आयुर्वेदिक रेसिपी- बिंबीफलम्
 महा त भा  18-Jul-2017

 

आरोग्यदायी फळभाज्या

 

परवा मंडईत भाजी आणण्यासाठी गेले असताना एक आई आपल्या ६ वर्षाच्या मुलाला भाज्या खाण्याचं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. मी त्यांचं संभाषण ऐकून मनातल्या मनात हसत होते. एकच गोष्टीचा आनंद होत होता ती म्हणजे निदान ती आपल्या मुलाला भाजी खरेदीसाठी घेऊन तरी आली होती. सध्याची परिस्थिती अशी आहे कि आईला मुलांनी भाज्या खाव्यात म्हणून गयावया कराव्या लागतात. रोज जेवणाच्या वेळी मुलाने अमुक भाजी खाल्ली तर त्याला अमुक वस्तू बक्षिस म्हणून दिली जाईल असे आमिष दाखवले जाते. परिणामी मुलं काही आमिष दाखवल्याशिवाय अन्न खातच नाहीत. मुलांना निसर्गाची आवड निर्माण झाल्याशिवाय ते ताजे अन्न खाणारच नाहीत कारण सगळीकडे त्यांना कृत्रिम, आकर्षक पॅकिंग केलेले जिन्नस दिसतात आणि त्यांना नेहमी असंच काहीतरी खायला मिळावं असं वाटतं. म्ह्णूनच मुलांना कुठल्या गोष्टींचा exposure मिळावा हे आपणच ठरवावं. त्यांना सुपरमार्केट मध्ये घेऊन जायचं कि ताज्या भाज्या आणि फळं दिसतील अशा मंडईत! त्यांना त्या भाज्या त्यांच्या हातात देऊन त्या खाल्ल्याने त्यांना काय-काय फायदे होतील हे नीट समजावून सांगावे. त्यासाठी आपण स्वतः आधी ते सर्व जाणून घ्यावे. हे सदर त्यासाठीच सुरु केलेले आहे. सामान्य जनतेला साध्या व सकस आहाराचे फायदे कळावे आणि त्यांनी जास्तीत जास्त ताजा आहार खावा व आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यावी.

आजच्या लेखात तोंडल्याचे रायते आणि त्याची कृती व फायदे लिहीत आहे.

 

बिंबीफलम् (तोंडल्याचे रायते)

संदर्भ: क्षेमकुतूहल


 

तोंडल्याचे रायते ही अतिशय स्वादिष्ट अशी डिश आहे. ज्यांना तोंडल्याची भाजी आवडत नाही त्यांना तोंडल्याचे रायते कदाचित दही असल्यामुळे आवडेल. हे रायते फुल्के/पोळी बरोबर छान लागते.

 

साहित्य:-

२५० ग्रॅम हिरवी तोंडली

३-४ चमचे ताजे दही

१ चमचा मोहरी

१ चमचा जिरे

चिमूटभर हिंग 

चवीपुरते शेंदेलोण किंवा मीठ

२ चमचे गाईचे तूप

वाढणी (Serves) :- २

 

कृती:-

१. सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत जेणेकरून त्यावर असलेली माती निघून जाईल.


 

२. तोंडली कापडाने पुसून त्याचे पाणी टिपून घ्यावे. नंतर तोंडले उभे चिरून घ्यावे. एका कढईत थोडे तूप घेऊन चिरलेली तोंडली तुपात (झाकून) अर्धवट शिजवून घ्यावी.

३. तोंडले अर्धवट शिजले कि थोडे गार होऊ द्यावे.

४. एका छोट्या कढईत फोडणीसाठी तूप घ्यावे. चांगले गरम झाले कि मोहरी, जिरे व हिंग घालावे. मोहरी व जिरे तडतडले की गॅस बंद करून शिजवलेल्या तोंडल्यांना फोडणी द्यावी.

५. तोंडल्याच्या फोडींमध्ये चवीपुरते मीठ व दही घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.

६. तयार रायते सर्व्ह करताना चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.


 

फलश्रुती:-

१. तोंडले शीत म्हणजे थंड असल्यामुळे पित्त प्रकृती साठी हितकारक आहे.

२. तोंडले हे स्तंभक आहे म्हणजेच रक्ताचा स्त्राव होत असल्यास त्याचे स्तंभन कमी करून रक्तस्त्राव थांबवते. म्हणूनच रक्तपित्तासारख्या व्याधींमध्ये अतिशय पथ्यकारक अशी ही भाजी रुग्णाला नियमित द्यावी.

३. मलावरोधाचा त्रास असल्यास तोंडल्याचे रायते द्यावे म्हणजे मल प्रवृत्ती होऊन अवरोध कमी होतो.

४. प्रत्यक्ष तोंडल्याला काही चव नसली तरी तोंडल्याचे रायते रुचिकारक असल्यामुळे तोंडाला चव नसताना आवर्जून खावे.

५. जास्त प्रमाणात खाल्ल्यास आध्मान म्हणजे पोटफुगी चा त्रास होऊ शकतो म्हणून मात्रेतच खावे.

 

तोंडल्याची भाजी आपण कधीतरी करत असतो, तोंडल्याचे रायते मात्र क्वचितच केले जाते. तोंडल्याच्या रायत्याचे फायदे पाहता हे नक्की करून पाहावे.

 

- वैद्य विशाखा मोघे