डॉ. हेडगेवार कुलोत्पन्न प्रा. यशवंतराव केळकर
 महा त भा  16-Jul-2017

 

कुळाचा, घराण्याचा वारसा जतन करणे, ही आपली परंपरा. आत्मविलोपी राहून घराण्याची वैशिष्ट्य जपण्याची पराकाष्ठा करायची. संगीत असो की संगिन असो, अध्यात्म असो की सेवा असो, निरंतर आराधना करायची. कुळाला साजेसा आचार-विचार जोपासायचा, कुळाचा नावलौकिक वाढवायचा. प्रा. यशवंत वासुदेव केळकर हे अशाच एका प्रथितयश कुटुंबाचे घटक; पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार कुटुंबाचे. डॉ. हेडगेवारांना पाहण्याचे, ऐकण्याचे, त्यांच्या जादुई सहवासाचा आनंद ज्यांना मिळाला नाही; त्यांनी स्व. यशवंतराव केळकरांच्या भेटीत, सहवासात त्याचा थोडाफार अनुभव घेतला असेल. प्रसन्न चेहरा, चेहर्‍यावर सदाबहार मंद स्मित हास्य, सांगण्यापेक्षा ऐकण्यासाठी टवकारलेले कान, पारदर्शिकतेचा सहज अनुभव यावा, असा शब्दागणिक जिव्हाळा. समाजाला संवेदनशील बनवायचे आहे, आपलेपणा, आपुलकीने स्वाभिमानी, स्वावलंबी करायचे आहे, याची सतत जाणीव करून देणारी वाणी. चेहर्‍यावर थकल्याचे, दमल्याचे चिन्ह नाही. रा. स्व. संघाचे प्रतिज्ञित स्वयंसेवक आहोत, याचे भान असणारे स्व. यशवंतराव केळकरांच्या व्यक्तिमत्त्वातूनच पू. डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घडत असे. गुरुपौर्णिमेला त्यांची आठवण झाली. त्याची ही एक कथा आहे.

 

१९५७-५८ मध्ये महिन्यातून एक बैठक व्हायची. मुंबईचे प्रचारक मा. शिवराय तेलंग, भास्करराव मुंडले, प्रा. यशवंतराव केळकर आणि मी, भाग कार्यवाह असलो तरी विद्यार्थी होतो. गुरुपूजनाच्या दिवशी महाविद्यालयातील संघ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक, आचार्य यांना गुलाबाचे फूल देऊन वंदन करावे, अशी शिवरायजींची सूचना. बैठकीत चर्चा झाली. यशवंतरावांनी आपले मत मांडले. नवीन उपक्रम करीत असताना विद्यार्थी वर्गापासून आपण अलग पडणार नाही, चमकोगिरीचा आपणावर आरोप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चांगली प्रथा टीकेला पात्र होता कामा नये. संघ स्वयंसेवकांबरोबर अन्य विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रम करावा. हा संघाचा कार्यक्रम न ठरता विद्यार्थी जगताचा कार्यक्रम ठरावा. संघाला समाजात पंथ निर्माण करायचा नाही. समाज संघमय करायचा आहे, यावर अधिक भाष्य न केलेले बरे. अनेक महाविद्यालयांतून कार्यक्रमाचे कौतुक झाले. सर्वत्र स्वागत झाले. संघाचे आकर्षण विद्यार्थ्यांत उत्पन्न झाले. मी प्रथम यशवंतरावांना पाहिले, त्याला झाली असतील साठ वर्षे. दहावी-अकरावीच्या ३०-४० अरुण बालांसमोर मुंबईतील इंग्रजीचा प्राध्यापक बोलत होता. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बैठकीत मी त्यांना प्रथम ऐकले. आपण ‘संघाचे स्वयंसेवक’ ही आपली ओळख. समाज आपल्याकडे कौतुकाने, आदराने पाहतो, शिस्तीला दाद देतो, शालिनतेची अपेक्षा करतो. संघात लहान-लहान गोष्टींना महत्त्व अधिक. वेळेचे भान ठेवले, मनातील मत्सर काढून टाकला, समजूतदारपणे व्यवहार केला, तर समाजात आपली विश्र्वासार्हता वाढते आणि आपला विकासही होतो. स्वत:ची कामे नीट करायची मित्र परिवारालाही सवय लावायची, त्यातून विरोधकही प्रशंसक बनतात. संघाला कमीपणा येणार नाही, याची सतत काळजी घ्यायची. हृदयाला भिडणारी सहज, सुंदर, सोप्या भाषेतील मांडणी. इतिहासाचे दाखले नाहीत की, धर्मग्रंथातील अवतरणे नाहीत. उदाहरणेही सहज व्यवहारातील. जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या बैठकीचे ते उदाहरण देत. खेडेगावातून आलेले स्वयंसेवक बैठकीचे स्थान शोधत फिरत होते. थोडे गोंधळले होते. समोरून आलेल्या सामान्य माणसाला; थोडा वेडसर असावा त्याच्याकडे स्थानाची चौकशी केली. उत्तर नकारात्मक, पण तो लगेच म्हणाला की, ‘‘असेच पुढे जा. शंभर-दीडशे पावलांवर डावीकडे अंगण आहे, तेथे चौकशी करा.’’ मी तिथे ३०-४० पादत्राणे रांगेत ठेवलेली पाहिली. तिथेच असावी तुमची बैठक, संघ स्वयंसेवकांशिवाय रांगेची शिस्त तुम्हाला या गावात पाहायला मिळणार नाही. उदाहरण किती साधे नित्याचे, पण अर्थपूर्ण! यशवंतरावांच्या बोलण्याचा थाट काही और!

