सन्मित्र सेवा मंडळ - 'सब समाज को साथ लिए'
 महा त भा  19-Jul-2017
 
 
वस्त्यावस्त्यांमध्ये बालवाड्या सुरू झाल्या पाहिजेत. वस्त्या वेगळ्या असल्या तरी त्या बालवाडीमध्ये बालकांना दिले जाणारे शिक्षण ध्येयशील विचारांचे असले पाहिजे. मुख्य म्हणजे या वास्तू आपल्या परिवाराच्या रचनेतून उभारल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रभर कोणत्याही वस्तीत गेले की बालवाडी दिसायला हवी, त्या बालवाडीकडे पाहूनच पटकन समजायला हवे की, ही बालवाडी संघाची आहे, संघविचारी संस्थांची आहे. 'सन्मित्र'ने ती ओळख जपली आहे. पुढेही जपणार आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन आमच्या 'सन्मित्र सेवा मंडळा'तर्फे चालवल्या जाणार्‍या बालवाडीच्या उद्घाटनाला आले असताना यांनी हे विचार मांडले होते. आजही आमच्या 'सन्मित्र'च्या बालवाडीचा विचार करताना आम्हाला महाजनसाहेबांचे वाक्य आठवते.'' 'सन्मित्र सेवा मंडळ', मुलुंंडचे पदाधिकारी जीवन फडके भावूक होऊन सांगत होते. 
 
काही महिन्यांपासून पूर्व उपनगरातल्या विद्यार्थी आणि पालकांच्या ओठी 'सन्मित्र सेवा मंडळा'चे नाव देवनामाप्रमाणे जपले जात आहे. त्याला कारणही तसेच आहे.  'सेवा सहयोग' संस्थेचे किशोर मोघे यांनी पुढकार घेतला आणि 'सेवा सहयोग' संस्थेच्या मदतीने 'सन्मित्र'ची पुस्तक पेढी सुरू झाली. इयत्ता दहावी ते पुढे महाविद्यालयीन शाखेच्या सर्वच पुस्तकांची. विद्यार्थ्यांनी पॅनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि जर तो नसेल तर स्थानिक नगरसेवक, आमदारांचे कमी उत्पन्न दर्शविणारे पत्रही चालेल, तर हे कागदपत्र द्यायचे आणि 'सन्मित्र'कडून हवी ती अभ्यासाची, हव्या त्या लेखकाची पुस्तके घ्यायची. इथे अशी पद्धतच आहे की, विद्यार्थ्यांनी पुस्तकपेढीत नाव नोंदविताना वरील कागदपत्रांची पूर्तता करायची, नावाला असलेले शुल्क भरायचे, त्यासोबत आपल्या अभ्यासासाठी आवश्यक असणार्‍या पुस्तकांची यादी द्यायची. ती पुस्तके कितीही किमतीची असली तरी 'सन्मित्र सेवा मंडळ' ती पुस्तके विद्यार्थ्यांना मिळवून देते. परीक्षा झाली की, विद्यार्थ्यांनी पुस्तके परत करायची. 'सन्मित्र सेवा मंडळ'ही विद्यार्थ्यांनी भरलेले नाममात्र शुल्क परत करते, मात्र त्यातून थोडे पैसे वजा केलेले असतात. ते वजा केलेले पैसे 'सन्मित्र' पुस्तकपेढी चालवण्यासाठी वापरते. यावर्षी शेकडो विद्यार्थ्यांनी या पुस्तकपेढीचा लाभ घेतला. कारण एकेका विषयाची सतराशे साठ नामांकित अभ्यासू लेखकांची पुस्तके. एकेकाची किंमत शेकड्याच्या पुढेच सुरू होते. त्यामुळे साधारण नव्हे, तर बर्‍यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांनाही आपल्या पाल्यांना सर्वच पुस्तके खरेदी करून देता येऊच शकत नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या नजरेतून पाहिले तर 'सन्मित्र सेवा मंडळा'ची ही सेवा शब्दातीत आणि अमूल्य आहे. 
 

