चीनच्या सेन्सॉर बोर्डने घातली 'या' कार्टूनवर बंदी
 महा त भा  17-Jul-2017

बीजिंग : स्वदेशाची अस्मिता आणि स्वाभिमानाविषयी अत्यंत जागरूक आणि दक्ष असलेला देश म्हणून 'चीन'ची जगभरात ओळख आहे. आपल्या स्वायत्ततेला आणि स्वाभिमानाला चीन कधीही धक्का लागू देत नसल्याचे चीनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. देशाच्या सर्वोच्चपदाची खिल्ली उडवली जात असल्याच्या कारणाने चीनने आपल्या देशात 'विनी द पू' या कार्टूनवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मिडीयावर चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांची तुलना 'विनी द पू' या कार्टूनमधील 'पू' या अस्वलाशी केली जात असल्याच्या कारणाने चीनने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


चीनच्या सेन्सॉर बोर्डने नुकताच हा निर्णय घेतला असून यापुढे देशात सोशल मिडिया आणि सार्वजनिक ठिकाणी 'विनी द पू' या कार्टूनमधील कोणत्याही पात्राचा फोटो अथवा खेळण्याच्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील सोशल मिडीयावर शी झिनपिंग आणि जगातील इतर देशांच्या प्रतिनिधींची खिल्ली उडवली जात आहे. 'विनी द पू'मधील पात्रांची झिनपिंग आणि इतर देशांच्या नेत्यांशी तुलना करून त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदाचा एक प्रकारे अपमान होत असल्याची भावना चीनच्या सेन्सॉर बोर्डने व्यक्त केली आहे. त्यामुळे या कार्टूनच्या वापरावर चीन सेन्सॉर बोर्डने बंदी घातली आहे.