मी, वेलिंग्टन आणि रहस्य : नेहमीच्या ‘हू डन इट’ पलीकडे
 महा त भा  16-Jul-2017


आयुष्यात कधी न कधी मनापासून वाचन केलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात काऊचिऊच्या गोष्टी, राजाराणीच्या किंवा जादूच्या गोष्टी, सानेगुरुजी किंवा तत्सम संस्कारकथांचे टप्पे ओलांडले की एक अपरिहार्य टप्पा येतो तो म्हणजे साहसकथांचा. किशोरवयात अशा गोष्टींचा प्रचंड नाद लागतो. फास्टर फेणे, हार्डी बॉईज (आणि अलीकडे Harry Potter) ही मंडळी मनाचा ताबा घेतात. साहसकथांचा पदर धरूनच येत असतात रहस्यकथा. तशा या दोघी आवळ्याजावळ्या बहिणीच असतात म्हणा ना! ‘पुढे काय होणार’ ही उत्कंठा शिगेला पोहोचवणे हे या दोन्हीतले साम्य. बारीकसा फरक करायचा झालाच तर रहस्यकथेत ‘गुन्हा कुणी केला/खुनी कोण’ याचीही तितकीच उत्सुकता असते. अशा कथा/कादंबऱ्यांना इंग्रजीत 'Whodunit' ('Who [has] Done It' या शब्दप्रयोगाचे लोकप्रिय रुपडे) असं म्हटलं जातं. पण काही रहस्यकथा अशाही असतात, ज्या ‘हू डन इट’ च्या पलीकडे जाणाऱ्या असतात. गुन्हा कुणी केलाय यापेक्षा नक्की काय घडलंय आणि का घडलंय हे शोधू पाहतात. घटनेशी संबंधित पात्रांच्या ‘मनाचिये गुंती’ डोकावण्याचा प्रयत्न करतात.


कथानकाचे निवेदन प्रथमपुरुषी एकवचनी असेल तर आपण केवळ निवेदकाच्या चष्म्यातून त्याच्या जगाकडे बघत असतो. प्रथमपुरुषी एकवचनी कथा, कादंबरी किंवा आत्मचरित्र वाचताना निवेदकाच्या प्रामाणिकपणावर, सच्चेपणावर विश्वास ठेवण्याची वाचकाची सहजप्रवृत्ती असते. पण याचाच फायदा घेऊन वाचकाला गोंधळात टाकणाऱ्या चतुर लेखकांच्या कथा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर यायला लागल्या आहेत. अशा कथानकांमधल्या निवेदकाला/निवेदिकेला unreliable narrator म्हटले जाते, कारण तो/ती जे सांगतो आहे ते खरं आहे की नाही असा संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना किंवा अन्य पात्रांची निवेदनं कथानकाच्या ओघात येतात आणि वाचक अजूनच गोंधळून जातो. अलीकडच्या काळातील Gone girl किंवा The Girl on The Train ही या प्रकारातली अत्यंत लोकप्रिय उदाहरणं. बऱ्याचदा निवेदक/निवेदिका अविश्वसनीय असण्यामागे त्या व्यक्तीचे चारित्र्य, तिच्या वाईट सवयी/व्यसने, बिघडलेली मनस्थिती या गोष्टी कारणीभूत असतात, ज्या रहस्य अधिक गडद करत नेतात. मात्र निवेदक/निवेदिका अविश्वसनीय असण्यामागे याहून वेगळं काही कारण असू शकतं आणि ते वाचकाला कथानकाकडे आणखीनच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडू शकतं याची कदाचित ‘मी, वेलिंग्टन आणि रहस्य’ सारखं काहीतरी वाचेपर्यंत कल्पनाच येऊ शकणार नाही.


कथानकाचा निवेदक आहे तो ओंकार शहा नावाचा पंधरा वर्षांचा Autistic (स्वमग्न) मुलगा. अर्थात तो मतिमंद नसल्याने तो काही गोष्टींमध्ये हुशार आहे. गणित आणि विज्ञानात त्याला विलक्षण रस आहे. त्याला पुढे जाऊन अंतराळवीर व्हायचंय. त्याला आकड्यांशी खेळायला विलक्षण आवडतं. तो विलक्षण चौकस आहे. पण त्याला भावनांचं आकलन नीट होऊ शकत नाही. जीवनाच्या विविध छटा त्याला कळू शकत नाहीत म्हणूनच तो अतिशय निरागसही आहे. अशा मुलाला त्याच्या घराच्या जवळच्याच एका काकूंच्या 'वेलिंग्टन' नावाच्या कुत्र्याचा बागेतल्या खुरप्याने खून कुणीतरी खून केलेला दिसतो. तो त्याचा विलक्षण लाडका कुत्रा असल्याने या कुत्र्याला कुणी मारलं असावं हे शोधून काढायचंच असा निश्चय करतो.