 
'सन्मित्र'तर्फे बालवाडी, अभ्यासिका, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध उपक्रम, आरोग्य शिबिरे, संस्कार केंद्र, विविध सणांचे औचित्य साधत उत्सवांचे आयोजन केले जाते. पण इथेच वीजभरणा केंद्रही आहे. सेवाप्रकल्पामध्ये वीजभरणा केंद्र? यावर शांताराम शिंदे म्हणाले, ''सन्मित्र सेवा मंडळा'च्या माध्यमातून वर्षभर सातत्याने उपक्रम राबविले जातात. त्यासाठी निधी लागतो. निधी संकलन हा मोठा विषय. या वीजभरणा केंद्रातून जे कमिशन मिळते, त्यातून 'सन्मित्र'च्या बर्‍याच उपक्रमांना दिलासा मिळतो. भाऊसाहेब वखरे आमचे जुने मार्गदर्शक. या वीजभरणा केंद्रामध्ये लोकांनी विजेची बिले भरण्यासाठी द्यावी म्हणून ते तासन्तास परिसरातल्या वस्त्यांमध्ये घराघरात पायपीट करायचे. विषय समजवायचे. आज ६५०० च्या वर घरातील वीजबिले आमच्या केंद्रातून भरली जातात.'' इतक्यात सुभाष महाडेश्‍वर म्हणाले, ''वीजभरणा केंद्र तर आहेच, त्याशिवाय 'सन्मित्र'ची पतपेढीही आहे. पतपेढी काढण्याचा उद्देश नफा कमावणे नाही बरं. कारण पतपेढीचे प्रयोजनच यासाठी केले गेले की, गरीब वस्त्यांतील छोट्या रकमेच्या कर्जाची गरज असलेल्या गरजूंसाठी मदतीचा हात देणे. पतपेढीतर्फे नाका कामगार, घरेलू कामगार, मजदूर, फेरीवाले, खाजगी क्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी छोट्या रकमेचे कर्ज दिले जाते.  कदाचित आपल्यासाठी दोन हजार ते दहा हजार रुपये काहीच नसतील, पण या बांधवांसाठी ही रक्कम आजही मोठी आहे. कोणत्याही बँका इतक्या कमी रकमेचे कर्ज तेही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता नसताना देत नाहीतच. सन्मित्र पतपेढीला वाटते की, गरज छोटी असो वा मोठी, ती गरजच असते. त्यासाठी समाजबांधवांना मदत केली पाहिजे.'' यावर जीवन फडके म्हणाले, ''सन्मित्र पतपेढीचे ११ पदाधिकारी संघाचे स्वयंसेवकच आहेत. पतपेढीतून मिळणारे वार्षिक व्याज पदाधिकारी घेत नाहीत तर त्या व्याजाची रक्कम 'सन्मित्र'च्या विविध उपक्रमांसाठी, 'सन्मित्र सेवा मंडळा'च्या वास्तूच्या देखभाल, दुरुस्तीसाठी वापरली जाते.'' 'सन्मित्र सेवा मंडळा'च्या वास्तूमध्ये प्रवेश करताना जाणवले होतेच की, इतकी मोठी वास्तू, त्यात इतके सगळे उपक्रम, तेही विनामूल्य सुरू आहेत, तेही गेली २८ वर्षे. तर त्याचा आर्थिक भार कसा सांभाळला जात असेल? तर तो या प्रकारे सांभाळला जात होता. 
 
'सन्मित्र सेवा मंडळा'च्या वास्तूचीही आगळीच कहाणी आहे. मंडळाची ८० च्या दशकात मुलुंड डम्पिंग रोड पश्‍चिम येथील वस्तीत एक छोटीशी बालवाडी चालायची.  पुढे गवणीपाडा, साल्पादेवीपाडा अशा तीन चार मोठ्या झोपडपट्ट्या होत्या, इथे बालवाडी असणे गरजेचे होते, पण जागा उपलब्ध नव्हती. शेवटी त्यावेळी झोपडपट्टी जनता परिषदेचे कै. वामनराव परब यांच्याशी 'सन्मित्र'च्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. इथून पुढे जीवन फडकेंच्या शब्दात.. 
 
