नाशिकच्या नगरसेवकांना आता मिळणार १५ हजार रुपये मानधन
 महा त भा  16-Jul-2017
 
 
नाशिक : राज्यातील महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना आता दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि त्याव्यतिरिक्त बैठकभत्ता प्राप्त होणार आहे.  शासनाने राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन सन २०१० मध्ये निश्चित केले होते. मात्र, वाढती महागाई लक्षात घेता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, राज्याच्या नगरविकास विभागाने नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 ‘अ’ प्लस वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा २५ हजार, ‘अ’ वर्गातील महापालिका नगरसेवकांना दरमहा २० हजार, ‘ब’ वर्ग महापालिका नगरसेवकांना दरमहा १५ हजार, तर ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. नाशिक महापालिका ही ‘ब’ वर्गात मोडते. त्यामुळे नगरसेवकांना १५ हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळणार आहे.  यापूर्वी २०१० पासून नगरसेवकांना प्रतिमाह ७,५०० रुपये मानधन अदा करण्यात येत होते.  याशिवाय, नगरसेवकांना प्रत्येक महिन्यात होणार्‍या प्रभाग समिती, स्थायी समिती, महासभा, महिला व बालकल्याण समिती यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास प्रति बैठक १०० रुपये बैठक भत्ताही दिला जातो. 

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

शासनाने नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेला आता १२७ नगरसेवकांच्या मानधनापोटी दरमहा १९ लाख, ५ हजार तर वार्षिक दोन कोटी, २८ लाख लाख रुपये अदा करावे लागणार आहे. .