एक छोटं रहस्य त्याला त्याहून खूप मोठ्या धक्कादायक वास्तवाकडे कसं घेऊन जातं हे वाचणं खूप रोचक आहे. काहीवेळा मुक्कामापेक्षा त्याकडे नेणारा रस्ता अधिक महत्वाचा असतो असं का म्हणतातते हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. पुस्तकाची स्वमग्न मुलाच्या नजरेतून मांडणी, मुख्य मुद्द्याकडे येताना घाई न करणे, सुरुवातीपासून वाचकाला चमच्याने सगळं भरवण्याचा अट्टहास न करता त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि patienceवर विश्वास ठेवणे आणि हळूहळू एकेक गोष्ट उलगडत नेणे या गोष्टी कादंबरी अतिशय विचारपूर्वक विणत नेल्याची खात्री देतात. ओंकारचं गणित, त्याचं अतिशय चोख logic या गोष्टी रहस्य शोधण्यासाठी अतिशय उपयोगाच्या असतानाच त्याला परिस्थितीचं गांभीर्य न कळणे, त्याचा भावनांक (Emotional Quotient) कमकुवत असणे, between the lines अर्थछटा समजू न शकणे, पकडलं जाऊ नये म्हणून गरजेपुरतंही खोटं बोलता न येणे या गोष्टींमुळे त्याचा शोध हा आपल्याला खूप अनिश्चित आणि अंदाज न बांधता येणाऱ्या वाटेवरून घेऊन जातो. बऱ्याचदा रहस्यकथांमध्ये कथानायक अडचणीत सापडला की वाचकाची घालमेल सुरू होते. इथे कथानायकाच्या अडचणी प्रवासात मध्येच आलेल्या नसून त्या त्याच्यातल्या निसर्गदत्त कमतरतेतून आलेल्या असल्यामुळे इथे असणारे कुतूहल हे ‘उत्कंठा’ या अंगाने न जाता ‘काळजी’ या अंगाने जाणारे आहे, जो की एक नवीन अनुभव आहे.

पुस्तकाची मांडणी (कथानक आणि त्यातली रेखाटने या दोन्ही दृष्टींनी) वेधक आहे. कथानायकाला दिसत गेलेली रहस्यं आणि त्यांच्या नोंदी पूर्वादीदीला दाखवून त्यातून तो लिहित असलेली रहस्यकथा, अशा रीतीने ‘मी, वेलिंग्टन आणि रहस्य’ पुढे जाते. ओंकारच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेला अनुसरून यात अनेक गोष्टी येतात. उदा. तो लिहित असलेल्या रहस्यकथेच्या प्रकरणांचे क्रमांक १, २, ३ अशा क्रमाने नसून २, ३, ५ अशा सगळ्या मूळ संख्या आहेत कारण त्याला आकड्यांशी खेळायला खूप आवडतं. त्याचे निरीक्षण अतिशय बारीक आहे परंतु त्याचं नक्की काय करायचं हे त्याच्या मेंदूला नीटसं कळत नाही. त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या निवेदनात अनेक गोष्टी (आपल्यादृष्टीने अनावश्य/विनाकारण असल्यातरी) येत राहतात. उदा. पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतानाच्या खिशातल्या ७ गोष्टी किंवा आई हार्ट अटॅकने गेल्याचं कळलं त्या दिवशीचं मिनिटामिनिटाचं वेळापत्रक वगैरे. पुस्तकात एके ठिकाणी तो स्वतः याबद्दल भाष्यही करतो. जेव्हा त्याला त्याचे मानसोपचार तज्ञ म्हणतात की “तू हुशार आहेस” तेव्हा तो म्हणतो “मी हुशार नाही, मी बारकाईने सर्व गोष्टी बघतो, माझं निरीक्षण चांगलं आहे. निरीक्षण चांगलं असणं आणि हुशार असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.” सर्व गोष्टींचं निरीक्षण करून काही नावे शोध लावता तेव्हा त्याला हुशारी म्हणायचं. उदा. Universe is expanding किंवा एखादी मर्डर मिस्ट्री सोडवणं’ ही अशी वाक्यं वाचली की एका अत्यंत विशेष मुलाच्या नजरेतून आपण सगळं बघत आहोत हे लक्षात यायला लागतं. त्याचं एकाच वेळेस हुशार आणि अस्थिर, नाजूक असं बरंच काही असणं, आपण काय केलं, काय पाहिलं ते रेखाटून दाखवणं हे सगळं संपूर्ण कथानकाला'युनिक'बनवत जातं.

