पातोंडा बसस्थानकावर दोन बसेसची टक्कर
 महा त भा  16-Jul-2017अमळनेर (जळगाव) : तालुक्यातील पातोंडा येथे बसस्थानकावर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इगतपुरी - चोपडा बस क्र एमएच २० - बीएल १४०८ व चोपडा - धुळे बस क्र एमएच १४ - बीटी ४१७८ या दोन एसटी महामंडळाच्या बसेसची समोरासमोर टक्कर झाली. दोनही बसमधील चालकांसह ३० ते ४०  प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.


अमळनेरकडून  येणारी इगतपुरी - चोपडा बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने चोपडाकडून अमळनेरकडे जाणार्‍या बसला तिने जोरदार धडक दिली, अशी माहिती इगतपुरी बसमधील व  प्रत्यक्षदर्शी प्रवासी समाधान बिरारी यांनी दिली. यात चोपडा डेपोच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.   बसस्थानकावर असलेल्या नागरिकांनी अडकलेल्या वाहन चालकांना व प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना अमळनेर व चोपड्याकडे  जाणार्‍या बसमधे बसवून तेथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी चौकशी केली त्याचबरोबर अमळनेर आणि चोपड़ा आगार प्रमुखांना    अपघाताची  लगेच  माहिती देण्यात आली. कुणी फिर्याद दिली आहे काय?...याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.मात्र डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने अखेर महामंडळातर्फे जखमींना  प्रत्येकी ५०० व गंभीर जखमींना प्रत्येकी १००० रु. अर्थसाह्य देण्यात आले.

आ.सौ.स्मिताताई वाघ यांच्याकडून विचारपूस


आमदार सौ. स्मिताताई वाघ आणि सहकारी भाजप कार्यकर्त्यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली. तसेच कार्यकर्त्यांना सूचना केल्या. पोलीस प्रशासनास योग्य ती कारवाईच्या सूचना केल्या.