युद्धबंदी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला पूर्ण हक्क आहे - भारताने पाकिस्तानला खडसावले
 महा त भा  17-Jul-2017


 

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या डीजीएमओ अर्थात लष्करी कारवाई महासंचालनालयाच्या वतीने १७ जुलै रोजी डीजीएमओ स्तरीय चर्चा आयोजित करण्यात आली. चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अथमाकूम क्षेत्रात पाकिस्तानच्या चार जवानांच्या आणि एका नागरिकाच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित केला.

त्याला भारतीय डीजीएमओने उत्तर देताना अधोरेखित केले की, युद्धबंदी उल्लंघनाच्या सर्व घटनांची सुरुवात पाकस्तानी लष्कराने केली असून भारतीय लष्कराने त्याला केवळ योग्य प्रत्युत्तर दिले आहे. याखेरीज नियंत्रण रेषेलगतच्या पाकिस्तानी चौक्यांजवळून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र घुसखोरांविरुद्धच केवळ भारतीय सैन्याने गोळीबार केला आहे.

नियंत्रण रेषेलगत घुसखोरी पाकिस्तानी चौक्यांच्या सक्रिय पाठिंब्याने सुरु असते. ज्याचा परिणाम नियंत्रण रेषेलगतच्या शांतता आणि सलोख्यावर होतो तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवरही होतो, यावर डीजीएमओने भर दिला. पाकिस्तानी सैन्याचा पाठिंबा असलेल्या सीमेपलीकडून कारवायांच्या माध्यमातून आमच्या सैन्याला लक्ष्य केले जाते.

युद्धबंदी कराराच्या उल्लंघनाच्या कुठल्याही घटनेला योग्य प्रत्युत्तर देण्याचा भारतीय लष्कराला पूर्ण हक्क आहे. मात्र नियंत्रण रेषेलगत शांतता आणि सलोखा राखण्याच्या प्रयत्नात भारत प्रामाणिक असून समोरुनही तसेच अपेक्षित आहे, हे डीजीएमओने स्पष्ट सांगितले.