रहस्याचा तपासात ओंकारला यश येतं का ? खून कुणी आणि का केलेला असतो ? ते ओंकारला कसं कळतं ? असे प्रश्न आपल्याला सुरुवातीला पडत असले तरी पुस्तक अर्धे वाचून होईपर्यंत हे लक्षात येतं की फक्त रहस्य शोधणे एवढा मर्यादित हेतू या कादंबरीमागे नाही. पण एका स्वमग्न मुलाच्या नजरेतून उभं राहणारं जग, त्याचं त्याच्या कुटुंबाशी नातं, त्याला सांभाळताना होणारी आई-वडिलांची ओढाताण, त्यांच्यातले परस्पर संबंध याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य करतं. आईवडिलांच्या भांडणांमध्ये कोवळ्या मुलांची किती फरफट होऊ शकते याची आपण कल्पना करू शकतो, पण मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या आईवडिलांचे संबंध तणावाचे असतील परिस्थिती किती बिकट होऊ शकते हे काळीज चिरत जाणारे वास्तव यातून समोर येतं आणि ते विलक्षण अस्वस्थ करून सोडतं.

संपूर्ण कादंबरीत लेखकाने जो परकायाप्रवेश केला आहे तो थक्क करणारा आहे. पंधरा वर्षाच्या आणि त्यातही स्वमग्न मुलाच्या नजेरतून जग कसं दिसतं हे मांडण्यासाठी त्याचा स्वतःचा अभ्यास किती प्रचंड असला पाहिजे याची कल्पनाच केलेली बरी ! त्यामुळेच या मुलाच्या मनात येणारे असंबद्ध विचार, ते मनात आल्यावर त्याने त्यांची लगेच केलेली बालसुलभ रेखाटनं, आपल्या मनात नक्की कोणती भावना आलीये ते पूर्वादीदीने चितारुन समजवून सांगितलेल्या भावचिन्हांच्या (Smileys) मदतीने वाचकाला समजवून सांगणं, स्वतःच्या आक्रस्ताळेपणाचं वर्णन काळीज गोठून जाईल इतक्या थंड शब्दात वर्णन करणं आणि या सगळ्यात कुठेही मेलोड्रामा येऊ न देणं ही लेखकाच्या ताकदीची उदाहरणं आहेत. पुढेपुढे कथानकाच्या ओघात या मुलाचं प्रचंड अस्थिर असणं, वेळीअवेळी आरडाओरडा करणं, दिवस दिवस जेवण न करणं या गोष्टी उलगडत जातात तेव्हा यातून मुलाबद्दल सहानुभूती निर्माण व्हायला लागत असली तरी त्याची कीव वाटत नाही इतपत लेखकाने तोल अचूक सांभाळला आहे, त्याबद्दल लेखकाला काही गुण अधिक द्यायलाच हवेत. वाचताना एक टप्पा असा येतो की आपण मुलाच्या नजरेतून निवेदन ऐकत असलो तरी अशा मुलाच्या (फक्त कथानकातल्याच नव्हे तर खऱ्या आयुष्यातल्या) आईवडीलांच्या नजरेतून पाहायला लागतो आणि त्यांची मनस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करू लागतो. हा या पुस्तकाचा सर्वात मोठा गुण ठरावा.

मूळ इंग्रजी कादंबरी असलेल्या या पुस्तकाचं मराठी रूपांतर ज्योती माटे यांनी इतकं खुबीने केलं आहे की मूळ कादंबरीबद्दल सांगितल्याशिवाय ते कळणारच नाही. फक्त मराठी परिसर आणि भाषाच नाही तर अनेक संकल्पना त्यांनी याच मातीतल्या वापरल्या असल्याने ते स्वतंत्र पुस्तक म्हणूनही शोभून दिसेल. घन:श्याम देशमुख यांची अनेक रेखाटनं पुस्तकाला अधिक लक्षवेधी करतात. पठडीतल्या रहस्यकथांचे चाहते असाल तर कदाचित या पुस्तकातील रहस्य तुम्हाला फारसे खिळवून ठेवणार नाही, पण एवढंच म्हणेन की आपल्याभोवती आखून घेतलेल्या चौकटी मोडण्यातही खूप मजा असते. कधीतरी या पुस्तकासारखं खूप अनोखं काहीतरी मुठीत येऊ शकतं...

पुस्तकाचे नाव : मी, वेलिंग्टन आणि रहस्य
(मार्क हेडन यांच्या The curious incident of the dog in the night time या पुस्तकाचे रूपांतर)
लेखिका : ज्योती माटे
प्रकाशक : देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
आवृत्ती : पहिली (मार्च २०११)
किंमत : रु. १५०
पृष्ठसंख्या : १३९