जळगाव मनपाची धडाकेबाज मोहीम अवघ्या काही तासांत गोलाणी चकाचक
 महा त भा  17-Jul-2017


 

जळगाव: सकाळी पावणेसहा वाजताची वेळ... साडेपाचशे कर्मचार्‍यांचा मोठा ताफा... घमेली, फावडी, हातोडा, करवत, खराटे, शिड्या आदी गोळा केलेले साहित्य... एकामागून एक आलेले ट्रॅक्टर, डम्पर आणि इतर वाहनांची लागलेली रांग... शिस्तीत उभे असलेले अधिकारी... गेल्या अनेक वर्षात जळगावकरांनी असे चित्र कधी बघितले नव्हते, ते आज दिसले. गोलाणी मार्केटच्या स्वच्छता मोहिमेसाठीची ही सज्जता होती आणि पूर्वनियोजनानुसार अवघ्या काही तासांत प्रभारी आयुक्तांच्या मार्गदर्शनात ती पारदेखील पडली.

मार्केटमधील अस्वच्छता महापालिकेकडून दूर होऊच शकत नाही असे कायम वाटत आलेल्या जळगावकरांना आजची मोहीम म्हणजे आश्‍चर्याचा सुखद धक्काच देणारी ठरली.

मार्केटमधील घाण, अस्वच्छता, सांडपाण्याचा निचरा न होणे आणि दुर्गंधी यामुळे मार्केट परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाल्याच्या एका तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोलाणी मार्केटमधील आणि परिसरातील सर्व गाळे १६ ते १९ जुलै २०१७ पर्यंत बंद ठेवण्याचे सक्त आदेश जळगावचे उपविभागीय दंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले होते. ही बंदी उठविण्यासाठी आणि मार्केट स्वच्छ होण्यासाठी गाळेधारकांनीही सहकार्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार मार्केटच्या स्वच्छतेसाठी सोमवारचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. त्याचे नियोजन रविवारी रात्रीच करण्यात आले होते.


सकाळी सहा वाजता सुरुवात
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हातात सूत्र होती. सोमवारी सकाळी सहा वाजता महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा मोठा ताफा कामाला लागला. तळमजला ते थेट गच्चीपर्यंत, प्रत्येक विंगमधील इंचन् इंच जागेचा स्वच्छताकामी विचार करण्यात आलेला दिसत होता. खातेप्रमुख, अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि त्यांच्या दिमतीला कर्मचारी अशी रचना करण्यात आली होती. यातून आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण निर्मूलन, अग्निशमन, वाहन विभाग... कुणाचीच सुटका नव्हती.

अधिकार्‍यांची उडाली भंबेरी
साडेनऊच्या सुमारास प्रभारी आयुक्त तिसर्‍या मजल्याची पाहणी करीत असताना महापालिकेला लागूनच असलेल्या विंगमध्ये काही गाळे व सभागृहांना कुलूप असून आत कमालीची घाण असल्याचे आढळले. तिथे दुर्गंधीही सुटली होती. आयुक्तांनी त्याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केली. या जागांचे मालक कोण आहेत... बोलवा त्यांना... ताबा कोणाकडे आहे... मार्केटचा नकाशा कुठे आहे...साहेबांनी विचारलेल्या प्रश्‍नांच्या फैरींना उत्तरे देताना अधिकार्‍यांची भंबेरी उडत होती.

कुलूप तोडा अन् स्वच्छता करा
एका ठिकाणी गाळ्याच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. त्याचा अर्धा भाग तुटलेला होता. आत घाण साचली असल्याचे दिसताच आयुक्तांनी कुलूप तोडून सफाईचे आदेश दिले. कर्मचारी तातडीने पुढे सरसावले. त्यांनी हातोड्याच्या एक-दोन घावातच कुलूप तोडून सफाईला सुरुवात केली. गाळा किंवा सभागृह अनधिकृतपणे कुणी ताब्यात घेतले असल्यास त्यांची कुलुपे तोडून ते पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे निर्देशही प्रभारी आयुक्तांनी दिले. त्यासाठी त्यांनी एक तासाची मुदतही दिली. गाळे रिकामे असल्याने महापालिका हक्काच्या उत्पन्नास मुकत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.


कागदाचे दोन कपटे महागात
जिल्हाधिकारी कार्यालयातील काम आटोपून दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रभारी आयुक्त मार्केटच्या पाहणीसाठी पुन्हा हजर झाले. महापालिकेला लागून असलेल्या पहिल्या विंगपासून त्यांनी पाहणीस सुरुवात केली. तेथून गच्ची आणि पुन्हा तळमजल्यावर ते आले. शेवटच्या विंगमधील एका मोबाइल विक्रेत्याच्या दुकानाबाहेर कागदाचे दोन कपटे पडलेले दिसून आले. त्याला एक हजार रुपये दंड करण्याचे आदेश जागेवरच प्रभारी आयुक्तांनी दिले. दुकानदाराने विनंती केली मात्र, मनपाचे अधिकारी ऐकण्यास तयार नव्हते. काही गाळ्यांच्यासमोर सायकली उभ्या होत्या. त्यांचीही विचारणा करून सायकली पार्किंगमध्येच लावण्याची सूचना करण्यात आली.


या मजल्यावरून-त्या मजल्यावर
प्रभारी आयुक्त तर झपाटल्यागत मार्केटमधील स्वच्छतेची पाहणी करीत या मजल्यावरून त्या मजल्यावर, एका विंगमधून दुसर्‍या विंगमध्ये अख्खे मार्केट गोलगोल फिरत होते. त्यांच्या धाकाने स्वच्छता कर्मचार्‍यांकडून काम करून घेताना प्रसंगी अधिकारी वा अभियंत्यांनाही स्वतःला कामाला जुंपून घ्यावे लागत असल्याचे वेगळे दृश्य यानिमित्ताने जळगावकरांना दिसले.

प्रभारी आयुक्तांची धास्ती खाल्ली
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर सात वाजता मार्केटमध्ये हजर झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षक होता. त्यांनी मनपा अधिकार्‍यांकडून ‘पटापटा’ माहिती घेतली आणि स्वच्छतेची पाहणी करण्यास तत्काळ सुरुवात केली. तळमजल्यापासून ते गच्चीपर्यंत प्रत्येक विंग, प्रत्येक भाग ते स्वतः पायी फिरत होते. अस्वच्छ असलेला भाग, साचलेला कचरा, मातीचे ढीग, घाण तातडीने साफ करण्याचे निर्देश मनपाच्या खातेप्रमुखांना देत होते. पाहणी करून ‘साहेब’ निघून जातील, असे काही अधिकारी व कर्मचार्‍यांना वाटत होते. प्रत्यक्षात घडले उलटेच.

अधिकार्‍यांना घाम फुटू लागला
पाहणीची पहिली फेरी संपल्यावर प्रभारी आयुक्तांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली. आधी दिलेल्या सूचनांचे पालन झाले की नाही, स्वच्छता झाली की नाही याचा आढावा ते घेऊ लागले. एक... दोन...तीन फेर्‍या होऊन गेल्या. पण साहेबांचे फिरणे काही थांबत नव्हते. ते थकलेले दिसत नव्हते मात्र, अधिकार्‍यांना आता घाम फुटू लागला असल्याचे दिसत होते.