लाच द्या; कारागृहात चैनीत राहा!
 महा त भा  17-Jul-2017
 

 
 
 
अनेक राजकीय नेते, समाजकंटक, उद्योजक यांनी पैशाच्या जोरावर आपल्याला हव्या त्या गोष्टी कारागृहात कशा प्राप्त होतील यासाठी ‘यशस्वी’ खटपट केल्याचे तुम्ही आम्ही चांगल्याप्रकारे जाणून आहोत. या आधीही असे प्रकार घडले आहेत आणि अलीकडेही घडत आहेत. जोपर्यंत भ्रष्ट यंत्रणा आहे, तोपर्यंत असे प्रकार घडत राहणार. ५९ वर्षांच्या शशिकला यांची स्वतंत्र स्वयंपाकघराची, खासखान साम्याची सुविधा डी. रूपा यांच्या अहवालामुळे तूर्त तरी बंद झाली असावी. उडालेला धुरळा खाली बसल्यावर पुन्हा या सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत म्हणजे मिळविली!
 
अण्णाद्रमुकच्या नेत्या शशिकला सध्या बंगळुरू या परपण्णा अग्रहार मध्यवर्ती कारागृहात १५ फेब्रुवारीपासून शिक्षा भोगत आहेत. शशिकला यांना दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास भोगण्याची जी शिक्षा खालच्या न्यायालयाने ठोठावली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने कायमठेवल्याने कारागृहाच्या चार भिंतीत राहण्यावाचून त्यांच्यापुढे अन्य पर्यायच नव्हता. जयललिता यांच्या बेकायदा संपत्तीसंदर्भातील खटल्यामध्ये शशिकला यांना सप्टेंबर, २०१४ मध्येच न्यायालयाने दोषी ठरविले होते, पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकच्या आपणच सर्वेसर्वा आहोत, अशा थाटात वावरू लागलेल्या शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दणका बसला आणि त्यांना थेट बंगळुरुचा तुरुंग गाठावा लागला. आपल्याकडील प्रचंड धनसंपत्तीच्या जोरावर राजकारण करणार्‍या शशिकला यांनी कारागृहात या धनसंपत्तीचा वापर करून आपल्याला हव्या त्या सोयी-सुविधा पदरात पाडून घेतल्या असल्याचा खळबळजनक आरोप भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पदावरील अधिकारी डी. रुपा यांनी केला आहे. कोणी राजकीय नेत्याने असा आरोप केला असता, तर त्याकडे विशेष लक्ष गेले नसते. पण एक वरिष्ठ पोलीस अधिकारीच जेव्हा असा आरोप, आपल्या वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालात करते, तेव्हा त्याची दखल घेतली जाणे स्वाभाविकच आहे. आपली कारागृहात चांगली बडदास्त ठेवली जावी, अतिविशिष्ट व्यक्तींना ज्या सोयी-सुविधा बाहेर मिळतात, त्या कारागृहात आपणास मिळाव्यात, यासाठी शशिकला यांनी दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप डी. रूपा यांनी आपल्या अहवालात केला आहे.
 
पोलीस अधिकारी डी. रुपा यांनी केलेल्या आरोपांमुळे केवळ कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतच खळबळ उडाली नाही, तर देशभरातील प्रसिद्धी माध्यमांनीही या घटनेची नोंद घेतली. कर्नाटक सरकारला लगेच आपण काही तरी करीत असल्याचे दाखवावे लागले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या लाच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.पोलीस अधिकारी डी. रूपा यांनी आपल्या अहवालात कर्नाटकचे कारागृह महासंचालक सत्यनारायण राव यांना शशिकला यांनी एक कोटी रुपये लाच दिली असल्याचे म्हटले आहे. शशिकला यांना कारागृहात स्वतंत्र स्वयंपाकगृह हवे होते. ती सोय करून देण्यासाठी एक कोटी रुपये त्यांनी कारागृह महासंचालकांना दिले. तसेच कारागृहात आपली सरबराई चांगली व्हावी म्हणून त्या कारागृहातील अधिकारी वर्गास उर्वरित एक कोटी दिले गेल्याचे पोलीस अधिकारी डी. रूपा यांनी अहवालात म्हटले आहे. कारागृहातील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी किती कोडगे, गैरमार्गाने मिळणारा पैस हडप करण्यासाठी हपापलेले आहेत, त्याचे प्रत्यंतर या घटनेच्या निमित्ताने आले.
 

डी . रूपा यांची बदली
अण्णा द्रमुक नेत्या शशिकला यांना कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचे वृत्त जगजाहीर झाल्याने पुरती नाचक्की झालेल्या कर्नाटक सरकारने ही माहिती ज्या डीआयजी (कारागृहे) डी. रूपा यांनी आपल्या अहवालद्वारे सरकारला दिली होती त्यांची अखेर बदली केली आहे. केवळ डी. रूपा यांच्यावर कारवाई केली असे दिसायला नको म्हणून डीजीपी (कारागृहे) सत्यनारायण राव यांचीही बदली केली आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याची किंमत डी. रूपा यांना अशी मोजावी लागली! सेवाशर्तींचे उल्लंघन झाल्याचे कारण पुढे करून केलेली ही बदली प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खचवणारी आहे असे म्हणावे लागेल!.

