायचा तसा प्रश्नच नव्हता. करिअरच्या सुरुवातीपासूनच मोठ्या कलाकारांसोबत कामाचा अनुभव असल्याने मला हे काम फार अवघड आहे असे सुरुवातीला वाटले नाही. पण नंतर काम करताना मधु ही भूमिका आणि तिचा स्वभाव, काम करण्यासाठी निवडलेले लोकेशन्स याचा हळूहळू अंदाज यायला लागला. पहिला कमर्शिअल सिनेमा असल्याने मनात खूप धाकधूक होती पण नंतर गणेश दादांच्या आणि महेश दादांच्या सोबत काम केल्याने मनातली भीती खूप कमी झाली. एकाच सिनेमात नृत्याच्या माध्यमातून तांडव सारखा नृत्यप्रकार साकारता आला. त्याचवेळी समजुतदार पण आयुष्यात आलेल्या प्रसंगानुसार अधिक शिकत जाणारी अशी मधु साकारणे तसे तितकेसे सोपे नव्हते. मराठी असो की तमिळ प्रत्येक भाषिक सिनेमासाठी काम करायला मिळणे ही मोठी अचिव्हमेंट आहे. भाषा, त्याचे स्वभाव आणि त्या संदर्भाने त्या माणसांना समजून घेण्याची संधी खूप कमी वयात मिळणे हे फार आनंददायी आहे.

 

पहिला कमर्शिअल सिनेमा भिकारी करताना तुझ्या मनात काय होते आमि तुझी आईसोबत असलेली केमिस्ट्री आधी कशी होती व नंतर ती जास्त घट्ट झाली असे वाटते का?

आधीपासून मी हट्टी आहे. पण आई म्हणते ते ऐकायचा प्रयत्न नक्की करते. ती मला बालकलाकार म्हणून घडवण्यासाठी तिची एकमेव सुट्टी प्रत्येक रविवारी देत असायची. तेव्हापासून तिने मला जितके समजून घेतलेय तितके मी स्वतःलाही समजून घेऊ शकले नाहीय. हा सिनेमा आई-मुलगा आणि मुख्यतः आईचे कोणाच्याही आयुष्यातले महत्त्व पटवून देणारा आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे माझी भूमिका ही आईसोबतचे वेगळे पैलू उलगडून दाखवेल. मला विश्वास वाटतो हा आई-मुलीचा प्रवास आणि एक मुलगा आईसाठी काय-काय करतो हे भिकारी पाहिल्यावर नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचेल.


सिनेमा क्षेत्रात आता सुरुवात केल्यावर पुढे वाटचाल कशी असेल? यानंतर अजून काय वेगळे करावेसे वाटते?

नेहमीच वेगवेगळे काम करायला आवडेल. यामध्ये नाट्यक्षेत्राचा इतक्यात विचार करणार नाही. कारण त्यासाठी लागणारा सरावासाठीचा पुरेसा वेळ सध्या देता येईल असे वाटत नाही. पण भविष्यात नक्कीच नाट्यसृष्टीसाठी काम करायला आवडेल. अजून मला सिनेक्षेत्रात खूप काम करायचे आहे.

 

भिकारीचे प्रमोशन आणि एकूण प्रसिद्धी, आतापर्यंतचे तुझे काम पाहून काही ऑफर्स  नव्याने मिळाल्या आहेत का?

हो. भिकारीचे प्रमोशन, ट्रेलर पाहून, त्यातील काम पाहून मला एक ऑफर आली आहे आणि अजून एक ऑफर या सिनेमासाठी काम सुरू होण्याआधी मिळाली होती. काही महिन्यात त्यातील एका सिनेमाबद्दल नक्की प्रसिद्ध करणार आहेत. पण सध्या फक्त भिकारीवरच जास्त लक्ष आहे.

अतिशय सहजपणे ऋचा इनामदार डॉक्टर या पदवी मिळाल्यानंतरही आपल्या आयुष्यात नवी संधी शोधत आधीच्या अनुभवांमधून शिकत आपले स्वप्न साकार होताना पाहत आहे. या मुलाखतीतून कलाकार म्हणून नवोदित राहण्यात आणि सातत्याने शिकण्यात खूप थ्रिल असल्याने सतत शिकायला आवडते ही तिची भूमिका नक्कीच आपल्याला आवडेल..

 

- नम्रता देसाई