गंगापूर धरणातून २००० क्युसेकचा विसर्ग
 महा त भा  16-Jul-2017
 
नाशिक : गंगापूर धरणातून आज सकाळी २ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवार दि. १३ च्या रात्रीपासून नाशिक शहर व परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण व आळंदी धरणाच्या खालील भागांमध्ये (फ्री कॅचमेंट एरिया) पावसाचे प्रमाण वाढत असल्याने  व तेथून प्रवाहित होणारा पाण्याचा प्रवाह हा गोदावरी नदीस येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.  त्याअनुषंगाने  सर्व संबंधित अधिकार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
 
तसेच प्रामुख्याने शहरातील पुरामुळे बाधित होणार्‍या गोदावरी घाट परिसर, सातपूर रोड, नासर्डी नदी परिसर इत्यादी सारख्या विविध भागात पाहणी करून संबंधित खातेप्रमुखांना तातडीने कामे करण्याच्या सूचना दिल्या असून रस्त्यांवर कुठेही पाणी साठणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे बाधित होणार्‍या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकिनारी बाधित होणार्‍या क्षेत्रातील/परिसरातील सर्व विभागीय अधिकार्‍यांना ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यास सांगण्यात आले आहे. 
 
आपत्कालीन कक्ष
 
या परिस्थितीत नाशिक महानगरपालिकेमार्फत आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू असून नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत ०५२३-२५७१८७२, ०२५३-२३१७५०५, ०२५३-२२२२४१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.