 
या लाच प्रकरणाचे पडसाद उमटताच चौकशीचे आदेश देण्याबरोबरच शशिकला यांना ज्या कारागृहात ठेवण्यात आले आहे तेथील सुमारे ४० कैद्यांना तेथून बेल्लारी येथील कारागृहात हलविण्यात आले. हे कैदी शशिकला यांना मदत करीत होते म्हणे! पण किती पोलिसांना, अधिकारी वर्गास तडकाफडकी निलंबित केले, ते मात्र समजू शकले नाही. चौकशीच्या नावाखाली एकप्रकारे त्या लाचखाऊ मंडळींना तूर्त तरी अभय मिळाले असावे.
 
कारागृह महासंचालक सत्यनारायण राव यांनी मात्र डी. रूपा यांनी अहवालात जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच ही माहिती प्रकट करून त्यांनी सेवाशर्तींचा भंग केल्याचा आरोप राव यांनी केला आहे. त्यांना नियमांची माहिती नसावी, असे भाष्यही त्यांनी केले आहे. पण डी. रूपा यांनी, आपण अहवालात जी माहिती दिली आहे, ती बरोबर असून ती सर्व माहिती राज्याचे पोलीस महासंचालक आर. के. दत्ता यांना सादर केली असल्याचे म्हटले आहे. आपण ही माहिती माध्यमांना दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व लाच प्रकरण बाहेर काढल्याबद्दल डी. रूपा यांचे कौतुक करणे दूरच उलट सरकारने त्यांच्यावरच नोटीस बजावली आहे. माध्यमांना ही माहिती कशी दिली, अशी विचारणा कर्नाटक सरकारने त्यांच्याकडे केली आहे. त्यावर, ‘‘मी ही माहिती माध्यमांना दिलेली नाही, त्यांना कशी मिळाली याची चौकशी सरकारने करावी,’’ असे डी. रूपा यांनी सुनावले आहे.
 
एकूण कर्नाटक आणि तामिळनाडूसह सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आहे, पण असा प्रकार प्रथमच घडत आहे, असे नाही. अनेक राजकीय नेते, समाजकंटक, उद्योजक यांनी पैशाच्या जोरावर आपल्याला हव्या त्या गोष्टी कारागृहात कशा प्राप्त होतील यासाठी ‘यशस्वी’ खटपट केल्याचे तुम्ही आम्ही चांगल्याप्रकारे जाणून आहोत. या आधीही असे प्रकार घडले आहेत आणि अलीकडेही घडत आहेत. जोपर्यंत भ्रष्ट यंत्रणा आहे, तोपर्यंत असे प्रकार घडत राहणार. ५९ वर्षांच्या शशिकला यांची स्वतंत्र स्वयंपाकघराची, खासखान साम्याची सुविधा डी. रूपा यांच्या अहवालामुळे तूर्त तरी बंद झाली असावी. उडालेला धुरळा खाली बसल्यावर पुन्हा या सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत म्हणजे मिळविली!
 
शशिकला यांच्या या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अशाच काही जुन्या घटनांवर प्रकाश टाकल्यास ते अप्रस्तुत ठरणार नाही.
 
चारा घोटाळा फेम लालूप्रसाद यादव हे त्यापैकी एक! हे महाशय बिरसा मुंडा कारागृहात कैदी क्रमांक ३३१२ म्हणून कैदेत असताना त्यांना सर्व सुविधा मिळत होत्या. टी.व्ही., दोन खानसामे, तांदळाचा भरपूर पुरवठा, ताजा भाजीपाला, मटन, चिकन, दूध, तूप, फळे यांचा पुरवठा त्यांना केला जायचा. एवढेच नव्हे, तर बाहेरून डबाही त्यांना मिळत होता. एवढ्या सोयी मिळत असतील, तर लालूप्रसादांना कशाला कारागृहाचा जाच वाटेल. सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांचीही अशीच बडदास्त ठेवली जायची. लालूप्रसाद आणि शशिकला यांच्यात फरक म्हणजे शशिकला यांना त्यासाठी दोन कोटी रुपये मोजावे लागले, पण लालूप्रसाद यांना तुरुंग नियमावलीनुसार या सुविधा मिळाल्या. अभिनेता संजय दत्त हाही अशाच व्हीआयपी सुविधांमुळे चर्चेत राहिला होता. संजय दत्त तुरुंगातून सतत बाहेर कसा काय येतो याचीच चर्चा होत राहिली. आपले काही नेतेही कारागृहाचा कंटाळा आला की, प्रकृती बिघडल्याचे दाखवून इस्पितळात मस्तपैकी आरामकरीत असल्याचे सर्व विदित आहेच. (नावे सांगायची गरज आहे का?)
 
राजकारणी मंडळीच असे लाभ उठवितात असे नव्हे, तर नामचीन गुंड, माफिया हेही असे फायदे लाटत असतात. कोणाचे तरी हात ओले केल्याशिवाय त्यांना हवे ते मिळणे शक्य नाही, हे सांगायला जाणकाराची गरज नाही. उत्तमअन्न, मोबाईल, दारू असे या मंडळींना पाहिजे ते मिळत असते.आपली यंत्रणा अत्यंत भ्रष्ट असल्यामुळेच या सर्वांचे फावते आहे. शशिकला-पुराणाच्या निमित्ताने ही यंत्रणा किती पोखरलेली, किडलेली आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला इतकेच! वरपासून अगदी तळापर्यंतची यंत्रणा जेव्हा खरोखरच सुधारेल तेव्हा असे प्रकार थांबतील. ‘मी खाणार नाही आणि कोणालाही खाऊ देणार नाही,’ असा निर्धार करणारी व प्रत्यक्ष कृती करणारी प्रशासकीय यंत्रणा उभी राहिली तरच हे शक्य होईल.
 
- दत्ता पंचवाघ