गोजमोकडून सिलिगुडीजवळ रस्तारोको
 महा त भा  16-Jul-2017


दार्जिलिंग (प.बंगाल) : स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीसाठी गोरख जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आज राष्ट्रीय महामार्ग क्र. ३१ वर रोको करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणत वाहतूक कोंडी होत आहे. कार्यकर्त्यांना बाजूला हटवून वाहतूक पुर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग सिलिगुडी कॉरीडोअरजवळ असल्यामुळे येथे झालेल्या रस्तारोकोवर चिंता व्यक्त केली जात आहे.


सिलीगुडीजवळील सलुगारा येथील गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोरखालँडसाठी महामार्गावर चक्काजाम केला आहे. यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचा देखील मोठ्या प्रमाणत सहभाग आहे. कार्यकर्त्यांनी हातात गोरखालँडच्या मागणीचे फलक घेऊन रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडला आहे. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. वाहतुकीवर याचा कसलाही परिणाम होऊ नये तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाण पोलीस या ठिकाणी पोहचले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी शांतते आपले आंदोलन चालू ठेवून महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. परंतु कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष करत रस्तारोको सुरूच ठेवला आहे.


दरम्यान या आंदोलनाचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाल्यास पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याची शक्यता आहे. महामार्ग क्र.३१ हा सिलिगुडीजवळील एक महत्त्वाचा महामार्ग असून ईशान्य भारतातील बरीचशी वाहतूक या महामार्गाद्वारे होते. त्यामुळे या महामार्गावर झालेल्या रस्तारोकोच्या काही विपरीत परिणाम ईशान्यकडील दळणवळणावर पडू नये, असे मत पोलिसांनी व्यक्त केला आहे.