''तसे वामनराव आम्हा सर्वांना ओळखायचे, संघस्वयंसेवक म्हणूनही आणि संघविचारधारेला स्मरून सुरू केलेल्या आमच्या कामांनाही. आम्ही त्यांना सांगितले की, इथे गवणीपाड्यात बालवाडी सुरू करायची आहे. जागा उपलब्ध नाही. वामनरावांची जागा गवणीपाड्यात होती हे आम्हाला माहिती होते. आमचे म्हणने ऐकून त्यांनी पॅड काढले, कागदावर सरळ लिहिले की गवणीपाड्याची जागा मी 'सन्मित्र सेवा मंडळा'ला दिली. केवढे मोठे मन. केवळ संघाच्या माणसांनी, संघविचारांसाठी उपक्रम सुरू करायचे आहेत म्हणून त्यांनी एका सेकंदात ती जागा मंडळाला दिली.''  तिथे उपस्थित सर्वांच्याच नजरेत आदरभाव दाटून आला होता. जणू वामनराव परब समोर बसले आहेत. 
 

 
क्षणभर पसरलेल्या शांततेला विराम देत फडके म्हणाले, ''हे मंडळच कसे सुरू झाले याचाही इतिहास आहे. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी लादली गेली. मुलुंडच्या आम्ही संघस्वयंसेवकांनी ठरवले की, आणीबाणीतही संघविचारांवर काम करणारे मंडळ निर्माण करून त्याद्वारेच संघाचे सर्व उत्सव, विचार समाजमनात पेरायला हवेत. त्यातूनच मग 'सन्मित्र सेवा मंडळा'ची निर्मिती झाली. आणीबाणीत सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही मुलुंडचे स्वयंसेवक एकत्रित येत असू, उपक्रम राबवत असू, संघाच्या गतविधी करत असू. पुढे आणीबाणी संपल्यानंतर पहिल्या विजयादशमीला संघ पोषाखातच, ध्वजारोहण, प्रार्थना करत आम्ही सन्मित्र सेवा मंडळाचे रितसर उद्घाटन केले होते. प्रेमजीभाई ठक्कर,मधुकर नवरे, श्रीकृष्ण मुश्रीफ आणि सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांनी 'सन्मित्र सेवा मंडळा'ला नेहमीच मार्गदर्शन केले.'''सन्मित्र' तर संघाचीच संस्था अशी ओळख. इतर विचारधारेच्या सत्ताधार्‍यांकडून, संस्थांकडून कधी काही त्रास झाला असेल का? यावर सुरेश साळवी म्हणाले, '' ही संस्था रा.स्व.संघाच्या विचारांवर चालणारी म्हणजे, 'सब समाज को साथ लिए' चालणारी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आर्थिक, सामाजिक वंचित, मागासलेल्या समाजबांधवांसाठी 'सन्मित्र' नेहमीच कार्यरत राहिला आहे. त्यामुळे  प्रत्येक विचारसरणीच्या लोकांना 'सन्मित्र सेवा मंडळ' आपलेच वाटते. त्यामुळे मंडळाला कधीही कुणाचाही उपद्रव झाला नाही, उलट सर्वत्र स्वागतच केले गेले.'' सुरेश साळवींचे म्हणणे खरेच होते, मंडळाच्या उपक्रमाचा लाभ समाजाच्या सगळ्याच थरातून आलेल्ज्ञी लोक घेत होते. 'सब समाज को साथ लिए' इथे वास्तवात निर्माण झालेले दिसले.
 
 

सन्मित्र सेवा मंडळ म्हणजे रा.स्व.संघाची संस्था अशी सुरुवातीपासूनच मंडळाची यथार्थ ओळख निर्माण झालेली. त्यामुळे मंडळातर्फे उभा केलेला कोणताही प्रकल्प सचोटीचा आणि समाजकल्याणकारी असावा, असा मंडळाचा कटाक्ष. मंडळातर्फे बालवाडी, संस्कारकेंद्र, अभ्यासिका, महिला स्वयंरोजगारासाठी विविध कोर्सेस, आरोग्य शिबिरे, संमेलने, वीजभरणा केंद्र, पुस्तकपेढी असे नानाविध उपक्रम राबविले जातात, तेही ’सब समाज को साथ लिए’ या विचाराने....

 
 
 ( संपर्क: सन्मित्र सेवा मंडळ, 
 जीवन फडके-९८६९१३६८६६)