 

प्राथमिक शाळेपासून बुद्धिमान, हुशार विद्यार्थी ही यशवंतरावांची ओळख. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात ते दाखल झाले. वयाच्या २०व्या वर्षी प्राविण्यासह ते बीए परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयात ज्ञानाच्या कक्षा वाढल्या, बुद्धीला चालना मिळाली. विविध विषयांचे वाद-विवाद, चर्चासत्रात ते आग्रहाने भाग घेत असत. पारतंत्र्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. विविध विचारसरणीचा अभ्यास सुरू झाला. समाजसेवेचा विचार पक्का होत होता. समाजातील संवेदनशीलतेला ग्रहण लागलंय, शिक्षण रुचिहीन, संस्कारशून्य होत आहे, मंदिरातील मांगल्य, पावित्र्य कमी होतंय, घरातीलही आपलेपणा, आदर, मोकळेपणा कमी होतोय... यशवंतरावांचे चिंतन सुरू झाले. यशवंतराव रा. स्व. संघाच्या संपर्कात आले. संघाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन करण्याचा निर्णय पक्का झाला. यशवंतरावांनी संघाचे प्रचारक म्हणून प्रथम नाशिक व नंतर सोलापूर जिल्हा प्रचारक म्हणून प्रभावीपणे कार्य केले. १९४५ ते १९५२ पर्यंत समाजाच्या आडव्या-उभ्या सर्व वर्गात संघाचा विचार त्यांनी पोहोचविला. समाजाच्या तळागाळात जाऊन संघकार्याचा विस्तार केला. प्रचारक म्हणून ते थांबले. १९५५ साली एम. ए. (इंग्रजी) ची परीक्षा प्राविण्यासह प्राप्त करून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. ते प्राध्यापक होते. त्याचवेळी चोखंदळ विद्यार्थी होते. विद्यार्थीप्रिय अध्यापक होते. विषयाचा अभ्यास, पूर्वतयारी आणि व्यासंग यामुळे सहकार्‍यांतही आदरप्राप्त होते. अहंकाराने त्यांना स्पर्श केला नाही. विभागाचे प्रमुख प्राचार्य आणि पुढे हा रस्ता त्यांनी स्वत:हून बंद केला. समाजपरिवर्तनासाठी परंपरा व समाजाच्या गरजा यांचा विचार करून शिक्षण क्षेत्रातील बदल आणि रचना हा मार्ग त्यांनी पत्करला होता. ते शिक्षणतज्ज्ञ होते. विद्यार्थी परिषदेचे अध्वर्यू होते, पण विद्यार्थी नेते नव्हते. करिअर करीत असताना सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे व्यक्तित्त्व घडविणारे आचार्य होते. स्वावलंबी व स्वाभिमानी समाजाच्या निर्मितीचे काम रा. स्व. संघ व विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमांतून होईल, हा त्यांचा दृढ विश्र्वास. ‘सत्ता परिवर्तनातून समाज परिवर्तन’ ही भाबडी कल्पना त्यांना अमान्य होती. परिवर्तनासाठी सकारात्मक विचार करणार्‍या समर्पित कार्यकर्त्यांची टीम असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह. एकमेकांना सांभाळत, आधार देत सामूहिक चिंतन करणारी यशवंतरावांची ‘टीम’ ही संकल्पना दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘Master Mind Group' वा पू. बाळासाहेब देवरसांच्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा ‘संच’ याशी मिळती जुळती आहे. आपल्या प्रकृतीच्या, आवडी-निवडीच्या क्षेत्रात कुवतीनुसार प्रामाणिकपणे कामकरीत असताना आपण अर्पूणांक आहोत, याचे भान ठेवून अहंकार आणि मत्सराला थारा न देता सर्वांचा मिळून पूर्णांक होतो, यावर विश्र्वास ठेवून काम केले, तर समाजात अपेक्षित परिवर्तन सुकर होईल, यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. संसारातही चे जतन केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह.

