आज कोकणात मुसळधार पावसाची शक्यता-पुणे हवामान खाते
 महा त भा  17-Jul-2017

 

पुणे : महाराष्ट्रात आज ३६ जिल्ह्यांत मिळून सरासरी १४.७ मिमी पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. काल कोकण आणि गोव्यात समाधानकारक पाऊस झाला असून पश्चिम भारताच्या सागरी भागात मान्सून समाधानकारक असल्याची माहितीदेखील हवामान विभागाने दिली आहे.

 

आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील  तीन दिवस पाऊस काही प्रमाणात कमी झाला तरी या आठवड्यात सातत्याने पाऊस राहणार आहे. विदर्भ विभागात पुढील दोन दिवस १८ व १९ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही भागात चांगला पाऊस या आठवड्यात होणार आहे, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

 

काल दिवसभरात खंडाळ्यात २१ सेंमी, भिऱ्यात ९ सेंमी, अलिबाग मध्ये ८ सेंमी, महाबळेश्वर येथे ६ सेंमी तर मुंबईत ५ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदियामध्ये ४ सेंमी पाऊस झाला आहे. या आठवड्यात कोकण आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत तर मध्य महाराष्ट्रात काही भागात पाऊस होईल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 

महाराष्ट्रात काल विदर्भ विभाग वगळता ११.४ मिमी पावसाची नोंद झाली. शिरगाव, ताम्हिणी घाटात १२ सेंमी, लोणावळ्यात १० सेंमी, कोयना धरण परिसरात ९ सेंमी पाऊस झाला आहे. तसेच वैतरणा धरण परिसरात ८ सेंमी, विहार आणि भातसा धरण परिसरात ७ सेंमी, वैतरणाच्या मध्य भागात ५ सेंमी तर तानसा आणि तुळशी धरणात ४ सेंमी पावसाची नोंद आज झाली आहे.