Advertisement
प्रा. बाळ आपटे दालनाचे डिजिटल अनावरण
 महा त भा  17-Jul-2017

 

प्रा. बाळ आपटे दालन युवकांना प्रोत्साहन देईल -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताच्या इतिहासात विद्यार्थी चळवळीचे मोठे योगदान आहे. प्रा. बाळ आपटे यांचा देखील विद्यार्थी चळवळीत महत्वाचा वाटा आहे. प्रा. बाळ आपटे दालनामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थी चळवळीचे महत्त्व समजण्यास मदत होईल. प्रा. आपटे यांचे हे दालन युवकांना प्रोत्साहन देईल आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्त्व निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी व युवक चळवळीचे योगदान देणाऱ्या प्रा. बाळ आपटे यांच्या प्रस्तावित दालनाच्या डिजिटल अनावरणाचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रा. बाळ आपटे हे एक समर्पित नेतृत्व होते. त्यांनी अनेक युवकांना आणि  विद्यार्थ्यांना घडवले. युवकांमधील नेतृत्व गुण विकसित केले. प्रसिद्धीपासून दूर राहून ते आपले काम करत राहिले. एक प्रथितयश वकील, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण चळवळीला दिशा देणारे दिशादर्शक म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवली. प्रत्येक काम आणि जबाबदारी निष्ठेने, मेहनतीने करत राहिले. हे काम करताना त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले. प्रा. बाळ आपटे यांची छाप असलेले अनेक विद्यार्थी समाजात आहेत. आजच्या घडीला युवकांना राष्ट्रीय युवाशक्तीसाठी प्रेरित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःपुरता विचार न करता राष्ट्राचा विचार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

       Embeded Object

आपल्या भाषणात विनोद तावडे म्हणाले की, राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्र उभारणीमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रा.बाळ आपटे हे विद्यार्थी चळवळीमध्ये फार सक्रिय होते. प्रा. आपटे यांचा विद्यार्थी संघटना तसेच युवक चळवळींमध्ये प्रमुख सहभाग होता. प्रा. आपटे यांनी युवकांना राष्ट्र उभारणीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.

 Embeded Object

प्रा.आपटे यांच्या प्रस्तावित दालनामध्ये प्रा. आपटे यांचे विद्यार्थी चळवळीतील योगदान त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्थापन झालेल्या विद्यार्थी संघटना,त्या संघटनाच्या माध्यमातून झालेल्या विद्यार्थी चळवळी, आदी सर्व   ऐतिहासिक घटनांचा संदर्भ,त्याची माहिती एकाच ठिकाणी एकत्रित स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल. या प्रस्तावित दालनाच्या माध्यमातून आजच्या युवक पिढीला विद्यार्थी चळवळीची माहिती मिळावी या उद्देश्याने प्रा.बाळ आपटे दालनाची निर्मिती करण्यात येणार आहे. आज या दालनाचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले असून,दिवंगत प्रा.आपटे यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने १९ जानेवारी  २०१८ रोजी या दालनाचे प्रत्यक्ष उद्घाटन होईल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

 Embeded Object

महसूलमंत्री पाटील म्हणाले, प्रा. बाळ आपटे यांनी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विद्यार्थी चळवळीचे महत्व मोठे आहे. प्रा. बाळ आपटे दालन विद्यार्थी व युवक चळवळींचे राष्ट्रीय उभारणीतील योगदान यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थी चळवळीचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख,  निर्मला आपटे, गीताताई गुंडे,आपटे कुटुंबीय आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

 

 

Advertisement