Advertisement
कसारा घाटात दरड कोसळली
 महा त भा  16-Jul-2017

 
 
नाशिक : मुंबई-नाशिक हायवेवर जुन्या कसारा घाटात रस्त्यावर दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्याने  घाटातील मुंबई आणि नाशिक दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरू होती. इगतपुरी, कसारा भागांत मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक हायवेवरील जुन्या कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. या स्थळी पोलीस आणि प्रशासन पोहोचले असून, दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले, पण यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
दरम्यान,  परिसरात  पाऊस सुरू आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलचं झोडपून काढलं आहे. दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७२ टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी आठ वाजता गंगापूर धरणातून  २०००  क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 मुसळधार पावसाने घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला अनेक ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिकांनी अनेकवेळा पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती. दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप होत आहे.

Advertisement