 

यशवंतरावांना प्रथम संघात व नंतर विद्यार्थी परिषदेत सामाजिक ताणतणावांना तोंड द्यावे लागले. जात-पात, विषमता, उच्च-नीचता, भाषा, शहरी-ग्रामीण यांची सातत्याने उजळणी, चर्चा करीत राहिल्यास प्रश्र्नांची तीव्रता वाढेल, अनिष्ट स्पर्धेेला जोर मिळेल, बौद्धिक वाद-विवाद, टीका-टिप्पणी यांच्या भरीस न पडता, एकाच समाजाचे आपण घटक आहोत. हृदयात करूणा आणि व्यवहारात सकारात्मकता रुजविल्यास विकृती दूर होण्यास मदत होईल. विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमानंतर स्व. यशवंतरावांना मी सहजच म्हटले की, ‘‘विद्यार्थी परिषदेच्या जोशी, परांजपे, साठे, आपटे, पटवर्धन यांचाच भरणा अधिक दिसतो.’’ यशवंतरावांनी प्रतिवाद केला नाही. वर्षभरानंतर बैठकीत माझा परिचय करून दिला. कदम, पाटील, सुर्वे, बिर्जे, पडवळ, गायकवाड, मोहिते आदी पुढील वर्षी बैठकीत दिसले. खोरवाणी, पी. हणमंतराव, गुजराथी, चारी, पुरी, शहा असे विविध भाषिक सर्व जातींतील कार्यकर्ते विद्यार्थी परिषद सर्वस्पर्शी, सार्वभौम, सर्वसमावेशक बनविण्यासाठी टीका आणि द्वेष टाळला पाहिजे. कालबाह्य विपरित रुढी-रिवाजांना आपण आचरणातून रजा दिली पाहिजे, यावर त्यांचा भर असे. ते म्हणत, ‘‘सामाजिक समीकरणांना राजकीय रंग देऊ नये. देशभरात सर्व प्रांतात सर्वसमावेशक विद्यार्थी संघटना बांधतात. सर्व समाज घटकांतून पूर्ण वेळ कार्यकर्ते काढून बलाढ्य संघटन उभे केले. सर्वस्पर्शी संघटनेचा हा दाखला. प्रबळ संघटनेचा कार्यकर्ता विशेषतः टीमच्या सदस्याच्या विश्वासार्हतेला तडा जाता कामा नये, त्याचे आर्थिक व्यवहार, कार्यकर्त्यांशी संबंध या संबंधी यशवंतराव जागरूक असत. मी एकदा त्याने म्हटले की, ‘‘विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ’All are equal but some are equal' यातील ’More equal' कडे वळू लागला आहे, असे माझे मत आहे.’’ यशवंतराव एखादे विधान घाईघाईने खोडून टाकणारे नव्हते. ते म्हणाले, ‘‘संघ परिवारात प्रत्येक व्यक्ती, कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, पण कोणीही अपरिहार्य नाही, याची अधूनमधून जाणीव करून दिली पाहिजे. यश-साधनसंपत्ती प्रसंगी पद-प्रतिष्ठा मिळाल्यावर आपण स्वयंसेवक आहोत, घेणार्‍याच्या नाही, तर देणार्‍यांच्या कुलांतील आहोत, याचा विसर पडता कामा नये, कार्यकर्त्यांचे मूल्यमापन व्यक्तित्त्व, भाषण हुशारी यावर न करता कामांतील योगदान व समर्पण यावर केले की, ’More equal' ची जाण गळून पडेल. कोणताही प्रश्न, शंका, अडचणी यावर मोकळेपणाने बोलण्याचे स्थान म्हणजे यशवंतराव केळकर! कार्यकर्त्यांचे आर्थिक व्यवहार, चंगळपणा, प्रसंगी पाय घसरण्याचे प्रसंग यावर त्यांचे बारीक लक्ष असे. कार्यकर्त्यांचा पीळ आणि कस कमी होता कामा नये, हा त्यांचा आग्रह असे. यशवंतरावराव माझ्या शाखेचे- शिवाजी उद्यान शाखेचे स्वयंसेवक व आठवड्यातून एकदा त्यांना भेटून शाखेचे इतिवृत्त द्यायचे, अशी आमची भेट. शाखेतील कार्यक्रम, उपस्थिती, गणवेशधारी स्वयंसेवक यांची ते न चुकता चौकशी करीत कार्यक्रमाची योजना करावी आणि ते पार पाडले की नाही, याची खात्री करावी, असा त्यांचा आग्रह. अपेक्षेप्रमाणे गुरुदक्षिणा पूर्ण न झाल्यास ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे ठरले ते पूर्ण झालेच पाहिजे, यात माझी मदत लागल्यास संकोच न करता ‘मला सांग’ असे अधिकारवाणीने सांगण्यास ते विसरले नाहीत. कार्यकर्ता यशस्वी झाला पाहिजे, प्रसंगी यशस्वी होण्याला मदत केली पाहिजे, हा त्यांचा स्वभाव. विवाहित कार्यकर्त्यांनी पत्नीलाही गृहीत धरू नये, तिचा संघ कार्याशी संबंध असेलच असे नाही, तिच्या भावभावना, अपेक्षा यांचा विचार केला, तरच अनेक वर्षे संघकार्य करता येईल. कार्यकर्त्याला जपले की, संघटन तरुन जाते. माझ्यासारख्या अनेकांना त्याचा अनुभव आला आहे. कार्यकर्त्याच्या चांगुलपणावर व कर्तृत्वावर त्यांचा निःसंशय विश्र्वास. कार्यकर्त्यांची चूक पोटात घालून विश्र्वासाने त्यांच्याकडून काम करून घेण्याचे अजब कसब त्यांच्याकडे होते. आणीबाणीच्या काळात १९ महिने त्यांना कारागृहात राहावे लागले. नुकताच संसार आणि व्यवसाय सुरू केलेल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, त्यांचे घर आणि व्यवसाय नीट चालविण्यासाठी तुरुंगातून ते व्यवस्था लावून देत असत. मिसा बंदीचे ते पालक होते. आणीबाणीचा काळ हा ओरखडा- आहे, ही त्यांची धारणा. तुरुंगात ते उर्दू शिकले, आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केला. संघकार्याच्या दृढीकरणाचा- खोलवर विचार केला. आणीबाणी उठताच जोमाने कामाला सुरुवात केली. आणीबाणीच्या अग्निदिव्यातून संघ, संघपरिवार, स्वयंसेवक उजाळून निघाला. स्वीकारार्ह झाला. ‘टेक ऑफ’ संपून ‘उड्डाण’ सुरू झाले. १९८५ मध्ये महाविद्यालयातून ते सेवा निवृत्त झाले. वाढत्या कमाबरोबर आर्थिक गरजाही वाढू लागल्या होत्या. सहकार्‍यांनी यशवंतरावांची एकसष्टी साजरी करून निधी संग्रह करण्याचे ठरविले. यशवंतरावांचा वाढदिवस सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याला विरोध होता. ‘‘मी सेवा निवृत्त झालो तरी संघकामातून निवृत्ती घेणार नाही आणि माझ्या हातून काही काम झाले असेल, तर ते टीमचे यश आहे. संघटनेचा निर्णय मनाविरुद्ध असला तरी शिरसावंद्य मानायचा, हीच शिस्त आहे.’’ यशवंतरावांनी अशा शिस्तीचे पालन केले. अनेक ठिकाणी झालेल्या सत्कार समारंभात ते सामील झाले. यशवंतरावांच्या एकसष्ठीबरोबर ३० वर्षे केलेल्या कामाचा तोे लेखाजोखा होता. समारंभात यशवंतराव ‘मी...माझे’ यावर काही बोललेच नाहीत. किंबहुना, त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले. सेवा निवृत्तीबरोबर विद्यार्थी परिषदेतून निवृत्तीचा विचार त्यांच्या मनात असावा. हिंदुस्थानातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आपल्या वैशिष्ट्यासह उभा केल्याचा त्यांना अहंकार नव्हता, अभिमान जरूर होता. काळजी होती. टीमचा विस्तार आणि कार्यक्षमतेचा बुद्धिमान निर्णय घेण्याची क्षमता समर्पण व लढाऊ वृत्ती त्यांनी समजून घेण्याची ताकद संघटनेत असली पाहिजे. कर्तबगार कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची तयारी नेतृत्वात, संघटनेत नसेल तर कार्यकर्त्यांचे मोल निरुपयोगी ठरते, कार्यकर्ता निराश होतो, प्रसंगी विरोधक होतो. संघटन विशाल हवे, उदार हवे, अन्यथा जबाबदार होतकरू कार्यकर्ता हैराण होतो. याची जाणीव सर्वांना करून देण्यास ते विसरले नाहीत.

