आसाम पाठोपाठ ओरिसामध्येही पुराचे थैमान
 महा त भा  16-Jul-2017


ओरिसा : गेल्या आठवड्या भरापासून ईशान्य भारतात सुरु असलेल्या पावसामुळे आता आसाम पाठोपाठ ओरिसामध्ये देखील पुराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ओरिसाच्या ईशान्य भागातील नद्यांना आलेल्या पुरामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांना तैनात राहण्याचे आदेश दिले गेले आहे.


ओरिसाच्या उत्तर-पूर्व भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्ते आणि पूल पूर्णपणे उद्वस्त झाले आहे. राज्यातील रायगंडा येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीवरील रेल्वेचा पूल कोसळला आहे. सुदैवाने नागरिकांच्या दक्षतेमुळे या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

सतत सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील ईशान्य भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्यामुळे वीज आणि दुरध्वनी संपर्क तुटला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूरसदृश्य भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह भारतीय जवानांची देखील मदत घेण्यात येत आहे.