राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठीचे मतदान संपले
 महा त भा  17-Jul-2017

 

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले आहे. २० जुलै गुरुवार या दिवशी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदी कोण विराजमान होणार याची माहिती संपूर्ण देशाला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी संसदेत तर प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विधानसभेत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Embeded Object

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विधानसभेत मतदान केले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन बीजू पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी आणि देशातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या विधानसभेत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Embeded Object

 

महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर वगळता २८८ पैकी २८७ सदस्यांनी मतदान केले. भाजपा खासदार संजय काकडे यांनी देखील आज विधान भवनातून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत मंत्रीमंडळातील सहकारी विनोद तावडे, गिरीष महाजन आदी मंत्र्यांनी देखील मतदान केले.  

Embeded Object

 

रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना १८ घटक राज्य आणि ७ इतर पक्ष असे मिळून एकूण ६०.३० टक्के पाठींबा असल्याने निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. राष्ट्रपती पदाच्या मतदानाला आज सकाळी १० वाजता सुरुवात झाली होती, ते सायंकाळी ५ वाजता संपलं.

 

हिमाचलप्रदेशमध्ये १०० टक्के मतदान झाले असून ६७ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एका आमदाराचे निधन झाले असल्याने ६८ मधून ६७ आमदारांनी मतदान केले आहे. संसदेत भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.