जिल्हा नियोजनच्या कामाचे मॉनिटरींग होणार – जिल्हाधिकारी
 महा त भा  17-Jul-2017भंडारा :  जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाचे मॉनिटरींग करण्यासाठी मेकॅनिझम तयार करण्यात आले असून प्रत्येक कामाला कोड नंबर, युनिक आयडी, यासह काम मॉनिटर करण्याची पध्दत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विकसित केली असून यापुढे जिल्हा नियोजनमधील कामाच्या मंजूरीपासून ते निविदा प्रक्रिया व कार्यदेश देण्यापर्यंत तसेच कामाच्या यशस्वीतेपर्यंत मॉनिटरींग केले जाणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी यापुढे सिमनिक प्रणालीवर योजनानिहाय माहिती अपलोड करावी, यासाठी नमूना परिपत्रक लवकरच देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. 

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उप वनसंरक्षक विवेक होशिंग, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ अखेर झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत निधी मागणी प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. निधी मागणी प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 

जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, असे त्यांनी सांगितले. त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी यांच्याशी विचार विनिमय करुन कामे प्रस्तावित करावी, असे ते म्हणाले. जिल्हा नियोजन मधून सुचविण्यात आलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषि, रेशीम व मत्स्योपादन या क्षेत्राला प्राधान्यक्रम देण्यात आला असून या क्षेत्राच्या विकासाचे व्हिजन प्रत्येक कामात प्रगट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

योजनांची परिणामकारकता ही अंमलबजावणीवरच असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा नियोजनच्या कामाची ऑनलाईन मॉनिटरींग करण्यासाठी मेकॅनिझम तयार करण्यात आले असून प्रशासकीय मान्यतेपासून कार्यादेशापर्यंत व त्यापूढे कामाचा प्रगती अहवाल हा या पध्दतीचा महत्वाचा भाग असणार आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपली माहिती ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टीममध्ये नोंदवायची आहे. कामाचा वेळोवेळी प्रगती अहवाल सुध्दा नमूद करावा, असे ते म्हणाले. जिल्हा नियोजनमधील मागील तीन वर्षाच्या कामाचा डेटाबेस तयार करण्यात येत असून तो ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्व यंत्रणांशी शेअर केला जाईल. 


पुनर्वसित २३ गावातील नागरिकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळाला याचे संपूर्ण सर्वेक्षण करुन ज्या योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळाला नाही त्यांच्यासाठी लवकरच शिबीर आयोजित करुन सर्व योजना पुनर्वसित गावात पोहचविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये उत्तम व्यवस्थापनाचे गुण असावेत असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, अधिकाऱ्यांसाठी व्यवस्थापन कौशल्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. याचा उपयोग योजना राबविण्यामध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबैठकीनंतर डावीकडील विचारसरणी अंतर्गत कामांचा आढावा त्यांनी घेतला.