 

१९८६ साली यशवंतराव महाराष्ट्र प्रांताचे संघाचे बौद्धिक प्रमुख झाले. तरुणांतील करिअरची ओढ, बदलती जीवनशैली, सामाजिक समीकरणात होणारे बदल यांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा म्हणजे मानवतेचा विचार पुन्हा विस्तृतपणे मांडण्याची गरज आहे, याची जाण त्यांनी होती.

 

बदलत्या काळाशी फटकून न राहता, परंपरेचा विसर न पडता, भूतकाळाशी नाते न तोडता कार्यपद्धतीतील आवश्यक तर युगानुकूल बदल करीत मनुष्यनिर्मितीचे काम अखंड चालू राहिले पाहिजे, हा विचार पक्का होत चालला. तरुण, बाल नव्हे, तर शिशु, प्रौढ स्वयंसेवक यांचे प्रबोधन करण्याच्या योजना मनाशी ठरत होत्या. कार्यकर्त्यांची उपलब्धता व वेळ यांचे ‘टाईमटेबल’ बनत चालले होते; परंतु नियतीच्या मनात काही वेगळे असावे. तापाचे निमित्त झाले. भूक हटली. शरीरात कणकण सुरू झाली. यकृताने असहकार पुकारला. यशवंतरावांच्या आजारपणाचे निदान झाले. काविळ! शरीर साथ देत नव्हते, बौद्धिकचे विषय पाठ सोडत नव्हते. यशवंतराव स्थितप्रज्ञ होते. वनौषधींपासून अत्याधुनिक असे औषधोपचार सुरू झाले. विद्यार्थी परिषदेच्या व्यवस्था लागल्या होत्या. बौद्धिक विषयाचे ‘प्रारूप’ बनत चालले होते. शरीरस्वास्थ्य झपाट्याने बिघडत होते. हेडगेवार कुळाची शान वाढविणारे समर्पित जीवन ६ डिसेंबर, १९८७ ला शांत झाले. शेकडो कार्यकर्त्यांचे मन मोकळे करण्याचे स्थान हरपले. ‘टीम’ आणि ‘प्रारूप’ची संकल्पना मात्र मनात रुतून बसली.

- डॉ. पां. रा. किनरे