कश्मिरमध्ये तर फक्त एकच सीमा आहे : इति ममतादीदी
 महा त भा  24-Jul-2017
 

 
काश्मीरमध्ये तर फक्त एकच सीमा आहे, पश्चिमबंगाल तीन देशांच्या सिमेवर आहे. जर बंगालला काही अडचण आली तर देशासाठी धोका निर्माण होऊ शकतो ः इति ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जींचे विधान ऐकून भूगोल आठवला. ते नकाशे, तो पृथ्वीचा गोल आठवला. कारण सातत्याने अतिरेक्यांच्या दहशतवादाने हादरणार्‍या काश्मीरमध्ये एकच सीमा आहे? या वाक्याला आगापिछा, व्याकरण, इतिहास, भूगोल काही आहे? काश्मीरमध्ये म्हणण्यापेक्षा काश्मीरला लागून एक सीमा आहे, असे ममता बॅनर्जीनी म्हटले असते तर ठीक होते. बरं होते कधीकधी शाब्दिक चूक, आपण काश्मीरला लागून एक सीमा आहे, असा जरी अर्थ घेतला तरी काश्मीरला लागून एकाच देशाची सीमा आहे? कोणत्या? पाकिस्तान, चीन की अफगाणिस्तान? कोणत्या देशाची सीमा आहे? होणार, माझे लगीन होणार! असे सातत्याने लग्नाळू होतकरू मुलाने इच्छा धरावी, तशी होणार होणार मी पंतप्रधान होणार!, अशा मुंगेरीलालसारखे हसीन सपने पाहणार्‍या पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. या ममतादीदींनी देशाचा नकाशा तरी नीट पाहिला आहे का? काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अजानबाहू असणार्‍या भारतमातेचे दर्शन कधीतरी मनापासून घेतले आहे का? इतकी वर्षे देशाच्या सत्तास्थानी राहण्याचे स्वप्न उरी बाळगणार्‍या ममतांना काश्मीरची पार्श्वभूमी, भूगोल माहिती नाही.काश्मीरला लागून एकाच देशाची सीमा आहे, असे मुख्यमंत्री असलेल्या ममता धडाक्यात म्हणतात. काश्मीरला लागून किती देशाच्या सीमा आहेत, बरं आहेत का नाही, ते तसे माहिती नसताना देशाच्या पंतप्रधानांना, केंद्र सरकारला पश्चिमबंगालमध्ये बसून ममता बॅनर्जी फुकाचे सल्ले देत असतात, हे मात्र विशेष. भारताची नागरिक म्हणून ममतांच्या या विधानावर बरीच प्रश्नचिन्हे उभी राहायला हवीत पण, दुर्दैवाने ममतांच्या या विधानाचा कोणी गांभीर्याने विचार केला नाही. दुर्दैव यासाठी की याच ममता बॅनर्जींना केंद्रीय सत्तेच्या परिघात नेतृत्वाचे वेध लागलेले असतात. त्यावेळी काय ती त्यांची निधर्मी वृत्ती, काय तो त्यांचा आवेश. मात्र या सर्वांच्या आड देशावर, देशाच्या एका राज्यावर सत्ता गाजवणार्‍या या महिलेला देशाबद्दल काय माहिती आहे, देशाच्या सीमाभागाबद्दल, राजकीय, सामाजिक प्रश्नाबद्दल काय माहिती आहे, याचा कोणी विचारच करत नाही.
 
 
तृणमूलच्या दाती तृण येणार खास
 
ममतासरकारने धर्मांधतेला घातलेले खतपाणी त्यामुळे पश्चिमबंगालमध्ये सातत्याने होत असलेल्या दंगली, होरपळलेले जनमन, भरीस भर पर्यटकांच्या यादीत नंबर वन असलेले दार्जिलिंगही धुमसत आहे. त्यातच शारदा-नारदा प्रकरणाची टांगती तलवार ममता सरकारच्या डोक्यावर आहेच. या सर्वांमधून लोकांचे लक्ष उडवायचे कसे? मी नाही बाई त्यातली म्हणत सोवळेपणाचे ढोंग करायचे कसे याचा आक्रस्ताळी ड्रामा ममता सरकार करीत असते. याचे उत्तमउदाहरण म्हणजे काश्मीरमध्ये एकच सीमा आहे, या वाक्यापुढे ममतादीदी म्हणाल्या, ’’पश्चिमबंगाल तीन देशांच्या सिमेवर आहे. जर बंगालला काही अडचण आली तर देशासाठी धोका निर्माण होऊ शकतो.’’ म्हणजे ममतांना काय म्हणायचे आहे? हा सार्वभौमदेशाच्या शांततेला एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला समजायचा की धमकी? पश्चिमबंगाल हे काही देशापासून विलग असलेले रज्य आहे का? केंद्र सरकारने ममता सरकारला न पटणारे पण पश्चिमबंगालच्या हिताचे काही निर्णय घेतले आणि त्यामुळे ममतांना काही अडचण आली तर राज्याला लागून असलेल्या तीन सीमाभागांतून देशाला धोका निर्माण होईल? का? कसा? छे! असे म्हणणार्‍या ममतांना पश्चिमबंगालचा स्वर्णिमक्रांतिकारी इतिहास तरी माहिती आहे का? पश्चिमबंगाल म्हणजे देशभक्तांची पंढरी. देशाच्या रक्षणासाठी, एकात्मतेसाठी शिर तळहातावर घेणारे देशभक्त पश्चिमबंगालच्या वीरभूमीत कालही होते आणि आजही आहेत. त्यामुळे ममतादीदी इतर देशांच्या तीन काय हजार सीमा पश्चिमबंगालला लागून असू देत, त्याचे भय कुणाला दाखवता? केंद्र सरकारला? पंतप्रधान नरेंद्र मोदींना?की संपूर्ण देशाला?

असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात ममता ९ ऑगस्टपासून भारतातून भाजपला हद्दपार करा, हे आवाहन करणारे मोठे आंदोलन छेडणार आहेत म्हणे. ममतांचे आवाहन कुणाला तर संघाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेल्या, ’हमदिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मॉं’ अशी धारणा असलेल्या पंतप्रधानांना! या सामन्याचा निर्णय काय असणार आहे हे आताच जगजाहीर आहे. भ्रष्टाचार, असहिष्णुता, निधर्मीपणाच्या पडद्याआड मतांच्या भिकेसाठी पराकोटीची लाचारी यामुळे देशभर छबीभ्रष्ट झालेल्या ’गिरे तो भी टांग उपर’ ही खास शैली जोपासणार्‍या ममता आणि तृणमूलला दाती तृण धरावे लागणार आहे, हे निश्चित.